Mumbai Mayor Formula : मुंबईचे महापौरपद अडीच - अडीच वर्षे

शिंदे यांचा फॉर्म्युला : स्थायी समिती सभापतीपदाचाही हट्ट; फुटीच्या भीतीने 29 नगरसेवक ताजमध्ये हलवले
Mumbai Mayor Formula
मुंबईचे महापौरपद अडीच - अडीच वर्षे(File Photo)
Published on
Updated on

मुंबई ः नरेश कदम

ठाकरेंची मुंबई महापालिकेतील तीन दशकांची सत्ता उलथवून लावत भाजप-शिंदे सेना महायुतीने काठावरचे बहुमत मिळवत सत्ता काबीज केल्यानंतर आता मुंबईच्या सत्तेचा सारीपाट नव्याने मांडला जात असून, मुंबईचे महापौरपद अडीच अडीच वर्षे वाटून घेऊ, असा फॉर्म्युला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपसमोर ठेवल्याचे वृत्त आहे. त्याचवेळी स्थायी समितीच्या सभापतीपदाचाही हट्ट त्यांनी धरला आहे.

भाजपसारखी महाशक्ती पाठीशी असल्याने ठाकरेंची शिवसेना बिनधास्त फोडणारे उपमुख्यमंत्री शिंदे आता महापालिका निकालानंतर मात्र नगरसेवक फुटण्याच्या भीतीने सावध झाले आहेत. मुंबईतील संख्याबळ पाहता शिंदे यांच्या पाठिंब्याशिवाय भाजपचा महापौर होऊ शकत नाही. मात्र, सत्तेच्या वाटाघाटी जुळल्या नाहीत, तर हीच महाशक्ती आपले नगरसेवक फोडू शकते हे लक्षात घेत शिंदे यांनी आपले सर्व 29 नवनिर्वाचित नगरसेवक शनिवारी मुंबईतच एका पंचतारांकित हॉटेलात हलवले.

Mumbai Mayor Formula
MNS vote share decline : मुंबईत मनसेच्या मतटक्क्यांत मोठी घट

हे सर्व नगरसेवक प्रचार करून, निवडणूक लढवून दमले असल्याने त्यांना फ्रेश होण्याची गरज असल्याचे शिंदे सेनेकडून सांगितले जात असले तरी मुंबई महापालिकेतील सत्तेच्या वाटाघाटी पुढील तीन दिवसांत पूर्ण होतील आणि तोपर्यंत या नगरसेवकांचा मुक्काम वांद्रेतील ‌‘ ताज लँड एंड‌’ या पंचतारांकित हॉटेलमध्ये असेल, असे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.

भाजपने मुंबई महापालिकेत सर्वाधिक 89 जागा जिंकल्या असल्या तरी सत्तेसाठीचा 114 हा जादूई आकडा गाठण्यासाठी त्यांना शिंदे गटाच्या 29 नगरसेवकांची गरज आहे. शिंदे सेनेला बाजूला ठेवून भाजपला आपला महापौर निवडून आणायचा असेल तर 25 नगरसेवकांचा पाठिंबा मिळवावा लागेल. ही संख्या भाजपला शिंदे यांच्याशिवाय दुसरीकडून मिळण्याची सुतराम शक्यता नाही. भाजपची ही अपरिहार्यता लक्षात घेऊन उपमुख्यमंत्री शिंदे यांनी आपले पत्ते सावधपणे टाकायला सुरुवात केली आहे.

मुंबईचे महापौरपद फिफ्टी-फिफ्टी विभागण्याचा प्रस्ताव शिंदे यांनी भाजपला दिला असून, महापालिकेचे सर्व आर्थिक निर्णय घेणाऱ्या स्थायी समितीचे सभापतीपदही शिंदे यांनी मागितले आहे. सर्वांत मोठा पक्ष ठरलेला भाजप ही दोन्ही पदे खचितच सोडणार नाही. यापैकी एक पद घेऊन शिंदे महापालिकेतील सत्तासहभागास तयार होतील, असे सूत्रांचे म्हणणे आहे. मुंबईसोबतच नवी मुंबई आणि कल्याण-डोंबिवलीतील सत्तावाटपही आपल्या सोयीने करून घेण्याच्या प्रयत्नात शिंदे आहेत.

Mumbai Mayor Formula
Uddhav Thackeray : भाजपने फक्त कागदावर संपवली शिवसेना

सावध भाजपचाही इशारा

ठाणे आणि कल्याण डोंबिवली महापालिकेत भाजपने सत्तेचा निम्मा वाटा मागितला आहे. तसेच छ्त्रपती संभाजी नगर महापालिकेतही भाजपच्या शिंदे यांना बाजूला ठेवून स्वबळावर आपला महापौर बनविण्याच्या हालचाली सुरु आहेत. ठाण्यात आम्हाला सत्तेत निम्मा वाटा पाहिजे अन्यथा आम्ही ठाण्यात विरोधी बाकावर बसू, असा इशारा भाजपच्या स्थानिक नेत्यांनी दिला आहे. त्यामुळे शिंदे यांनी , मुंबईच्या सत्तेत अडीच वर्षे महापौरपद आणि अडीच वर्षे स्थायी समिती असा हट्ट धरला असल्याचे कळते. त्यामुळे भाजप सावध पावले टाकत आहे.

2024 च्या विधानसभा निवडणुकीत राज्यात भाजप , शिंदे गट , अजित पवार गट महायुतीची सत्ता आली तेव्हा मुख्यमंत्रीपदासाठी शिंदे यांनी शेवटपर्यंत हट्ट सोडला नव्हता. देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधी पूर्वी एक तास आधी राज्यपालांकडे पाठींब्याचे पत्र त्यांनी दिले होते. त्यामुळे आता भाजपला मुंबई महापालिकेच्या सत्तेत शिंदे यांच्या शिवाय दुसरा पर्याय नाही. त्यामुळे शिंदे यांचे 29 नगरसेवक खूप महत्वाचे आहेत. महापौरपदासाठी पुढील आठवड्यात नगरविकास खात्याकडून सोडत काढली जाईल. त्यानंतर दहा दिवसांनी महापौरपदासाठीची निवडणूक लागेल. त्यामुळे हा काळ मोठा आहे त्यामुळे शिंदे खबरदारी घेत असून, त्याचाच एक भाग म्हणून आपले नगरसेवक त्यांनी पंचतारांकित बंदोबस्तात हलवले.

वादग्रस्त फिफ्टी-फिफ्टी

महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद अडीच-अडीच वर्षे विभागण्याचा शब्द भाजपने दिला आणि तो मोडला, असा आरोप करत उद्धव ठाकरे महायुतीतून बाहेर पडले आणि पुढे महाविकास आघाडीचे सरकार आले. अडीच वर्षांचेच मुख्यमंत्रीपद देत भाजपने मग शिंदे यांना हाताशी धरून शिवसेनाच फोडली. आता महाराष्ट्राचे नाही तर मुंबईच्या सत्तेचे राजकारणही याच वादग्रस्त फिफ्टी-फिफ्टी वळणावर आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

मुख्यमंत्री परतल्यानंतर ठरणार महापौर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावर गेले आहेत.ते आल्यानंतर आरक्षण सोडतीनुसार कोणाला महापौर करायचे ते ठरेल. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबईचा महापौर जानेवारीच्या अखेरीस किंवा फेब्रुवारीच्या एक दोन तारखेकडे निश्चित होईल.मुंबईत पहिल्यांदाच भारतीय जनता पक्षाचा महापौर होत आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना महापौर पद आणि स्थायी समिती अध्यक्षपद अडीच वर्षांसाठी हवे आहे. त्यामुळे या संदर्भातला निर्णय काय होतो याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

आरक्षण सोडत 22 जानेवारीला?

महाराष्ट्रातील 29 महानगरपालिकांचे निकाल लागले असले तरी प्रथम नागरिक कोण होणार हे ठरवणारी महापौर पदाची सोडत अद्याप बाकी आहे. नगर विकास खात्यात तर्फे आयोजित केली जाणारी ही सोडत येत्या 22 जानेवारीला होणार असल्याचे विश्वसनीयरित्या समजते. सोडत निघाल्यानंतर मुंबईचे महापौरपद कोणत्या प्रवर्गासाठी आरक्षित होईल की खुले असेल याचा निर्णय लागणार आहे. त्यानंतर या संदर्भातील राजकीय हालचालींना वेग येईल. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबईचा महापौर जानेवारीच्या अखेरीस किंवा फेब्रुवारीच्या एक दोन तारखेकडे निश्चित होईल.

छत्रपती संभाजीनगरात भाजप शिंदे गटाला बाजूला ठेवणार?

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यातील पाच महापालिकांपैकी लातूर येथे काँग्रेसने आणि परभणी येथे शिवसेना ठाकरे गटाने बहुमत मिळविले. तर नांदेड आणि जालना महापालिकेत भाजपने स्पष्ट बहुमतासह सत्ता काबीज केली. छत्रपती संभाजीनगरात भाजप बहुमतापासून एक जागा दूर राहिले. या ठिकाणी भाजपने मित्रपक्ष शिवसेनेला बाजूला ठेवून छोट्या पक्षांच्या मदतीने सत्ता मिळविण्याचा प्रयत्न चालविला आहे. त्या अनुषंगाने भाजपने छोट्या पक्षांसोबतच चर्चाही सुरू केली आहे.

महापौरपदाची सोडत 22 जानेवारीला

येत्या मंगळवारी 20 जानेवारी किंवा बुधवारी 21 जानेवारीला नगरविकास खात्याकडून 29 महापालिकांच्या महापौरपदाच्या आरक्षणाची सोडत काढली जाण्याची दाट शक्यता आहे. त्यासाठी संवर्गनिहाय निवडून आलेल्या उमेदवारांची माहिती मागवण्यात आली असून, सोमवारी दुपारी त्यावर नगरविकास मंत्रालयात चर्चा होईल. त्यानंतर मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीत किंवा बैठक संपल्यानंतर महापौरपदाच्या आरक्षणाची सोडत काढली जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.

  • मुंबईत भाजपचे 89, तर शिंदे सेनेचे 29 सदस्य

  • महापौरपदासाठी आवश्यक आकडा 114

  • शिंदेसेनेला वगळून महापौर करायचा झाल्यास भाजपला आणखी 25 नगरसेवकांची गरज

शिंदे गटाने निवडून आलेल्या नगरसेवकांना हॉटेलमध्ये ठेवले आहे. जे निवडून आलेत त्यामध्ये आमचे किती आहेत? त्यांना विचारा हॉटेलमध्ये का ठेवले? श्रीमंत महापालिकेच्या सत्तासंघर्षात शिंदे गटात पुन्हा फूट पडू शकते. आता, फोडणाऱ्यांनाच आपले लोक फुटण्याची भीती आहे. एकदा फुटलेच आहेत तर पुन्हा फुटू शकतात हे त्यांना माहीत आहे.

उद्धव ठाकरे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news