

Sonam Wangchuk case : ख्यातनाम शिक्षणतज्ज्ञ सोनम वांगचुक यांच्या सुटकेसाठी दाखल करण्यात आलेल्या याचिकेवरील सुनावणी आज (दि. १४) सर्वोच्च न्यायालयाने १५ ऑक्टोबरपर्यंत तहकूब केली आहे, असे वृत्त ANIने दिले आहे. वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली अंगमो यांनी संविधानातील कलम ३२ अंतर्गत ‘हॅबियस कॉर्पस’ (बंदी प्रत्यक्षीकरण) याचिका दाखल केली होती. या याचिकेच्या माध्यमातून त्यांनी सोनम वांगचुक यांना राष्ट्रीय सुरक्षा कायदा (NSA) अंतर्गत झालेल्या अटकेला आव्हान दिले आहे.
२४ सप्टेंबर रोजी लडाखमधील लेह येथे स्वतंत्र राज्यासाठी आणि घटनात्मक संरक्षणा'साठी झालेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले. यावेळी उसळलेल्या हिंसाचारात चार जणांचा मृत्यू झाला होता. या हिंसाचारात सहभाग असल्याचा आरोप असलेले सोनम वांगचुक हे गेली १९ दिवस जोधपूर कारागृहात आहेत. त्यांना २६ सप्टेंबर रोजी त्यांना राष्ट्रीय सुरक्षा कायदा (NSA) अंतर्गत अटक करण्यात आली होती.
या कारवाईविरोधात वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली अंगमो यांनी २ ऑक्टोबर रोजी संविधानातील कलम ३२ अंतर्गत ‘हॅबियस कॉर्पस’ (बंदी प्रत्यक्षीकरण) याचिका दाखल केली होती. याचदिवशी त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पोस्ट करत म्हटलं होतं की, "सात दिवस उलटूनही सोनम यांच्या तब्येती, स्थिती किंवा नजरबंदीच्या कारणांची माहिती मिळालेली नाही. त्यांनी वांगचुक यांच्यावर एनएसए लागू करण्याच्या निर्णयावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले.दरम्यान, गीतांजली अंगमो यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, गृहमंत्री अमित शहा, लडाखचे उपराज्यपाल कविंदर गुप्ता, कायदा मंत्री अर्जुनराम मेघवाल आणि लेहचे जिल्हाधिकारी यांना पत्र लिहले असून, त्याची प्रतही त्यांनी X वर शेअर केली आहे.
बंदी प्रत्यक्षीकरण (हॅबियस कॉर्पस) याचिका प्रत्यक्ष व्यक्तीला तत्काळ न्यायालयासोमर हजर करण्याचा आदेश देण्यासाठी दाखल केली जाते. एखाद्या व्यक्तीला बेकायदेशीररीत्या अटक केल्यास, न्यायालय अशा व्यक्तीला तत्काळ न्यायालयासमोर हजर करण्याचा आदेश देऊ शकते. भारतीय राज्यघटनेच्या कलम ३२ आणि २२६ अंतर्गत नागरिकांना बंदी प्रत्यक्षीकरण याचिका दाखल करण्याचा हक्क दिला आहे.
जोधपूर सेंट्रल जेलमधून वांगचुक यांनी लिहिलेल्या पत्रामध्ये, लेह हिंसाचारात झालेल्या चार मृत्यूंची स्वतंत्र न्यायिक चौकशी करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. हे पत्र रविवारी वकील मुस्तफा हाजी यांनी प्रसारित केले. हाजी हे लेह अपेक्स बॉडीचे (LAB) कायदेशीर सल्लागार आहेत. ४ ऑक्टोबर रोजी त्यांनी वांगचुक यांचे बंधू त्सेतन दोरजे ले यांच्यासह तुरुंगात त्यांची भेट घेतली होती.
अभिनेता अमीर खान याची प्रमुख भूमिका असणार्या 'थ्री इडियट्स' चित्रपटाची प्रेरणा हे सोनम वांगचूक यांच्याकडूनक घेण्यात आली. हा चित्रपट प्रसिद्ध झाल्यानंतर वांकचूक यांच्या कार्यात देशभरात झाले. ५९ वर्षीय सोनम वांगचूक हे अभियंता-शिक्षक-हवामान कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात.