

नवी दिल्ली : कुख्यात आंतरराष्ट्रीय गुन्हेगार, सीरियल किलर चार्ल्स शोभराज याच्या मैत्रिणीसाठी आपण तिहार तुरुंगात जेवणाचा डबा घेऊन गेलो होतो, अशी खळबळजनक कबुली काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी दिली आहे.
सोनिया गांधी सध्या त्यांच्या पुस्तकामुळे चर्चेत आहेत. ‘बिलाँगिंग : अ जर्नी ऑफ लव्ह’ या त्यांच्या आत्मचरित्रपर पुस्तकातील काही भागांत सोनिया यांनी चार्ल्स शोभराजच्या साथीदाराचाही उल्लेख केला आहे.
१९७८ च्या ख्रिसमसची आठवण सांगताना सोनिया यांनी लिहिले आहे की, त्यांच्या सासू माजी पंतप्रधान इंदिरा गांधी त्यावेळी दिल्लीच्या तिहार तुरुंगात होत्या. सोनिया यांना त्यांच्यासाठी जेवण घेऊन जायचे होते; परंतु सासू इंदिरा यांच्या सांगण्यावरून त्यांनी एका ऑस्ट्रेलियन महिलेसाठीही जास्तीचे जेवण नेले. सोनिया आपल्या पुस्तकात त्या महिलेचा उल्लेख सीरियल किलर चार्ल्स शोभराजची साथीदार असा करतात. त्या काळात मी रोज तुरुंगात जायचे, असेही सोनिया गांधी यांनी पुढे लिहिले आहे.
१९७८ मध्ये ख्रिसमसच्या दिवशी, सोनिया गांधी तिहार तुरुंगात इंदिरा गांधींसाठी घरचे जेवण घेऊन गेल्या होत्या. त्याच वेळी, माजी पंतप्रधानांच्या सांगण्यावरून त्यांनी एका ऑस्ट्रेलियन महिलेसाठीही जास्तीचे जेवण नेले. ही गोष्ट आणीबाणीच्या काळातील आहे. आणीबाणीनंतर झालेल्या निवडणुकीत जनता पक्ष (विरोधी पक्षांची आघाडी) सत्तेत आला. या काळात इंदिरा गांधी यांना एक आठवडा तिहार तुरुंगात राहावे लागले होते.
१९३८ मध्ये जवाहरलाल नेहरू यांनी स्थापलेल्या ‘नॅशनल हेराल्ड’ वृत्तपत्राच्या पुनरुज्जीवनातून मला, राहुल गांधी यांना किंवा संचालकांपैकी कुणालाही एक रुपयाही मिळालेला नसल्याचा खुलासा सोनिया गांधी यांनी त्यांच्या ‘बिलाँगिंग : अ जर्नी ऑफ लव्ह’ या आत्मचरित्रात केला आहे. वाचकवर्ग व दर्जा खालावल्यानंतर, २०१० मध्ये ‘नॅशनल हेराल्ड’चे नवीन ना-नफा संस्थेच्या माध्यमातून पुनरुज्जीवन केले गेले. ना-नफा रचनेमुळे भागधारक आणि संचालकांना आर्थिक लाभ घेण्यास मनाई होती, असे सोनिया यांनी म्हटले आहे. असे असूनही या प्रकरणात आमच्यावर गुन्हेगारी कटाचा गुन्हा दाखल केला गेला. पुढे सरकारच्या निर्देशानुसार ‘ईडी’ने समांतर खटला सुरू केला. मला व राहुल यांना ‘ईडी’ कार्यालयात बोलावून अनेक दिवस चौकशी केली गेली. १२ वर्षांनंतरही हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे, असेही त्यांनी नमूद केले.