Supreme Court Child Custody Judgment : मुले पालकांची खेळणी नाहीत : 'ताबा' प्रकरणी सुप्रीम कोर्ट नेमकं काय म्‍हणाले?

Supreme Court child custody judgment : पालकांच्या कायदेशीर अधिकारांपेक्षा मुलांचे कल्याण हे सर्वोच्च प्राधान्य असायला हवे
Supreme Court child custody judgment
supreme courtFile Photo
Published on: 
Updated on: 

Supreme Court child custody judgment : "घटस्‍फोटानंतर वडिलांनाच मुलांचा ताबा (कस्टडी) मिळावा, हा नियम नेहमीच अपवादांना अधीन असतो आणि तो सर्वत्र लागू होत नाही. पालकत्व हक्काच्या (कस्टडी) वादात, पालकांच्या कायदेशीर अधिकारांपेक्षा मुलांचे कल्याण हे सर्वोच्च प्राधान्य असायला हवे मुले ही केवळ मालमत्ता किंवा पालकांसाठी खेळणी नाहीत,” असे निरीक्षण नोंदवत सर्वोच्‍च न्‍यायालयाने न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि न्यायमूर्ती अपरेश कुमार सिंह यांच्या खंडपीठाने दोन अल्‍पवयीन मुलांचा ताबा वडिलांकडे सोपविण्‍याचा उच्‍च न्‍यायालयाचा निर्णय रद्द केला.

उच्‍च न्‍यायालयाच्‍या निर्णयाविरोधात आईची सुप्रीम कोर्टात धाव

'लाईव्‍हलॉ'ने दिलेल्‍या वृत्तानुसार, दाम्‍पत्‍याचा विवाह २००९ मध्‍ये झाला होता. मात्र २०१४ मध्‍ये दोघेही विभक्‍त झाले. क्रौर्याच्या आरोपावरून पतीने घटस्फोट मिळवला.२०१८ मध्ये मदुराई येथील कौटुंबिक न्यायालयाने पत्नीचा पोटगीचा दावा मंजूर केला, मात्र 'पालक आणि पाल्य कायदा, १८९०' अंतर्गत दोन्ही मुलांचा ताबा वडिलांकडे सोपवला. पतीच्या मानसिक स्थितीबाबत पत्नीने केलेल्या आरोपांत कोणतेही तथ्य नसल्याचे नमूद करत मद्रास उच्च न्यायालयाने कौटुंबिक न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला होता. या निर्णयाला पत्‍नीने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. सर्वोच्च न्यायालयाने २०२५ मध्ये उच्च न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती दिली, त्यामुळे मुले सुरुवातीपासून आईकडेच राहिली.

Supreme Court child custody judgment
Supreme Court : अलाहाबाद हायकोर्टाचा 'हिजाब अनिवार्य नाही' निर्णय 'पूर्वदाखला' मानला जाणार नाही; सुप्रीम कोर्टाची नोटीस

न्यायालयाचा मुलांशी थेट संवाद

प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन सर्वोच्च न्यायालयाने आई-वडील आणि दोन्ही मुलांना न्यायालयात बोलावले. पालकांच्या अनुपस्थितीत न्यायाधीशांनी १६ आणि १४ वर्षांच्या दोन्ही मुलांशी थेट संवाद साधला. त्‍यांची मते जाणून घेतली. यावेळी मुलांनी वडिलांसोबत राहण्यास स्पष्ट नकार दिला. तसेच आईसोबतच राहण्याची इच्छा व्यक्त केली. आपला सांभाळ आई आणि आजी-आजोबांनीच केला असून, वडिलांची फक्त चार-पाच वेळाच भेट झाल्याचे व लहानपणी केवळ दोन वर्षे त्यांच्यासोबत राहिल्याचे मुलांनी सांगितले. दोन्ही मुले समजूतदार असून त्यांनी अत्यंत आत्मविश्वासाने आपली बाजू मांडल्याचे न्यायालयाने निकालात नोंदवले.

Supreme Court child custody judgment
Supreme Court : "बाहुबलीसारखे वागणे थांबवा"; सर्वोच्च न्यायालयाने सत्र न्यायाधीशांना फटकारले

तांत्रिक कायद्यापेक्षा मानवी पैलू महत्त्वाचे

'पालक आणि पाल्य कायदा, १८९०' च्या तरतुदींचा दाखला देताना न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि न्यायमूर्ती अपरेश कुमार सिंह यांच्या खंडपीठाने स्‍पष्‍ट केले की, घटस्‍फोट प्रकरणात मुलांचा ताबा देताना मुलांचे कल्याण हाच सर्वोच्च विचार असतो. सुधारित कलम १९ (ब) नुसार वडिलांप्रमाणेच आईदेखील नैसर्गिक पालक आहे. या कायद्याचा उद्देश केवळ मुलांचा प्रत्यक्ष ताबा देणे हा नसून, त्यांचे आरोग्य, पालनपोषण आणि शिक्षणाच्या हक्कांचे रक्षण करणे हा आहे. पालकांच्या परस्परविरोधी दाव्यांवर निर्णय देताना न्यायालयाने केवळ तांत्रिक कायद्याचा विचार न करता मानवी पैलूंचाही विचार करणे आवश्यक असते, असेही खंडपीठाने नमूद केले.

Supreme Court child custody judgment
Supreme Court : अविवाहित पालकांच्या मुलावर आईचाच हक्क अधिक; वडिलांचा दावा दुय्यम: सर्वोच्च न्यायालय

आईसोबतचे भावनिक नाते महत्त्वाचे

पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या आणि खासगी नोकरी करणाऱ्या आईने घटस्फोटानंतरही मुलांच्या संगोपनात व शिक्षणात कोणतीही कमतरता भासू दिली नाही. जन्मापासून आईसोबत राहिल्याने मुलांचे तिच्याशी घट्ट भावनिक नाते तयार झाले आहे. वडील व्यवसायातून आर्थिकदृष्ट्या सक्षम असून शिक्षणाचा खर्च उचलण्यास तयार असले आणि त्यांना मुलांना भेटू न दिल्याची त्यांची तक्रार रास्त असली, तरी सध्याच्या वातावरणातून मुलांना वेगळे करणे त्यांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी हिताचे ठरणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले. यासाठी न्यायालयाने 'अंजली कपूर विरुद्ध राजीव बैजल' यासह अन्य महत्त्वाच्या न्यायनिवाड्यांचा संदर्भ दिला.

Supreme Court child custody judgment
Supreme Court : घर खरेदीदारांना दिलासा! कर्जवसुली आदेशापूर्वी बिल्डर-बँक 'साटेलोटे' तपासण्‍याचे सुप्रीम कोर्टाचे निर्देश

वडिलांना भेटण्याची मुभा

मुलांच्या संतुलित विकासासाठी त्यांना वडिलांचे प्रेम मिळणेही तितकेच गरजेचे असल्याचे मत न्यायालयाने व्यक्त केले. त्यानुसार, दर महिन्याच्या दुसऱ्या शनिवार आणि रविवारी सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत मदुराई येथील गांधी संग्रहालयात वडिलांना मुलांना भेटता येईल. आईने या भेटीसाठी सहकार्य करावे, असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.