

मुंबई : मृणालिनी नानिवडेकर
महाराष्ट्रातील जनतेने सर्वांगीण विकासाच्या आशेने महायुतीला मतदान केले आहे. हा विश्वास सार्थ ठरवत विकासाला चालना देणारा चेहरा या एकाच निकषाखाली ठिकठिकाणचे महापौर निवडले जातील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. महापौर निवडताना कोणतेही दबाव तंत्र चालणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
शिवसेनाप्रनुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षात शिवसेनेचा महापौर व्हावा, अशी मागणी समोर आली आहे, याकडे लक्ष वेधताच आम्ही सगळेच बाळासाहेबांचे पाईक आहोत, असे म्हणत त्यांनी या मागणीला अप्रत्यक्षपणे वाटाण्याच्या अक्षता लावल्या. मी आणि एकनाथ शिंदे अत्यंत मैत्रीपूर्ण वातावरणात या संबंधातले निर्णय घेऊ, असेही ते म्हणाले.
महाराष्ट्राच्या सर्व भागांत रोजगारप्रधान, आधुनिक उद्योग यावेत, यावर शासनाचा भर आहे. मी महाराष्ट्राच्या विकासासाठी सदैव कार्यरत असणारा मुख्यमंत्री असून, ठिकठिकाणचे महापौरही त्याच निकषावर निवडले जातील, असेही ते म्हणाले.
आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहोत, महाराष्ट्राचा विकास हे स्वप्न प्रत्यक्षात आणतो आहोत, त्यामुळे महापौर कोणाचा? ही चर्चा अत्यंत व्यर्थ असून, विकासाला चालना देणारा चेहरा महापौर होईल एवढाच निकष असेल. त्या त्या ठिकाणी आरक्षणानुसार महापौर निवडले जातील एवढेच खरे. महाराष्ट्राच्या जनतेने बदल्याच्या राजकारणाला कोणताही थारा न देता विकासाच्या दिशेने कौल दिला आहे. त्यानुसार शहरांचा कायापालट करून आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रगतीचा आढावा घेत शहरे गतिमान करणे हा उद्देश आहे.
जिल्हा परिषद निवडणुकांबद्दलची रणनीतीदेखील दावोसहून परतल्यानंतर ठरेल. मात्र, जनतेला मध्यवर्ती केंद्रबिंदू मानून विकासाच्या दृष्टीनेच आवश्यक पावले टाकणे हेच युती करण्यामागचे उद्दिष्ट असेल, असेही ते म्हणाले. सध्या उपलब्ध असलेल्या कार्यक्रमानुसार मुख्यमंत्री 25 च्या मध्यरात्री महाराष्ट्रात परत येणार आहेत. आज संपूर्ण दिवस शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे हे जन्मशताब्दी वर्ष असल्यामुळे महापौर शिवसैनिक व्हावा, अशी भूमिका मांडली जात होती. तसेच, अडीच-अडीच वर्षांचे पद वाटप व्हावे, असाही आग्रह असल्याचे सांगितले जात होते. त्यावर मुख्यमंत्री यांनी मी परत आल्यानंतर योग्य ती चर्चा केली जाईल.
महायुती एकसंध आहे आणि महापौर किंवा कोणत्याही पदाबाबत दबावाचे राजकारण होणार नाही, असेही ‘पुढारी’शी बोलताना त्यांनी स्पष्ट केले. सोडत निघाल्यावर, आरक्षण लक्षात घेता महापौर निवडीची प्रक्रिया सुरू होईल, असे नमूद करत त्यांनी महाराष्ट्रातील जनतेचे आभार मानले. पुणे, पिंपरी-चिंचवड, तसेच सांगली, कोल्हापूर, इचलकरंजी या पश्चिम महाराष्ट्रातील जनतेनेही यावेळी आम्हाला विकासाची संधी दिली आहे, असेही ते म्हणाले.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नगरसेवकांना पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवले आहे, याकडे लक्ष वेधताच ते म्हणाले, यामागचा उद्देश खरे तर मला माहीत नाही. आम्ही दोघे, मी आणि शिंदे परस्परांच्या संपर्कात आहोत. महापौरपदाबाबत कोणत्याही प्रकारचा दबाव कुठल्याही परिस्थितीत आता कोणीही टाकू शकणार नाही.