

AK 203 Sher Rifle
नवी दिल्ली: भारत सरकारच्या ‘मेक इन इंडिया’ आणि ‘आत्मनिर्भर भारत’ उपक्रमांतर्गत संरक्षण क्षेत्रात भारताने एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. उत्तर प्रदेशातील अमेठी येथील कोरवा दारूगोळा कारखान्यात पूर्णपणे स्वदेशी घटकांनी बनवलेल्या पहिल्या १००% भारतीय ‘AK-203’ असॉल्ट रायफलची निर्मिती करून तिची यशस्वी चाचणी घेण्यात आली आहे. या रायफलचे नाव ‘शेर’ ठेवण्यात आले आहे.
भारत आणि रशिया यांच्या संयुक्त विद्यमाने २०१९ मध्ये स्थापन झालेल्या ‘इंडो-रशियन रायफल्स प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीने या रायफलची निर्मिती केली आहे. या यशाबाबत IRRPL चे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक मेजर जनरल एस. के. शर्मा यांनी सोशल मीडियावर माहिती दिली आहे.
AK-203 ही ७.६२x३९ मिमी कॅलिबरची आधुनिक आणि गॅस-ऑपरेटेड असॉल्ट रायफल आहे. कलाश्निकोव्ह मालिकेची विश्वासार्हता आणि आधुनिक युद्धतंत्राला पूरक अशी रचना हे याचे मुख्य वैशिष्ट्य आहे.
ही रायफल एका मिनिटात ७०० राऊंड्स फायर करू शकते.
८०० मीटर अंतरापर्यंत अचूक मारा करण्याची क्षमता.
आधुनिक टेलिस्कोपिक साईट्स आणि अॅक्सेसरीज जोडण्यासाठी मॉड्युलर रेल्स.
भारतीय सैन्यात वर्षानुवर्षे वापरल्या जाणाऱ्या जुन्या ‘इन्सास’ रायफल्सच्या तुलनेत AK-203 अधिक घातक.
वजनाने हाताळण्यास सोपी आणि अत्यंत प्रतिकूल हवामानातही प्रभावीपणे काम करते.
भारतीय लष्करातील जुन्या इन्सास रायफल्सची जागा आता या स्वदेशी AK-203 रायफल्स घेणार आहेत.
मेजर जनरल शर्मा यांनी सांगितले की, या स्वदेशी रायफलची सिंगल आणि बर्स्ट फायरिंग टेस्ट यशस्वी झाली असून याचे सुरुवातीचे निष्कर्ष अतिशय उत्साहवर्धक आहेत. सप्टेंबर २०२६ पर्यंत लष्कराच्या चाचण्यांसाठी या १००% स्वदेशी बनावटीच्या रायफल्सचे नमुने सोपवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
उत्पादन क्षमतेबाबत बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, लवकरच IRRPL द्वारे दर १०० सेकंदाला एक AK-203 'शेर' रायफल तयार केली जाईल. तसेच क्षमता वाढ आणि उत्पादन प्रक्रियेतील सुटसुटीतपणामुळे भारतीय लष्कराला पुरवल्या जाणाऱ्या ६ लाख रायफल्सची डिलिव्हरी निर्धारित वेळेच्या तब्बल एक वर्ष आधीच पूर्ण करणे शक्य होणार आहे.