

Sonam Raghuwanshi
इंदूरमधील राजा रघुवंशी हत्या प्रकरणी नवे काही खुलासे समोर आले आहेत. मेघालयात हनिमूनसाठी गेलेल्या नवविवाहित राजा रघुवंशी हत्या प्रकरणी त्याची पत्नी सोनम रघुवंशी (Sonam Raghuvanshi) हिला पोलिसांनी मंगळवारी अटक केली. पतीच्या हत्येनंतर अनेक दिवस ती फरार होती. सोनमने लग्नाच्या तीन दिवसांतच राजाला मारण्याचा कट रचला होता. याचा खुलासा राज कुशवाहा आणि सोनम यांच्या चॅटमधून झाला आहे. राज कुशवाहा आणि सोनम यांचे प्रेमसंबंध आहेत. यामुळेच तिने पतीची हत्या केल्याची माहिती समोर आली आहे.
सुत्रांच्या माहितीनुसार, सोनमने लग्नाच्या तीन दिवसांनंतर राज कुशवाहा याच्या मदतीने राजा रघुवंशीला मारण्याचा कट रचला. सोनमला लग्नानंतर पती राजा रघुवंशी तिच्या जवळ येणे आवडत नव्हते.
सोनमने राज कुशवाहाशी केलेल्या चॅटमध्ये म्हटले होते, लग्नानंतर पती राजा जवळ येऊ लागला. पण हे तिला आवडले नाही. दरम्यान, सोनमने राजाशी अंतर ठेवणे पसंद केले. अशातच तिने राजाला मारण्यासाठी राज कुशवाहशी संपर्क साधून कट रचला आणि तिने त्यासाठी जाणूनबुजून मेघालयासारख्या दूर ठिकाणची जागा निवडली.
लग्नाच्या एका आठवड्यानंतर म्हणजे १८ मे रोजी राजाला मारण्याचा कट रचण्यात आला. त्यासाठी राज कुशवाहाने आकाश राजपूत, विशाल चौहान आणि आनंद कुमार यांना त्याला मारण्यासाठी सुपारी दिली होती. तिने मारेकऱ्यांना तिच्या ठिकाणाबद्दल अपडेट्स दिले.
इंदूर येथून हनिमूनसाठी मेघालयातील शिलाँगमध्ये गेलेल्या तरुण उद्योजक राजा रघुवंशी (Raja Raghuwanshi) यांच्या हत्या प्रकरणाने खळबळ उडाली. त्यांचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत वेसावोंग धबधब्याच्या दरीत सापडला. ते २३ मे पासून बेपत्ता होते. यावेळी त्यांच्यासोबत त्यांची पत्नी सोनम होती. त्याची हत्या शेतीसाठी वापरण्यात येणाऱ्या 'दाओ' हत्याराने वार करून करण्यात आली. या घटनेनंतर सोनम बेपत्ता होती. यामुळेच तिच्यावर पोलिसांचा संशय बळावला.
राजा रघुवंशी आणि त्यांची पत्नी सोनम २२ मे रोजी हनिमूनसाठी शिलाँगला गेले होते. २३ मे रोजी संध्याकाळपासून ते चेरापुंजी जवळील ओसारा हिल्स येथून बेपत्ता झाले होते. त्यानंतर त्यांचा कुटुंबाशी संपर्क झाला नाही.
इंदूर येथील सोनम रघुवंशीचे वडील देवी सिंह रघुवंशी यांचा एक छोटासा प्लायवूडचा कारखाना आहे. राज कुशवाहा या कारखान्यात कामाला आहे. तो सोनमपेक्षा पाच वर्षांनी लहान आहे. सोनम अकाउंट्स आणि कर्मचारी व्यवस्थापनाशी संबंधित कामाच्या निमित्ताने कारखान्यात यायची. यादरम्यान, सोनम आणि राज यांची जवळीक वाढली. दोघांनाही कारखान्यातील कर्मचाऱ्यांनी अनेकदा एकत्र पाहिले होते. त्यानंतर काही दिवसांनी, म्हणजे ११ मे रोजी सोनमचे राजा रघुवंशीशी लग्न झाले. पण तिला राजा आवडत नव्हता. तिला राज आवडत होता. या अनैतिक संबंधात अडसर ठरलेल्या पतीला तिने हनिमूनदरम्यान संपवल्याचे उघड झाले आहे.