

धुळे : तंबाखूची पुडी न दिल्याच्या किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून तरुणाचा मृत्यू झाल्याप्रकरणी न्यायालयाने आरोपीला पाच वर्ष सक्त मजुरीची शिक्षा सुनावली आहे. ही शिक्षा धुळे जिल्हा व सत्र न्यायाधीश माधुरी आनंद यांनी सुनावली.
धुळे शहरातील देवपूर परिसरातील विटापट्टी भागात राहणारे नरेश रमेश चव्हाण आणि त्यांचे भाऊ हुकूम चव्हाण ८ जुलै २०११ रोजी दही आणण्यासाठी जात होते. त्यावेळी हॉस्पिटल रोडजवळ नरेश यांच्या जवळ आलेल्या आरोपी सतीष भास्कर चौधरी याने तंबाखूची पुडी मागितली. नरेश यांनी "तंबाखू नाही" असे सांगितल्याने सतीष रागावला आणि त्याने नरेश यांची मान धरून पाय अडकवून त्यांना खाली पाडले. नरेश गंभीर जखमी होऊन बेशुद्ध पडले. त्यांना तत्काळ जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी मयताचा भाऊ हुकूम चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भादंवि कलम 304(2), 323 आणि 504 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक चंद्रकांत पाटील आणि त्यानंतर धनंजय येरुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण करण्यात आला. आरोपपत्र दाखल केल्यानंतर खटल्याची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायाधीश माधुरी आनंद यांच्या न्यायालयात झाली.
सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता अजयकुमार सानप यांनी फिर्यादी हुकूम चव्हाण, मयताचा मोठा भाऊ अनिल चव्हाण, पंच संजय मैनकर, शुभम (जप्ती पंच), शवविच्छेदन करणारे डॉ. अविनाश मोहने, तपासी अधिकारी चंद्रकांत पाटील आदींच्या साक्षीवर आधारित प्रभावी युक्तिवाद केला. वैद्यकीय अहवाल व इतर पुराव्यांच्या आधारे सानप यांनी आरोपीस कडक शिक्षा द्यावी, अशी मागणी केली होती.
पुराव्यांचा सखोल विचार करून, न्यायालयाने आरोपी सतीष भास्कर चौधरी यास भादंवि कलम 304(2) अन्वये पाच वर्ष सक्त मजुरी व ₹1000 दंड, भादंवि कलम 323 व 504 अंतर्गत प्रत्येकी एक वर्ष कारावास व ₹500 दंड, अशी शिक्षा सुनावली आहे. दंड न भरल्यास अनुक्रमे १ महिना, १५ दिवस व १५ दिवस अतिरिक्त कारावास ठोठावण्यात आला आहे. सरकारी पक्षाकडून यशस्वी कामगिरीसाठी जिल्हा सरकारी वकील देवेंद्रसिंह तवर यांचे मार्गदर्शन मिळाले होते.