

नवी दिल्ली : उद्योगपती इलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक’ने भारतात उपग्रह आधारित दळणवळण सेवा पुरवण्याच्या आपल्या प्रयत्नांना पुन्हा गती देत, थेट दुसऱ्या पिढीतील (जेन २) उपग्रह समूहाच्या उभारणीसाठी भारताच्या अंतराळ नियामक संस्थेकडे नव्याने अर्ज केला आहे. या नवीन अर्जामध्ये पृथ्वीच्या खालच्या कक्षेत (लो अर्थ ऑर्बिट) सुमारे ३० हजार उपग्रह तैनात करण्यासाठी परवानगी मागितली आहे. यात ‘डायरेक्ट टू डिव्हाईस' (डी २ डी) कनेक्टिव्हिटीसारख्या नवीन क्षमतांचाही समावेश आहे.
भारत उपग्रह ते मोबाईलवर कनेक्टिव्हिटीसह नवीन उपग्रह दळणवळण सेवांसाठी नियम तयार करत आहे. त्याचवेळी स्टारलिंकने हा प्रस्ताव दिला आहे. स्टारलिंकचा ‘जेन २’ उपग्रह समूह त्यांच्या सध्याच्या नेटवर्कपेक्षा अधिक क्षमता प्रदान करण्यासाठी डिझाईन केला गेला आहे. जरी स्पेसएक्सची योजना ‘जेन २’ अंतर्गत कालांतराने सुमारे ४२ हजार उपग्रह तैनात करण्याची असली, तरी कंपनीने भारतात सध्या सुमारे ३० हजार उपग्रहांसाठी मंजुरी मागितली आहे. भविष्यात ते अतिरिक्त उपग्रहांसाठीही मंजुरी मागू शकतात.
‘डी२डी'मुळे परिस्थिती बदलणार
‘डी२डी’मुळे स्टारलिंकला वापरकर्त्याच्या ठिकाणी कोणत्याही विशेष उपग्रह टर्मिनलची (डिश अँटेनासारख्या उपकरणाची) गरज न भासता थेट मोबाईल फोनला कनेक्टिव्हिटी प्रदान करणे शक्य होऊ शकते. यामुळे पारंपरिक उपग्रह ब्रॉडबँडच्या तुलनेत खूप मोठी बाजारपेठ उपलब्ध होऊ शकते. विशेषतः देशातील दुर्गम आणि कमी कनेक्टिव्हिटी असलेल्या भागांमध्ये याचा फायदा होईल.
भारताने उपग्रह ते थेट मोबाईल (डी२डी) सेवांसाठीचे नियामक धोरण अद्याप अंतिम केले नाहीत. टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑफ इंडिया (टीआरएआय) या मुद्द्यावर विचार करत आहे. तर सरकार स्पेक्ट्रम बँडस् आणि अशा सेवांचे नियमन करणाऱ्या इतर नियमांवरही काम करत आहे. अमेरिकेत स्टारलिंकने टी मोबाईलसोबत भागीदारी करून पारंपरिक सेल्युलर कव्हरेज नसलेल्या भागांमध्ये फोनला थेट सॅटेलाईट कनेक्टिव्हिटी दिली आहे.
स्थानिक कंपन्याही उतरल्या स्पर्धेत
रिलायन्स जिओनेही सुमारे १,६०० उपग्रहांच्या लो अर्थ ऑर्बिट कॉन्स्टेलेशनचा प्रस्ताव दिला आहे, तर भारती समर्थित युटेलसॅट वनवेबदेखील भारतात सॅटेलाईट ब्रॉडबँड सेवा स्थापित करण्याचा प्रयत्न करत आहे. ॲमेझॉनही सॅटेलाईट सेवा स्पर्धेत उतरू पाहात असल्याचे समोर आले आहे.