

suvendu adhikari pa killing Update: पश्चिम बंगालच्या उत्तर परगना जिल्ह्यातील मध्यमग्राममध्ये भाजप नेते शुभेंदू अधिकारी यांचे पीए चंद्रनाथ रथ यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. त्यामुळं पश्चिम बंगालमधील निवडणूक निकालानंतर सुरू झालेला हिंसाचार हा एका वेगळ्याच दिशेला जात आहे. या हत्येनंतर तृणमूल काँग्रेसने राजकीय हत्या योग्य नाहीत या प्रकरणाची न्यायालयाच्या देखरेखीखाली सीबीआय चौकशी करावी अशी मागणी देखील केली आहे.
मात्र शुभेंदू अधिकारी यांच्या पीएच्या हत्यानंतर राज्यात आक्रोश व्यक्त करण्यात येत आहे. चंद्रनाथचे मित्र कासिम अली यांच्या डोळ्यातील अश्रू थांबत नाहीयेत. त्यांच्या चेहऱ्यावर राग आणि आवाजात वेदना होत्या. त्यांनी ९ तारखेला सकाळी मुख्यमंत्री शपथ घेईल आणि सायंकाळी या गुन्हेगारांचा एन्काऊंटर झाला पाहिजे अशी मागणी केली.
कासिम अली यांनी सांगितलं की बुधवारी सायंकाळी ६ ते ६.३० च्या दरम्यान चंद्रनाथ रथ यांच्यासोबत शेवटचं बोलणं झालं होतं. त्यावेळी चंद्रनाथ यांनी फोनवर सांगितलं की निजाम पॅलेसमध्ये बसुया, गप्पा मारूयात चहा घेऊयात असं सांगितलं होतं. भाजपच्या विजयाचा जल्लोष करूयात. मात्र कामिस म्हणाले की आज येऊ शकणार नाही उद्या भेटू. मात्र ते संभाषण आमचे शेवटचे संभाषण ठरलं. तयारी जल्लोषाची सुरू होती त्यापूर्वीच रात्री गोळ्या झाडल्याचा आवाज झाला अन् सर्व काही संपुष्टात आलं.
बुधवारी रात्री उशिरा मध्यमग्रामच्या रस्त्यावर गोळीबाराचा आवाज घुमला. पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार चंद्रनाथ रथ हे आपल्या गाडीतून जात होते. त्यावेळी काही हल्लेखोरांनी त्यांचा पाठलाग करणं सुरू केलं. मिळालेल्या माहितीनुसार एक कार आणि काही बाईक सतत चंद्रनाथ यांच्या गाडीचा पाठलाग करत होत्या. काही वेळाने पाठलाग करणाऱ्या कारने ओव्हरटेक करून संद्रनाथ यांची गाडी थांबवली. त्यानंतर बाईकवरून आलेल्या हल्लेखोरांनी अगदी जवळून तुफान गोळीबार केला. चंद्रनाथ यांना पाच गोळ्या लागल्या.
गोळीबाराचा आवाज ऐकू आल्यावर सगळीकडे गोंधळ माजला. स्थानिक लोक पळत घटनास्थळी आले आणि त्यांनी चंद्रनाथ यांना रूग्णालयात नेलं. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. हत्येची बातमी येताच भाजप कार्यकर्त्यांचा राग अनावर झाला होता. ते सर्व रूग्णालय आणि घटनास्थळाजवळ जमा झाले.
हत्येनंतर चंद्रनाथ यांचे मित्र कासिम अली यांनी रडत रडत दावा केला की हल्लेखोरांचे टार्गेट हे शुभेंदू अधिकारी होते. चंद्रनाथ हे अधिकारी यांच्या सर्वात जवळच्या लोकांपैकी एक होते. अनेक दिवसांपासून रेकी केली जात होती. ज्या लोकांनी हल्ला केला त्यांना सगळं माहिती होतं.
कासिम यांनी आरोप केला की हा काही सामान्य गुन्हा नाही. ही कट रचून केलेली हत्या आहे. असं असलं तरी पोलिसांनी अजूनपर्यंत या अँगलची अधिकृत पुष्टी केलेली नाही. तपास यंत्रणा सर्व शक्यता पडताळून पाहत आहेत. हल्लेखोरांना चंद्रनाथ यांच्या हालचालींची पूर्ण माहिती होती.
कासिम अली यांनी प्रतिक्रिया देताना गंभीर राजकीय आरोप देखील केला. त्यांनी ममता आणि अभिषेक बॅनर्जी यांना चंद्रनाथ यांचे यश सहन झाले नाही. भवानीपूर निवडणुकीत चंद्रनाथ यांनी जे काम केलं त्यानंतर ते टार्गेटवर आले. ममतांना हार मान्य नाही. कासिम अली यांनी सांगितलं की बंगालची जनता या हत्येला कधी विसरणार नाही. कासिम यांनी ममता आणि अभिषेक यांच्यावर केलेल्या आरोपाची पोलिसांनी कोणतीही पुष्टी केलेली नाही. पोलिसांचा तपास अजून सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गोळीबार टार्गेटवरच करण्यात आला. सुरूवातीच्या तपासात असं दिसत आहे की हल्लेखोर विशिष्ट टार्गेट घेऊनच आले होते. गाडीत चालक आणि इतर लोक देखील उपस्थित होते. मात्र हल्लेखोरांनी फक्त चंद्रनाथ रथ यांच्यावरच गोळीबार केला. भाजप नेत्यांचा दावा आहे का हा हल्ला म्हणजे स्पष्टपणे राजकीय संदेश देण्याचा प्रयत्न आहे. घटनास्थळावरून पोलिसांना रिकामे काडतूस आणि बुलेट देखील मिळाले आहेत. पोलीस सीसीटीव्ही फुटेज देखील तपासले जात आहे.