

Sridevi Death Viral Video
नवी दिल्ली: बॉलिवूडची 'चांदणी' अर्थात अभिनेत्री श्रीदेवीच्या निधनाला अनेक वर्षे उलटूनही तिच्या मृत्यूबाबतचे गूढ सोशल मीडियावर अधूनमधून चर्चेत येत असते. नुकताच एका युट्युबरने 'बाथटबमध्ये श्रीदेवीच्या भूताशी बोललो’ असा विचित्र दावा करणारा एक व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तो 'अलेक्सा' सारख्या उपकरणाला श्रीदेवींच्या मृत्यूबाबत प्रश्न विचारताना दिसत असून, त्यातून समोर आलेल्या उत्तरांमुळे नेटकऱ्यांनी त्याला चांगलेच सुनावले आहे.
व्हायरल व्हिडिओमध्ये संबंधित युट्युबर श्रीदेवीच्या आत्म्यासोबत बोलत आहे, असे भासवलं आहे. बाथटबमध्ये बसून तो विचारतो की, तुमचा मृत्यू या बाथटबमध्येच बुडून झाला का? यावर हो असे उत्तर येतं. त्यानंतर व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला कोणी मारले, असे विचारल्यानंतर बोनी असे उत्तर देते. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर युजर्सनी या युट्युबरवर टिका केली आहे. केवळ व्ह्यूज आणि प्रसिद्धीसाठी अशा प्रकारचे व्हिडिओ करणे चुकीचे असल्याचे मत नेटकऱ्यांनी व्यक्त केले आहे.
"व्ह्यूजसाठी किती खालच्या थराला जाणार?" अशा शब्दांत एका युजरने आपली नाराजी व्यक्त केली.
दुसऱ्या एका युजरने म्हटले की, "अलेक्सा ही एक एआय प्रणाली आहे, ती इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या कोणत्याही माहितीवर आधारित उत्तर देते. याचा अर्थ ते सत्य आहे असे होत नाही."
"एका मृत व्यक्तीचा आणि त्यांच्या कुटुंबाच्या भावनांचा विचार करा," असा सल्लाही अनेकांनी या युट्युबरला दिला आहे.
२४ फेब्रुवारी २०१८ रोजी दुबईतील एका हॉटेलमध्ये श्रीदेवी यांचा मृत्यू झाला होता. फॉरेन्सिक रिपोर्टनुसार, हॉटेलच्या बाथटबमध्ये बुडून त्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. मद्यप्राशनामुळे श्रीदेवी यांचा तोल गेल्याने त्या बाथटबमध्ये पडल्या आणि बाथटबमधील पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला, असे तपासात समोर आले होते. श्रीदेवी यांच्या रक्तात मद्याचा अंश आढळला होता.