Bengal veg non veg controversy
कोलकाता : देशातील इतर भागांत मंदिरात मांसाहार केल्यास धार्मिक प्रमुखांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जाते. मात्र, पश्चिम बंगालमधील काही मंदिरांमध्ये मांसाहारी पदार्थांचा नैवेद्य देण्याची आणि तो प्रसाद म्हणून ग्रहण करण्याची शतकानुशतकांची परंपरा आहे. त्यामुळे बंगालमधील काही मंदिरांमध्ये ही एक सामान्य बाब आहे.
पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी कोलकात्यातील शेकडो वर्षे जुन्या कालीघाट मंदिरात माशाचा भोग घेतल्यानंतर मात्र या परंपरेची चर्चा पुन्हा रंगली. त्यामागे गेल्या आठवड्यापासून सुरू असलेला 'शाकाहारी-मांसाहारी' हा वादही कारणीभूत ठरला आहे. दुर्गापूजेदरम्यान मांसाहार करणाऱ्या बंगाली हिंदूंवर एका हिंदू धर्मगुरूंनी टीका केली होती.
कौशिकी अमावस्येनिमित्त मुख्यमंत्री अधिकारी यांनी काल सायंकाळी कालीघाट मंदिराला भेट दिली. शाक्त हिंदूंसाठी हा दिवस विशेष महत्त्वाचा मानला जातो. यावेळी ते मंदिरातील प्रसाद ग्रहण करत असल्याचा व्हिडिओ समोर आला. यामध्ये माशाचे डोके, तळलेला मासा आणि बासंती पुलाव यांचा समावेश होता. कालीघाट मंदिरात देवी कालीला मासे तसेच बोकडाच्या मांसाचा नैवेद्य अर्पण करण्याची परंपरा आहे. हा नैवेद्य नंतर भाविक प्रसाद म्हणून ग्रहण करतात.
बागेश्वर धामचे प्रमुख धीरेंद्र शास्त्री (बागेश्वर बाबा) यांनी दुर्गापूजेच्या काळात बंगाली हिंदूंनी मांसाहार टाळावा, असे आवाहन केले होते. दुर्गापूजेच्या काळात मांसाहार करणाऱ्या बंगाली हिंदूंना त्यांनी ‘ढोंगी’ असेही म्हटले होते. “मांसाहारी पदार्थांची विक्री बंद व्हावी असे कोणाला वाटते? मोबाईल फोनची फ्लॅशलाइट सुरू करून ते दाखवा. हा संदेश पश्चिम बंगालमधील प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचला पाहिजे. सरकारलाही याची जाणीव करून दिली पाहिजे. दुर्गापूजेच्या काळात पश्चिम बंगालमधील मांस आणि मद्यविक्रीची दुकाने बंद ठेवली पाहिजेत,” असे शास्त्री यांनी म्हटले होते. या वक्तव्यामुळे काही बंगाली समाजात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. कारण बंगालमध्ये दुर्गापूजेच्या काळात मांसाहार करण्याची परंपरा असून, काही शाक्त परंपरांमध्ये देवीला मांसाहारी पदार्थांचा नैवेद्यही अर्पण केला जातो.
मासा हा बंगाली समाजाच्या दैनंदिन आहाराचा महत्त्वाचा भाग आहे. बंगालच्या सांस्कृतिक परंपरा आणि धार्मिक आचार यांचा जवळचा संबंध असल्याने शाक्त पंथाच्या परंपरांमध्ये मासे हा एक महत्त्वाचा नैवेद्य मानला जातो. उदाहरणार्थ, कालीघाटात कालीमातेला मासे आणि बळी दिलेल्या बकऱ्याचे मांस, या दोन्ही गोष्टी अर्पण केल्या जातात. बंगालमधील सर्वात मोठा सण असलेल्या दुर्गापूजेच्या काळातही अनेक ठिकाणी मांसाहारी पदार्थांचे सेवन केले जाते. येथे या गोष्टीकडे वाईट नजरेने पाहिले जात नाही, उलट ती एक आनंदाची बाब मानली जाते. काही धार्मिक परंपरांमध्ये शाकाहारी आहाराचे नियम आहेत, तर काही परंपरांमध्ये देवतांना मांसाहारी नैवेद्य अर्पण करणे हा धार्मिक विधीचा भाग मानला जातो. मात्र, भारताच्या उत्तर आणि पश्चिम भागात अशा प्रथा मोठ्या प्रमाणावर आढळत नसल्याने बंगालच्या या आहारपरंपरांबाबत अनेकदा उत्सुकता निर्माण होते आणि त्यातून ‘शाकाहार विरुद्ध मांसाहार’ असा वादही पुन्हा पुन्हा उफाळून येतो.
या वादात भाजपने धार्मिक भावना आणि बंगाली समाजाच्या सांस्कृतिक परंपरा यांच्यात समतोल साधण्याचा प्रयत्न केला. सुवेंदू अधिकारी यांनी बागेश्वर बाबांचे मोठ्या उत्साहात स्वागत केले होते. तसेच त्यांनी पश्चिम बंगालमध्ये बागेश्वर धामचे केंद्र सुरू करण्याचे आवाहनही केले होते. मात्र, त्याच वेळी भाजपने स्पष्ट केले की, एखादा धर्मगुरू बंगालमधील लोकांनी काय खावे, हे ठरवू शकत नाही.
बागेश्वर बाबांच्या फोटोची आंदोलकांनी जाळपोळ केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी संबंधितांना अटक करण्याचे आदेश दिले. मात्र, बागेश्वर बाबांच्या मांसाहारविरोधी आवाहनाला त्यांनी थेट उत्तर न देता बंगाली परंपरेनुसार कालीघाट मंदिरात जाऊन देवीला अर्पण केलेला मांसाहारी भोग ग्रहण केला. बागेश्वर बाबांच्या वक्तव्याबाबत विचारले असता अधिकारी म्हणाले की, “ते त्यांचे वैयक्तिक मत आहे. ते स्वीकारायचे की नाकारायचे, हे लोकांनी ठरवायचे,” असे सांगितले.
ते पुढे म्हणाले, “मी सनातनी हिंदू आहे. महाष्टमीला मी देवी दुर्गेची पूजा करताना सात्त्विक आहार घेतो. कार्तिक महिन्यातही सात्त्विक आहार घेतो. त्याच वेळी देवी कालीला अर्पण केलेले बोकडाचे मांसही मी प्रसाद म्हणून ग्रहण करतो. आज मंदिरातील भोगामध्ये माशाचे डोके, तळलेला मासा आणि बासंती पुलाव होता. मी तो भोग ग्रहण केला.”