

Muslim country supports Pakistan
पुढारी ऑनलाईन डेस्क : पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव आणखीनच वाढला आहे. यातच भारतासोबतच्या या तणावाच्या काळात पाकिस्तानचा आणखी एक मुस्लिम मित्र त्याच्या मदतीला सरसावला आहे . या राष्ट्राने पाकिस्तानच्या भूमिकेचे समर्थन केले असून काश्मीरवरील संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या ठरावाचा मुद्दाही उपस्थित केला आहे.
पहलगाम हल्ल्याची आंतरराष्ट्रीय चौकशी करण्याची मागणी या देशाने केली आहे. पाकिस्तानच्या भूमिकेचे समर्थन करणारा हा देश आहे अझरबैजान. या देशाने पाकिस्तानला पाठींबा देण्याआधी तुर्की आणि चीनने पाकिस्तानला पाठिंबा जाहीर केला आहे.
पाकिस्तान आणि अझरबैजान हे अत्यंत जवळचे मित्रराष्ट्र मानले जातात. अझरबैजानचे अध्यक्ष इल्हम अलीयेव पाकिस्तानला आपला भाऊ मानतात. त्यांच्या कारकिर्दीत अझरबैजानने संयुक्त राष्ट्रांमध्ये अनेक वेळा काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला आहे. त्यांनी पाकिस्तानसोबत संरक्षण संबंध मजबूत करण्यासाठी करारही केला आहे. पाकिस्तान आणि अझरबैजान यांच्यात मजबूत संरक्षण संबंध आहेत. हे दोन्ही देश धर्माच्या नावाखाली एकमेकांशी मैत्री असल्याचा दावा करतात.
अझरबैजानच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या लेखी निवेदनात म्हटले आहे की , "पहलगाममधील हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणावाबद्दल आम्हाला चिंता आहे. सध्याचा तणाव कमी करण्यासाठी आम्ही संयम आणि संवाद साधून हा प्रश्न सोडवण्याचे दोन्ही देशांना आवाहन करतो. तसेच, आम्हाला आशा आहे की सध्याच्या परिस्थितीचे निराकरण करण्यासाठी पहलगाम हल्ल्याची खुली आणि पारदर्शक आंतरराष्ट्रीय चौकशी केली जाईल."