

Shocker News student jumps off school building:
आठवीत शिकणाऱ्या नॅशनल स्केटिंग प्लेअरनं खासगी शाळेच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आपलं जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. ही घटना मध्य प्रदेशातील रतलाम येथील डोंगरे नगर मध्ये शुक्रवारी घडली. हा मुलगा गंभीररित्या जखमी झाला आहे. त्याला खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. त्याची प्रकृती आता स्थीर असल्याचं सांगण्यात येत आहे.
शाळेच्या प्रशासनानं दिलेल्या माहितीनुसार या मुलानं गुरूवारी त्याचा मोबाईल शाळेत आणला होता. तो वर्गात व्हिडिओ शूट करत होता. त्यानंतर त्यानं हा व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केला. शाळा प्रशासनाला हा व्हिडिओ आढळून आला, त्यानंतर शाळेनं त्या मुलाच्या पालकांना शुक्रवारी शाळेत बोलवून घेतलं. त्या मुलानं शाळेचा नियम मोडला होता.
दरम्यान, शाळेच्या सीसीटीव्ही फुटेजनुसार १३ वर्षाचा मुलगा हा मुख्याध्यापकांच्या रूममध्ये आत जाताना दिसतो. तिथं हा मुलगा चार मिनिटे घालवतो आणि आपल्या चुकीबद्दल तब्बल ५२ वेळा सॉरी म्हणतो.
या मुलानं नंतर सांगितलं की मुख्याध्यापकांनी त्याला त्याचं करिअर संपवण्याची धमकी देत होते. त्याला सस्पेंड करत त्याची सर्व पदके काढून घेण्याची धमकी देत होते. हा मुलगा राष्ट्रीय स्तरावर स्केटिंग खेळला आहे. तो दोनवेळा राष्ट्रीय स्तरावर खेळला आहे. मुख्याध्यापकांच्या या धमकीनंतर मुलगा हादरून गेला होता.
काही क्षणात हा मुलगा मुख्याध्यापकाच्या कार्यालयातून बाहेर पळत आला आणि त्यानं तिसऱ्या मजल्यावरून खाली उडी मारली. धक्कादायक बाब म्हणजे मुलाचे वडील हे शाळाच्या वेटिंग एरियामध्ये बसले होते. त्याचवेळी त्यांच्या मुलानं तिसऱ्या मजल्यावरून उडी मारली.
याबाबत मुलाचे वडील प्रितम कटारा यांनी सांगितलं की, 'मला माझ्या मुलाला भेटण्यासाठी बोलवण्यात आलं होतं. मी शाळेत पोहोचलो त्यावेळी मला तो खाली पडल्याचं दिसलं. त्यानं स्केटिंगमध्ये दोनवेळा राष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधित्व केलं आहे. त्याच्या शाळेमधून मला कॉल आला होता. त्यानंतर शाळातून दुसरा फोन आला की तुम्ही थेट रूग्णालयात या.'
दरम्यान, एसडीएम आर्ची हरीत यांनी मुलानं शाळेत मोबाईल आणला होता आणि शाळेच्या नियमाचं उल्लंघन केलं होतं असं सांगितलं. मात्र या प्रकरणानं काही क्षणातच वेगळं वळण घेतलं. ते म्हणाले, 'आठवीत शिकणाऱ्या या मुलानं शाळेत मोबाईल फोन आणला होता. त्यानंतर तो धावत गेला अन् तिसऱ्या मजल्यावरून उडी मारली. त्याची प्रकृती आता स्थीर आहे. याबाबत तपास सुरू झाला आहे. शाळेत मोबाईल आणण्यास बंदी असून शाळेतील शिक्षकांकडून देखील मोबाईल जमा करून घेतले जातात.'
शाळा प्रशासनानं सांगितलं की ते या मुलावर कोणतीही शिस्तभंगाची कारवाई करण्यापूर्वी त्याच्या वडिलांशी बोलणार होतो. मात्र घटनाच अशा घडल्या मुलानं सतत माफी मागितली. त्यानंतर त्यानं टोकाचं पाऊल उचललं. यावरून परिस्थिती कशी हाताळली याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.