

Supreme Court
नवी दिल्ली : ज्या व्यक्तीचा घटस्फोटाचा खटला लढवत होती, त्याच्याशीच शारीरिक संबंध ठेवल्याने एका महिला वकिलाला सर्वोच्च न्यायालयाने चांगलेच झापले. "एक वकील म्हणून तुमचे हे वागणे कसे असू शकते? ज्या व्यक्तीचा घटस्फोटाचा खटला तुम्ही लढवत होतात, त्याच व्यक्तीसोबत तुम्ही शारीरिक संबंध कसे ठेवले?" असा सवाल न्यायालयाने केला. महिला वकिलाने दाखल केलेल्या या फौजदारी प्रकरणात न्यायालयाने संबंधित व्यक्तीला अटकपूर्व जामीन मंजूर केला.
'बार अँड बेंच'च्या वृत्तानुसार, न्यायमूर्ती बी.व्ही. नागरत्ना यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने महिला वकिलाला फटकारले. संबधीत व्यक्ती अद्याप कायदेशीररित्या विवाहित होती आणि तिचा घटस्फोटाचा खटला सुरू होता, अशा वेळी तिच्याशी जवळीक साधण्याच्या वकिलाच्या नैतिकतेवर न्यायालयाने प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
या प्रकरणात न्यायालयाने आरोपीला दिलासा दिला आहे. दोघांमधील संबंध परस्पर संमतीने होते. दोघांपैकी कोणीही एकमेकांशी लग्न करण्यास तयार नव्हते. महिला वकिलाने केलेली फौजदारी तक्रार अनावश्यक होती, असे खंडपीठाने नमूद केले. आरोपी सध्या लंडनमध्ये वास्तव्यास असून, तो भारतात आल्यास त्याला अटक करता येणार नाही, असे खंडपीठाने स्पष्ट केले. न्यायालयाने महिला वकिलाला विचारले की, "तुम्ही स्वतःच्याच अशिलासोबत शारीरिक संबंध का ठेवले? अशा वादात पडण्याची तुम्हाला काय गरज होती?"
न्यायालयाने पुढे म्हटले की, "तुमच्याकडून व्यावसायिक जबाबदारी आणि प्रतिष्ठेची अपेक्षा केली जाते. तुम्ही एका व्यक्तीला घटस्फोट मिळवून देण्यास मदत करत होतात आणि त्याच दरम्यान तुमचे त्याच्याशी संबंध निर्माण झाले. ही परिस्थिती तेव्हा होती जेव्हा त्या व्यक्तीचा घटस्फोटही झाला नव्हता. एखाद्या वकीलाबाबत आम्ही असा विचारही करू शकत नाही."
आरोपीच्या वकिलाने न्यायालयात दावा केला की, संबंधित महिला वकिलाने आतापर्यंत चार वेगवेगळ्या व्यक्तींविरुद्ध लैंगिक शोषणाचे गुन्हे दाखल केले आहेत. बॉम्बे हायकोर्टानेही यापूर्वी तिच्या वर्तनावर प्रश्न उपस्थित करत चौकशीचे आदेश दिले होते. न्यायालयाने महिला वकिलाला सुनावले की, "तुम्ही वकील आहात आणि तुम्हाला हे माहित असायला हवे की, घटस्फोट झाल्याशिवाय तो व्यक्ती कोणाशीही लग्न करू शकत नाही. तुम्ही सुशिक्षित वकील आहात, कोणी अशिक्षित महिला नाही."