

बेळगाव : गेल्या काही दिवसांपासून राज्यात नेतृत्व बदलावरून जोरदार चर्चा सुरू आहे. सध्या हिवाळी अधिवेशन सुरू असल्याने तूर्तास या चर्चेला विराम मिळाला असला तरी गुरुवारी विधान परिषदेत एका वेगळ्याच कारणाने खुर्चीवरून चर्चा झाली आणि एकच हशा पिकल्याचे पहावयास मिळाले.
गुरुवारी मुख्यमंत्री सिद्धरामय्या विधान परिषदेत सदस्यांच्या प्रश्नांना उत्तरे देत असताना त्यांचे आसन व टेबलामधील अंतर कमी असल्याने उभा राहून उत्तर देताना त्यांना अडचण जाणवत होते. त्यावळी त्यांनी या खुर्चीवर अवघडल्यासारखे वाटत आहे, असे वक्तव्य केले. त्याबरोबर सभागृहात एकच हंशा पिकला.
विरोधी सदस्यांकडून मार्मिक टोलेबाजी पाहायला मिळाली. विषय भरकटल्याचे लक्षात येताच मुख्यमंत्र्यांनी खुलासा करताना माझी खुर्ची भक्कम आहे, असे निक्षून सांगितले! त्यानंतर त्यांनी आपले आसन तात्पुरते व्यवस्थित करून घेत आपल्या नेहमीच्या शैलीत विरोधी सदस्यांना उत्तर दिली.
मात्र काही वेळानंतर विरोधी सदस्यांनीही मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या वक्तव्याव्यावरून विधान परिषदेतील आसन व्यवस्था ठीक नसल्याची तक्रार करत नाराजी व्यक्त केली. या सदस्यांनीही आसन व टेबलामधील अंतर कमी असल्याने उभा राहून उत्तर देताना त्यांना अडचण जाणवत असल्याचे सांगितले.