Chandrapur Murder | प्रेयसीची चार्जरच्या वायरने आवळून निर्घृण हत्या; प्रियकराकडून आत्महत्येचा बनाव! दोघे राहत होते लिव्ह - इन मध्ये!

शवविच्छेदन अहवालाने आरोपी प्रियकराचा खोटारडेपणा उघड, दुर्गापूर पोलिसांनी प्रियकराला अटक
Chandrapur Murder
प्रेयसीची चार्जरच्या वायरने आवळून निर्घृण हत्या; प्रियकराकडून आत्महत्येचा बनाव!
Published on
Updated on

चंद्रपूर : चंद्रपूर शहरातील तुकुम परिसरातून एक हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. दुपारी झालेल्या एका हत्येची घटना ताजी असतानाच, रात्री उशिरा एका महिलेचा संशयास्पद मृत्यू झाला होता. मात्र, हा मृत्यू नसून गळा आवळून केलेली हत्या असल्याचं आता स्पष्ट झालं आहे. आपल्याच प्रेयसीचा मोबाईल चार्जरच्या वायरने गळा आवळून खून करणाऱ्या नराधम प्रियकराला दुर्गापूर पोलिसांनी अटक केली आहे.

मृत प्रियंका वांढरे ही पतीपासून विभक्त राहून २२ वर्षीय अंकेश बहीरवार याच्यासोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये  होती. अंकेश हा प्रियंकापेक्षा ७ वर्षांनी लहान होता. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यात किरकोळ कारणावरून खटके उडत होते. "प्रियंका माझ्यावर नियंत्रण ठेवते आणि घरच्यांशी बोलू देत नाही," या संशयातून अंकेशने १४ मार्च २०२६ च्या रात्री प्रियंकाचा मोबाईल चार्जरच्या वायरने गळा आवळून खून केला.

हत्या केल्यानंतर अंकेशने हा आत्महत्येचा प्रकार वाटावा असा बनाव रचला. त्याने प्रियंकाच्या वडिलांना फोन करून सांगितलं की, "प्रियंका बोलत नाहीये, तिने मान टाकली आहे." कुटुंबीयांनी तिला तातडीने रुग्णालयात नेले, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. सुरुवातीला सर्वांना ही आत्महत्या वाटली, पण नियतीला काहीतरी वेगळंच मान्य होतं.

गुरुवारी प्रियंकाचा शवविच्छेदन अहवाल समोर आला आणि पोलिसांचे धाबे दणाणले. अहवालात प्रियंकाचा मृत्यू श्वास गुदमरल्याने म्हणजेच गळा आवळल्याने झाल्याचे स्पष्ट झाले. आयपीएस अधिकारी गौरव कायंदेपाटील आणि त्यांच्या पथकाने तात्काळ सूत्रे हलवली. संशयाची सुई अंकेशकडे होतीच, पोलिसी खाक्या दाखवताच त्याने आपला गुन्हा कबूल केला.

पोलिसांनी घटनास्थळावरून हत्येसाठी वापरलेला मोबाईल चार्जर आणि एक्स्टेंशन बोर्ड जप्त केला आहे. आरोपी अंकेश बहीरवार विरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम १०३(१) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून तो आता पोलिसांच्या कोठडीत आहे. या घटनेने संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news