'मुलीचा संसार वाचवण्याची आई-वडिलांची चिंता तिला मृत्यूच्या खाईत ढकलतेय'; सर्वोच्च न्यायालयाची टिप्पणी

हुंड्यासाठी पत्नीची हत्या करणाऱ्या एका आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावताना सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी हे महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवले.
Supreme Court
Supreme Court Pudhari
Published on
Updated on

Supreme Court judgment on dowry

नवी दिल्ली: "मुलीचा संसार कसातरी टिकावा, या चिंतेपोटी पालक अनेकदा तिला मृत्यूच्या खाईत ढकलतात. सासरच्या छळाबाबत मुलीने वारंवार तक्रार करूनही, केवळ सामाजिक प्रतिष्ठेसाठी तिला पुन्हा सासरी पाठवले जाते," अशी टिप्पणी सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी केली. हुंड्यासाठी पत्नीची हत्या करणाऱ्या एका आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावताना सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी (दि. २६) हे महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवले.

देशभरात हुंडाबळीच्या वाढत्या घटनांबद्दल चिंता व्यक्त करत, सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाच्या निकालाची सुरुवातच समाजाला विचार करायला लावणाऱ्या एका प्रश्नाने केली. न्यायमूर्ती पी. के. मिश्रा आणि न्यायमूर्ती के. व्ही. विश्वनाथन यांच्या खंडपीठाने विचारले, "तरुण सोमा आचार्यचा जीव वाचवता आला असता का? केवळ सामाजिक बदनामीच्या भीतीने आपण सोमाला लांडग्यांच्या स्वाधीन केले का?"

Supreme Court
Supreme court | वडिलांच्या संपत्तीवरील मुलींच्‍या हक्कांना २००५ मधील कायद्यातील सुधारणेमुळे धक्का नाही : सर्वोच्‍च न्‍यायालय

प्रकरण काय? न्यायालयाने हे निरीक्षण का नोंदवले?

न्यायालयाला खटल्याच्या सुनावणीदरम्यान असे आढळले की, मृत सोमाने तिच्यावर होणाऱ्या छळाबाबत वारंवार आपल्या पालकांना सांगितले होते. परंतु घरातील वडीलधाऱ्यांनी पती-पत्नीत समेट घडवून आणला आणि तिला पुन्हा सासरी पाठवले.

न्यायमूर्ती विश्वनाथन म्हणाले, "तिने तिला वाचवण्यासाठी तिच्या आई-वडिलांकडे वारंवार विनवणी केली होती. ती माहेरी येऊन काही दिवस राहिलीही होती. परंतु, जेव्हा जेव्हा तिने होणाऱ्या छळाबद्दल सांगितलं तेव्हा केवळ तडजोड करून तिला परत सासरी पाठवण्याचेच प्रयत्न झाले."

नातेवाइकांची खोटी आशा मुलीच्या जीवावर बेतली

सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की, "या प्रकरणात गावातील प्रतिष्ठित मंडळींनी मध्यस्थी केली होती आणि कथित तडजोडीनंतर ठराव मंजूर केले होते. सोमाच्या जवळच्या आणि प्रिय व्यक्तींना भाबडेपणाने वाटले की, परिस्थिती हळूहळू सुधारेल. ते एका खोट्या आशेवर होते. पण, जेव्हा सासरच्या घरी सोमाचा मृत्यू झाला, तेव्हा त्यांचे डोळे उघडले."

न्यायालयाला काय आढळले?

लग्नानंतर अवघ्या १५ महिन्यांतच सोमाचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत सासरी आढळला होता. पतीने तिने आत्महत्या केल्याचा दावा केला होता; मात्र न्यायालयाने वैद्यकीय आणि इतर पुराव्यांच्या आधारे हा दावा फेटाळून लावला. हे प्रकरण हुंडाबळीशी संबंधित हत्येचेच असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. न्यायालयाने नमूद केले की, मोटारसायकल, टीव्ही आणि इतर वस्तूंच्या मागणीसाठी सोमाचा छळ केला जात होता आणि तिच्या पालकांनी यातील काही मागण्या पूर्णही केल्या होत्या.

"मृतदेहावर आढळलेल्या जखमा या सामान्य आत्महत्येच्या प्रकरणातील नसून, त्या व्यक्तीने स्वतःला करून घेतलेल्या जखमा नक्कीच नाहीत. वैद्यकीय पुराव्यांवरून स्पष्ट होते की, मृत्यूच्या आधी सोमाला अमानुष मारहाण करण्यात आली होती. त्यामुळे आत्महत्येचा दावा खोटा ठरत असून, हा गळफास देऊन हत्येचा प्रकार असल्याचे स्पष्ट होते," असे न्यायालयाने स्पष्ट केले.

Supreme Court
Divorce Case Fraud | 'डिव्होर्स'साठी नात्याला 'काळीमा'... नणंदेला 'दुसरी पत्नी' सांगून मिळवला घटस्फोट!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news