

sim card rules change from tomorrow solution
पुढारी ऑनलाईन : SIM Card Rules Change: उद्या म्हणजेच 24 ऑगस्टपासून सिम कार्डबाबतच्या नियमांमध्ये बदल होणार आहे. जर एखादी व्यक्ती नवीन सिम कार्ड खरेदी करण्यासाठी गेली, तर तिला नवीन सिम कनेक्शन देण्यास नकार दिला जाऊ शकतो. कारण, जर एखाद्या व्यक्तीने आधीच निर्धारित मर्यादेनुसार 9 सिम कार्ड खरेदी केले असतील, तर त्याला नवीन सिम कार्ड जारी केले जाणार नाही. चला, याबाबत सविस्तर जाणून घेऊया.
SIM कार्डचे पूर्ण नाव सब्सक्राइबर आयडेंटिटी मॉड्यूल (Subscriber Identity Module) असे आहे. आधुनिक स्मार्टफोनमध्ये सिम कार्ड बसवल्यानंतरच टेलिकॉम सेवेचा लाभ घेता येतो. 24 ऑगस्टपासून सिम कार्डबाबत मोठा बदल होणार आहे. भारत सरकारचे दूरसंचार विभाग म्हणजेच DoT सिम कार्डच्या मर्यादेच्या नियमाबाबत अधिक कठोर होणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एखाद्या व्यक्तीने आपल्या नावावर निर्धारित मर्यादेपर्यंत सिम कार्ड आधीच घेतले असतील, तर टेलिकॉम कंपन्या त्याला नवीन सिम कार्ड देणार नाहीत. त्यामुळे आपल्या नावावर सध्या किती सिम कार्ड जारी झाले आहेत, याची माहिती प्रत्येकाला असणे आवश्यक आहे.
एका व्यक्तीला किती सिम कार्ड घेता येतात?
नियमांनुसार, एका व्यक्तीला जास्तीत जास्त 9 सिम कार्ड खरेदी करून वापरता येतात. मात्र, एखादा नंबर बंद झाला असेल तर तो सक्रिय सिम कार्डच्या संख्येत मोजला जाणार नाही.
ही मर्यादा देशातील बहुतांश राज्यांमध्ये लागू आहे. मात्र, जम्मू-काश्मीर, आसाम आणि ईशान्येकडील राज्यांमध्ये जास्तीत जास्त 6 सिम कार्ड ठेवण्याची मर्यादा आहे.
मर्यादेपेक्षा जास्त सिम कार्ड देता येणार नाही
मिळालेल्या माहितीनुसार, DoT च्या नव्या मार्गदर्शक सूचनांनुसार टेलिकॉम कंपन्यांना नवीन सिम कार्ड देण्यापूर्वी त्या व्यक्तीच्या नावावर आधीपासून किती सिम कार्ड सक्रिय आहेत, हे तपासावे लागणार आहे.
जर एखाद्या व्यक्तीच्या नावावर आधीच निर्धारित मर्यादेइतकी सिम कार्ड जारी झाली असतील आणि ती सक्रिय असतील, तर नवीन कनेक्शन देण्यास नकार दिला जाऊ शकतो.
यावर उपाय काय?
24 ऑगस्टनंतर नवीन सिम कार्ड खरेदी करण्यापूर्वी, तुम्ही स्वतःच्या नावावर किती सिम कार्ड सक्रिय आहेत, हे संचार साथी पोर्टलच्या मदतीने तपासू शकता.
संचार साथी पोर्टलवर असे तपासा
सर्वप्रथम संचार साथी पोर्टलच्या होमपेजवर जा. त्यानंतर खाली स्क्रोल केल्यावर ‘Know Mobile Connections in Your Name’ हा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा.
यानंतर तुमचा 10 अंकी मोबाइल नंबर टाका. त्यानंतर कॅप्चा भरा आणि पुढे OTP एंटर करा. शेवटी Login या पर्यायावर क्लिक करा.
यानंतर एक नवीन विंडो उघडेल. येथे तुमच्या नावावर नोंदणीकृत असलेले मोबाइल नंबर पाहता येतील.
तुम्ही वापरत नसलेला नंबर असल्यास तो बंद करण्याची विनंती करू शकता. तसेच तुमच्या नावावर एखादा अनधिकृत किंवा अनोळखी नंबर आढळल्यास त्याची तक्रारही करता येते.