BRICS agriculture: भारताकडे सर्वाधिक शेतीची जमीन, तरी चीन दुप्पट धान्य कसे पिकवतो? कारण काय?

ब्रिक्स देशांमध्ये भारताकडे सर्वाधिक लागवडीयोग्य क्षेत्र असले, तरी प्रतिहेक्टर धान्य उत्पादनाच्या बाबतीत भारत अजूनही चीनच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात मागे आहे.
Agriculture
Agriculture File Photo
Published on
Updated on

BRICS agriculture data

नवी दिल्ली: ब्रिक्स देशांमध्ये भारताकडे सर्वाधिक लागवडीयोग्य क्षेत्र असले, तरी प्रतिहेक्टर धान्य उत्पादनाच्या बाबतीत भारत अजूनही चीनच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात मागे आहे. ब्रिक्सच्या १८ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध झालेल्या ‘ब्रिक्स संयुक्त सांख्यिकी प्रकाशना’तील आकडेवारीच्या विश्लेषणातून ही बाब समोर आली आहे. चीन हा ब्रिक्समधील सर्वाधिक धान्य उत्पादन करणारा देश आहे.

भारतामध्ये प्रमुख धान्य पिकांची उत्पादकता सातत्याने वाढत असली, तरी चीनच्या तुलनेत ती अद्याप लक्षणीयरीत्या कमी आहे. केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या ताज्या अंदाजानुसार, २०२५-२६ मध्ये भारतातील तांदळाचे प्रतिहेक्टर उत्पादन २,९१५ किलो, गव्हाचे ३,५९१ किलो आणि मक्याचे ३,८२४ किलो होते. त्याचवेळी चीनच्या राष्ट्रीय सांख्यिकी ब्युरोच्या आकडेवारीनुसार, २०२५ मध्ये चीनमध्ये तांदळाचे प्रतिहेक्टर उत्पादन ७,२०५ किलो, गव्हाचे ५,९४० किलो आणि मक्याचे ६,७०० किलो होते.

Agriculture
BRICS परिषदेसाठी रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन दिल्लीत; आज पंतप्रधान मोदींची घेणार भेट

भारताची कृषी उत्पादकता का कमी?

२०२५ मध्ये चीनने तब्बल ६६०.२१ दशलक्ष टन धान्याचे उत्पादन घेतले. भारताचे धान्य उत्पादन ३२४.८ दशलक्ष टन होते. म्हणजेच चीनचे उत्पादन भारताच्या तुलनेत दुपटीपेक्षा अधिक होते. भारताची कृषी उत्पादकता कमी असण्यामागे एकच कारण नसून पिकानुसार परिस्थिती वेगळी असल्याचे माजी कृषी सचिव देवेश चतुर्वेदी यांनी सांगितले. "कमी उत्पादकतेसाठी कोणतेही एकच कारण लागू पडत नाही; ते पिकांनुसार बदलते," असे चतुर्वेदी म्हणाले.

तांदळाच्या उत्पादनात सिंचनाचा मोठा वाटा

“उदाहरणार्थ, चीनमध्ये बहुतांश भातशेती खात्रीशीर सिंचनाच्या सुविधेखाली केली जाते. भारतात मात्र काही भागांमध्ये सिंचनाची चांगली सुविधा आहे, तर काही भाग अजूनही पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहेत. पंजाबसारख्या चांगल्या सिंचन सुविधा असलेल्या भागांत भारतातील तांदळाचे उत्पादन चीनच्या तुलनेत जवळपास समान आहे,” असे चतुर्वेदी यांनी सांगितले. भारतामध्ये बासमतीसारख्या देशी तांदळाच्या वाणांची लागवडही मोठ्या प्रमाणावर केली जाते. या वाणांचे उत्पादन संकरित वाणांच्या तुलनेत कमी असले, तरी शेतकऱ्यांना त्यासाठी अधिक दर मिळतो.

गव्हाच्या उत्पादनावर तापमानाचा परिणाम

गव्हाच्या उत्पादकतेवर तापमानाचा मोठा परिणाम होत असल्याचे चतुर्वेदी यांनी सांगितले. “भारतात भात-गहू पीकपद्धतीमुळे गव्हाची पेरणी उशिरा होऊ शकते. त्यानंतरच्या हंगामात वाढत्या तापमानाचा पिकावर परिणाम होतो आणि उत्पादन घटू शकते,” असे त्यांनी स्पष्ट केले. चीनमध्ये लागवड होणाऱ्या अनेक पिकांमध्ये जनुकीय सुधारित वाणांचा वापर केला जातो. त्याचाही अधिक उत्पादन मिळण्यात काही प्रमाणात फायदा होऊ शकतो, असे त्यांनी नमूद केले.

मक्याच्या उत्पादनात सर्वाधिक वाढ

भारताची कृषी उत्पादकता मात्र गेल्या काही वर्षांत सुधारली आहे. २०१९-२० ते २०२५-२६ या कालावधीत तांदळाचे प्रतिहेक्टर उत्पादन २,७२२ किलोवरून २,९१५ किलो, गव्हाचे ३,४४० किलोवरून ३,५९१ किलो, तर मक्याचे उत्पादन ३,००६ किलोवरून ३,८२४ किलो झाले. यामध्ये मक्याच्या उत्पादकतेत सर्वाधिक म्हणजे सुमारे २७ टक्के वाढ झाली आहे. तांदळाच्या उत्पादकतेत सुमारे ७ टक्के, तर गव्हाच्या उत्पादकतेत सुमारे ४ टक्के वाढ झाली. “भारत विविध पातळ्यांवर कृषी उत्पादकता वाढविण्यासाठी प्रयत्न करत आहे. भारतीय कृषी संशोधन परिषद हवामान बदलाला तोंड देऊ शकतील अशा गव्हाच्या वाणांचा विकास करत आहे. शेतकरीही या वाणांचा वाढत्या प्रमाणात स्वीकार करत असून, त्याचा उत्पादनवाढीस फायदा होत आहे,” असे चतुर्वेदी यांनी सांगितले.

उत्पादकता वाढली, तरी एकूण धान्य उत्पादन घटले

मात्र प्रतिहेक्टर उत्पादनात झालेली वाढ भारताच्या एकूण धान्य उत्पादनात सातत्याने दिसून आलेली नाही. ब्रिक्सच्या अहवालानुसार, भारताचे तृणधान्य उत्पादन २०२४ मधील ३३२.०५ दशलक्ष टनांवरून २०२५ मध्ये ३२४.७९ दशलक्ष टनांवर आले. म्हणजेच सुमारे २.२ टक्क्यांची घट झाली. याउलट चीनने २०२५ मध्ये तृणधान्य उत्पादनात १.२ टक्क्यांची वाढ नोंदवत ६६०.२१ दशलक्ष टन उत्पादन घेतले.

ब्राझील, रशियाच्या तुलनेतही भारताची स्थिती

अहवालात इतर ब्रिक्स देशांची तुलनेने मर्यादित आकडेवारी देण्यात आली आहे. मात्र ब्राझीलशी तुलना केली असता, २०२५ मध्ये ब्राझीलचे तांदळाचे प्रतिहेक्टर उत्पादन ७,२३४ किलो होते. हे भारताच्या तुलनेत जवळपास अडीचपट आहे. ब्राझीलचे मक्याचे प्रतिहेक्टर उत्पादन ६,३६४ किलो होते, जे भारतापेक्षा सुमारे ६६ टक्क्यांनी अधिक आहे. मात्र गव्हाच्या बाबतीत भारताची स्थिती तुलनेने चांगली आहे. भारताचे गव्हाचे प्रतिहेक्टर उत्पादन ३,५९१ किलो होते, तर ब्राझीलमध्ये ते ३,२३० किलो होते. रशियातही २०२५ मध्ये गव्हाचे प्रतिहेक्टर उत्पादन ३,४३१ किलो नोंदवले गेले.

भारताकडे सर्वाधिक लागवडीयोग्य जमीन

ब्रिक्सच्या प्रकाशनानुसार, भारताकडे १५४ दशलक्ष हेक्टर लागवडीयोग्य जमीन आहे. चीनकडे १२९ दशलक्ष हेक्टर, रशियाकडे १२६ दशलक्ष हेक्टर आणि ब्राझीलकडे ९७ दशलक्ष हेक्टर लागवडीयोग्य क्षेत्र आहे. कृषी उत्पादकतेचा मुद्दा जूनमध्ये इंदूर येथे झालेल्या ब्रिक्स कृषिमंत्र्यांच्या बैठकीतही चर्चेत आला होता. संयुक्त घोषणापत्रात हवामानाशी संबंधित धोके, जमीन व पाण्याची गुणवत्ता खालावणे, जैवविविधतेचा ऱ्हास आणि पुरवठा साखळीतील अडथळ्यांसोबत ‘कमी कृषी उत्पादकता’ हे ब्रिक्स देशांसमोरील प्रमुख आव्हान असल्याचे नमूद करण्यात आले. कृषी तंत्रज्ञान, दर्जेदार निविष्ठा, संशोधन, यांत्रिकीकरण, डिजिटल शेती आणि शेतपातळीवरील कार्यक्षमता वाढविण्यासाठी परस्पर सहकार्य करण्याचे आवाहन ब्रिक्स देशांनी संयुक्त निवेदनातून केले आहे.

Agriculture
PM Modi - Aga Khan V meet | प्रिन्स रहीम आगा खान यांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news