

नवी दिल्ली ःराखीव प्रवर्गातील ज्या उमेदवारांनी सामान्य प्रवर्गाच्या कटऑफपेक्षा जास्त गुण मिळवले आहेत, त्यांचे समायोजन अनारक्षित जागांवरच केले पाहिजे, असे सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी स्पष्ट केले.
एका महत्त्वपूर्ण कायदेशीर तत्त्वाची पुष्टी करताना न्यायमूर्ती एम. एम. सुंदरेश आणि न्यायमूर्ती सतीश चंद्र शर्मा यांच्या खंडपीठाने म्हटले की, ‘आता हे कायद्याने प्रस्थापित झाले आहे की, राखीव प्रवर्गातील उमेदवार ज्याने सामान्य प्रवर्गाच्या कटऑफपेक्षा जास्त गुण मिळवले आहेत, त्याला खुल्या किंवा अनारक्षित रिक्त पदावर पात्र मानले जावे.
2020 मध्ये केरळ उच्च न्यायालयाने दिलेल्या एका निकालाला बाजूला सारताना सर्वोच्च न्यायालयाने हे निरीक्षण नोंदवले. उच्च न्यायालयाने एअरपोर्ट ॲथॉरिटी ऑफ इंडियाला गुणवंत राखीव प्रवर्ग उमेदवारांना सामान्य यादीतून वगळून अनारक्षित उमेदवाराची नियुक्ती करण्याचे निर्देश दिले होते. सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय आता उलटवून लावला आहे.
सर्वेाच्च न्यायालयाची निरीक्षणे
अनारक्षित प्रवर्ग हा सामान्य उमेदवारांसाठीचा कोटा नसून, तो केवळ गुणवत्तेवर आधारित सर्वांसाठी उपलब्ध असलेला खुला संच आहे.
हा गुणवत्तेवर आधारित बदल अनुच्छेद 14 (कायद्यासमोर समानता) आणि अनुच्छेद 16 (सार्वजनिक रोजगारात संधीची समानता) यांची आवश्यकता आहे.
जेव्हा एखादा राखीव प्रवर्गातील उमेदवार सामान्य उमेदवारांपेक्षा चांगली कामगिरी करतो, तेव्हा त्याला खुल्या प्रवर्गातील उमेदवार मानले जाणे अनिवार्य आहे.
मूळ राखीव कोट्यातील जागा त्या प्रवर्गातील पुढील गुणवंत उमेदवारांसाठी उपलब्ध राहतात.