

Raja Raghuvanshi murder case | मेघालयात हनिमूनसाठी गेलेल्या इंदूरमधील नवविवाहित राजा रघुवंशी हत्या प्रकरणी त्याची सोनम रघुवंशीला ( Sonam Raghuvanshi) पोलिसांनी मंगळवारी अटक केली. आज मेघालय पोलिसांना सोनम रघुवंशीची तीन दिवसांची ट्रान्झिट रिमांड मिळाली, असे वृत्त ANIने दिले आहे.
मेघालयात हनिमूनसाठी गेलेल्या इंदूरमधील नवविवाहित दाम्पत्य राजा रघुवंशी आणि सोनम रघुवंशी ( Sonam Raghuvanshi ) प्रकरणी सोमवार, ९ जून रोजी झालेल्या खुलाशाने सर्वांनाच धक्का बसला. राजा रघुवंशी हत्या प्रकरणी पत्नी पत्नी सोनम रघुवंशीसह अन्य तिघांना अटक करण्यात आली. हे संपूर्ण प्रकरण पूर्वनियोजित कट असल्याची प्राथमिक माहितीही पोलीस तपासात समोर येत आहे. आता मेघालय पोलिसांना सोनम रघुवंशीची तीन दिवसांची ट्रान्झिट रिमांड (आरोपीला एका राज्यातून दुसऱ्या राज्यातील पोलीस किंवा तपास यंत्रणा त्यांच्या ताब्यात घेण्यासाठी न्यायालयाकडून मिळवलेली परवानगी) मिळाली आहे.
राजा रघुवंशी आणि त्यांची पत्नी सोनम २२ मे रोजी हनिमूनसाठी शिलाँगला गेले होते. २३ मे रोजी संध्याकाळपासून ते चेरापुंजी जवळील ओसारा हिल्स येथून बेपत्ता झाले होते. त्यानंतर त्यांचा कुटुंबाशी संपर्क झाला नाही.राजा रघुवंशी यांचा मृतदेह ११ दिवसांनंतर शिलाँगमधील एका पर्यटनस्थळी २०० फूट खोल दरीत झाडावर लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. ड्रोनच्या मदतीने त्यांचा मृतेदह शोधून काढण्यात आला. नवदाम्पत्यांच्या कुटुंबियांनी या प्रकरणी सीबीआय चौकशीची आणि सोनमचा शोध घेण्यासाठी भारतीय लष्कराची मदत घ्यावी, अशी मागणी केली होती. मागील काही दिवस पोलीस हा सोनम रघुवंशीचा शोध घेत होते. ती उत्तर प्रदेशातील वाराणसी-गाझीपूर मुख्य रस्त्यावरील काशी ढाब्यावर सापडल्याने या प्रकरणाला अनपेक्षित वळण मिळाले.
२२ मे : राजा आणि सोमन हनिमूनसाठी मावलाखियात गावात पोहोचले. ३,००० पायऱ्यांचा चढ चढून नोंगरियातला गेले. येथे त्यांनी एका होमस्टेमध्ये रात्र घालवली. दुसऱ्या दिवशी सकाळी दोघेही होमस्टेमधून बाहेर पडताना दिसले होते.
२३ मे : दोघांचाही कुटुंबाशी संपर्क तुटला. यानंतर शोध मोहीम सुरू करण्यात आली. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, होमस्टेमधून बाहेर पडल्यानंतर दोघेही मावलाखैत गावात गेले. दोघांचे मोबाईल फोनचे शेवटचे लोकेशन मावलाखैतमध्ये सापडले . त्याच दिवशी, शिलाँग-सोहरा रस्त्यालगत एका कॅफेजवळ त्यांची भाड्याने घेतलेली स्कूटर बेवारस अवस्थेत आढळली हेती. ग्रामस्थांनी ही बाब पोलिसांना कळवली, त्यानंतर पोलिसांनी त्या दोघांनी भेट दिलेल्या परिसराचे मॅपिंग केले.
२७ मे : मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी बेपत्ता नवदाम्पत्याचा शोध घेण्यासाठी मेघालयचे मुख्यमंत्री कॉनराड संगमा यांच्याशी संपर्क साधला. संगमा यांनी यादव यांना आश्वासन दिले की, मेघालय पोलिस आणि प्रशासन त्यांचा शोध घेण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करत आहेत.
२ जून : राजा रघुवंशीचा मृतदेह मेघालयात सापडला. यानंतर पत्नी सोनमचा शोध सुरूच होता. घटनास्थळावरून रक्ताने माखलेला चाकू आणि सोनम स्कूटरमध्ये ठेवताना दिसलेला रेनकोट देखील जप्त करण्यात आला.
४ जून : राजा रघुवंशी यांचा खून झालेल्या ठिकाणाहून महिलेचा पांढरा शर्ट, औषधाची पट्टी, मोबाईल फोनच्या एलसीडी स्क्रीनचा एक भाग आणि एक स्मार्टवॉच जप्त करण्यात आले. याच दिवशी हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला.
६ जून : सीसीटीव्ही फुटेजमध्ये राजा आणि सोनम २३ मे रोजी सोहराच्या सैतसोहपेन येथील मनहा हॉटेलमध्ये एक लहान सुटकेस घेऊन स्कूटरवरून पोहोचल्याचे दिसून आले. खोली मिळवण्यात अयशस्वी झाल्यानंतर, ते हॉटेलमध्ये सुटकेस सोडून परिसरातून निघून गेल्याचे स्पष्ट झाले होते.
९ जून : मेघालयाचे मुख्यमंत्री कॉनराड संगमा यांनी एक्स पोस्ट करत माहिती दिली की, राजा रघुवंशी हत्या प्रकरणी सोनम रघुवंशीसह चार जणांना अटक करण्यात आली आहे. महिलेने पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले आहे. नंतर, मेघालयचे डीजीपी आय नोंगरांग यांनी सांगितले की सोनमला उत्तर प्रदेशातील गाजीपूरमध्ये अटक करण्यात आली आहे.
१० जून : मेघालय पोलिसांना सोनम रघुवंशीची तीन दिवसांची ट्रान्झिट रिमांड (आरोपीला एका राज्यातून दुसऱ्या राज्यातील पोलीस किंवा तपास यंत्रणा त्यांच्या ताब्यात घेण्यासाठी न्यायालयाकडून मिळवलेली परवानगी) मिळाली.