

Siddaramaiah retirement from politics : "आजचे राजकारण पूर्णपणे भ्रष्ट झाले आहे. त्यामुळे मी २०२८ ची विधानसभा निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, मी राजकारणात सक्रिय राहीन आणि जनतेच्या सुख-दुःखाचा आवाज बनून त्यांच्यासाठी काम करत राहीन," अशी घोषणा कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सिद्धरामय्या आज (दि. २६) 'एक्स'वर पोस्टच्या माध्यमातून केली.
सिद्धरामय्या यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे की, वरुणा मतदारसंघातील जनता मला पुन्हा एकदा निवडणूक लढण्याची विनंती करत आहे, परंतु मी भविष्यात कोणतीही निवडणूक न लढण्याचा ठाम निर्णय घेतला आहे. "पूर्वी जेव्हा मी निवडणूक लढवायचो, तेव्हा मतदारसंघातील जनताच आमच्यासाठी निधी गोळा करायची आणि आम्हाला विजयी करायची. पण आज परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. माझे वय आता ७९ वर्षे आहे. आमच्या सरकारचा कार्यकाळ अजून सुमारे दीड वर्षांचा शिल्लक आहे. तोपर्यंत माझे वय ८१-८२ वर्षे होईल. आता माझे आरोग्य पूर्वीसारखे राहिलेले नाही आणि पूर्वीच्या ऊर्जेने काम करणेही शक्य उरलेले नाही."
२०२८ पर्यंत माझे वय ८२ वर्षे होईल आणि तेव्हा माझ्या राजकीय प्रवासाला ५० वर्षे पूर्ण होतील. "मी १९७८ मध्ये तालुका बोर्डाचा सदस्य म्हणून माझ्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली होती. या पाच दशकांत मी जय आणि पराजय दोन्ही पाहिले आहेत. पण मी कधीही माझ्या तत्त्वांशी तडजोड केली नाही किंवा माझ्या सदसदविवेकबुद्धीविरुद्ध जाऊन कोणतेही काम केले नाही, याचे मला पूर्ण समाधान आहे."
सिद्धरामय्या म्हणाले की, आज परिस्थिती अशी झाली आहे की निवडणूक लढण्यासाठी नेत्यांना जनतेला पैसे द्यावे लागतात. राजकारण पूर्णपणे भ्रष्ट झाले असून प्रामाणिक राजकारणासाठी आता जागा उरलेली नाही. याच परिस्थितीचा विचार करून मी भविष्यात निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला आहे. "गेल्या पाच दशकांपासून राज्यातील जनतेने मला आपले मानून प्रेम आणि मार्गदर्शन दिले आहे. हे ऋण मी कधीही फेडू शकत नाही. म्हणूनच माझे उर्वरित आयुष्यही जनतेच्या सेवेसाठी आणि त्यांच्या हितासाठीच समर्पित राहील." ही माहिती सिद्धरामय्या यांनी शनिवारी मांड्या जिल्ह्यातील एका खासगी कार्यक्रमात बोलताना दिली होती, असा उल्लेख त्यांच्या पोस्टमध्ये आहे.
दुसरीकडे कर्नाटकातील बहुप्रतिक्षित मंत्रिमंडळ विस्तारावर अंतिम निर्णय घेण्यासाठी काँग्रेस हायकमांड पूर्णपणे तयार आहे. सुमारे २० मंत्रीपदांसाठी काँग्रेसचे ६० हून अधिक आमदार शर्यतीत आहेत. या राजकीय रस्सीखेचमध्ये ज्येष्ठ नेते आपापल्या समर्थकांचे दावे भक्कम करत आहेत, ज्यामुळे पक्षांतर्गत शक्तीसंतुलनाला नवी दिशा मिळू शकते. नवी दिल्लीत मंगळवारी होणाऱ्या बैठकीत काँग्रेस नेतृत्व नव्या मंत्र्यांच्या नावांची यादी अंतिम करण्याची शक्यता आहे. या बैठकीत मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार आणि सिद्धरामय्या, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, विरोधी पक्षनेते राहुल गांधी तसेच इतर वरिष्ठ नेत्यांसमोर आपापल्या समर्थकांची नावे मांडू शकतात.