

supreme court slams woman 12 crore alimony bmw mumbai flat- demand
नवी दिल्ली : पतीकडून पोटगीत १२ कोटी रुपये, मुंबईतील फ्लॅट आणि बीएमडब्ल्यू कारची मागणी करणाऱ्या महिलेला सर्वोच्च न्यायालयाने फटकारले. सुशिक्षित महिलांनी त्यांच्या देखभालीसाठी पतीच्या पैशावर अवलंबून राहण्यापेक्षा स्वतःसाठी कमवावे, असे निरीक्षण सरन्यायाधीशांनी नोंदवले. या प्रकरणात महिलेने लग्नाच्या १८ महिन्यांत पतीपासून वेगळे झाल्यानंतर ही पोटगीची मागणी केली. न्यायालयाने या प्रकरणावर आदेश राखून ठेवला.
सुनावणीदरम्यान, सरन्यायाधीश भूषण गवई यांनी महिलेच्या पोटगी मागणीवर प्रश्न उपस्थित केला. तुमचे लग्न फक्त १८ महिने टिकले आणि आता तुम्हाला बीएमडब्ल्यू देखील हवी आहे? दरमहा एक कोटी देखील पाहिजे? असे सवाल सरन्यायाधीशांनी केले. पोटगीची मागणी करणारी महिला एमबीए आणि आयटी तज्ञ आहे.
यावर महिलेने प्रतिवाद केला की, त्यांचे पती खूप श्रीमंत आहेत. महिलेने आरोप केला की, पतीमुळे तिची नोकरी गेली आणि त्याने तिच्याविरुद्ध खोटा एफआयआर दाखल केला. यावर सरन्यायाधीश गवई यांनी आश्वासन दिले की, एफआयआर रद्द करू. यानंतर न्यायालयाने पती आणि पत्नीला एकमेकांविरुद्ध कोणतीही फौजदारी कारवाई करु नये असे निर्देश दिले. न्यायालयाने महिलेला दोन पर्याय दिले, एकतर फ्लॅट स्वीकारा किंवा ४ कोटी रुपये घ्या आणि पुणे, हैदराबाद किंवा बेंगळुरूसारख्या आयटी हबमध्ये नोकरी मिळवा.