

Social Media Influencer Kamal Kaur Bhabhi murder case
सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर कमल कौर भाभी उर्फ कांचन कुमारी हिच्या गुढ मृत्यूने खळबळ उडाली. ती भटिंडा-चंदीगड महामार्गाला लागून असलेल्या भुचो कलान येथे एका पार्किंगमधील कारमध्ये मृतावस्थेत आढळून आली होती. तिच्या मृत्यूनंतर सुमारे ३६ तासांनंतर पोलिसांनी दोन निहंगना अटक केली असून कांचन यांच्या हत्येचे गुढ उकलले आहे. एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने या घटनेची पुष्टी केली आहे.
कांचन तिच्या घरच्यांना भटिंडा येथे एका प्रमोशनल इव्हेंटमध्ये सहभागी होणार असल्याचे सांगून लुधियाना येथून निघाली होती. लुधियानातील लछमन कॉलनीत राहणाऱ्या कांचनचा मृतदेह बुधवारी रात्री तिच्या कारच्या मागील सीटवर आढळून आला होता. पार्किंगमधील एका कारमधून दुर्गंधी येत असल्याची तक्रार स्थानिकांनी केली होती. त्यानंतर तिचा मृतदेह बुधवारी रात्री कारमध्ये सापडला.
कांचन कुमारी तिच्या आईसोबत लुधियानामध्ये राहत होती. ती अनेकवेळा सोशल मीडियावर लाईव्ह यायची आणि तिच्या कुटुंबातील लोकांना शिवीगाळ करायची. तिने ९ जून रोजी अखेरची पोस्ट शेअर केली होती. तिने स्वतःचा फोटो पोस्ट करत म्हटले होते, 'नो लव्ह, नो इमोशन... संशय, संशय, संशय'. त्यानंतर, ती तीन दिवसांपासून सोशल मीडियावर दिसली नाही. असे मानले जाते की याचदरम्यान तिचा खून करण्यात आला.
१० जून रोजी सकाळी ५:३३ वाजता रुग्णालयाच्या पार्किंगमध्ये एक कार येत असल्याचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना मिळाले आहे. येथे एक शीख युवक कार पार्क करून निघून जातो. त्याच कारच्या मागील सीटवरून कांचनचा मृतदेह आढळून आला.
तिला सोशल मीडियावर आक्षेपार्ह कंटेंट पोस्ट केल्याबद्दल धमक्या मिळाल्या होत्या. कांचनला गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये दहशतवादी अर्श डल्ला यानेही धमकी दिली होती. 'तिने अयोग्य व्हिडिओ पोस्ट करणे थांबवावे, अन्यथा त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी त्याने धमकी दिली होती. तिचे YouTube वर २.३६ लाख, इन्स्टाग्रामवर ३.९७ लाख आणि फेसबुकवर १.७४ लाख फॉलोअर्स होते.