

Sonam Wangchuk Pakistan Connection :
लडाखमध्ये झालेल्या हिंसक आंदोलनानंतर केंद्रीय गृह मंत्रालयानं लडाखमधील पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना अटक केली होती. त्यांच्यावर हिंसेला प्रेरित करणारे वक्तव्य केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. त्याचबरोबर त्यांच्यावर नॅशनल सिक्युरिटी अॅक्ट (NSA) देखील लावण्यात आला आहे.
दरम्यान, लडाख DGP एसडी सिंग जामवाल यांनी आज सोनम वांगचुक यांचं पाकिस्तानशी कनेक्शन असल्याचा संशय व्यक्त केला आहे. त्यांनी सोनम वांगचुक यांनी पाकिस्तानला भेट दिल्याचं सांगितलं. आज (दि२७) झालेल्या पत्रकार परिषदेत लेह डीजीपी जामवाल यांनी सांगितलं की पोलिसांनी पाकिस्तान पीआयओला अटक केली आहे. तो सोनम वांगचुक यांच्या संपर्कात होता.
जामवाल म्हणाले, 'आम्ही काही दिवसांपूर्वी पाकिस्तान PIO ला अटक केली होती. तो पाकिस्तानला माहिती पुरवत होता. आम्हाला सोनम वांगचुक यांनी पाकिस्तानमधील दावत अटेंड केली होती. त्यांनी बांगलादेशला देखील भेट दिली होती. त्यामुळं त्यांच्यावर शंका उपस्थित होत आहे. याबाबत आता तपास सुरू झाला आहे.'
जामवाल पुढे म्हणाले, 'सोनम वांगचुक यांचा भडकाऊ विधानं करण्याचा इतिहास आहे. त्यांनी अरब स्प्रिंग, नेपाळ आणि बांगलादेशचा संदर्भ दिला होता. आता त्यांच्यावर विदेशातून आलेल्या फंडिगमध्ये गडबडी आणि गैरवापर याच्याबाबत तपास सुरू आहे.
दरम्यान, एएनआयशी बोलताना त्यांनी लेह हिंसाचाराचं परदेशी कनेक्शन याबाबत देखील महिती दिली. ते म्हणाले, 'आम्ही तपासादरम्यान, दोन व्यक्तींना पकडलं आहे. त्यांचा याच्याशी काही संबंध आहे का हे आम्ही आताच सांगू शकणार नाही. इथं नेपाळी कामगार काम करतात त्यांचा एक इतिहास राहिला आहे. आम्ही याबाबत तपास करत आहोत.'
डीजीपी जामवाल यांच्या मते तथाकथित पर्यावरणवादी कार्यकर्ते असलेल्या सोनम वांगचुक यांच्या भडकवणाऱ्या वक्तव्यांमुळं या केंद्रशासित प्रदेशात हिंसाचार उसळला. त्यांनी सोनम वांगचुक हे केंद्रासोबतची चर्चा फिसटकण्यास कारणीभूत असल्याचा आरोप केला.