Shivaji Maharaj | आग्रा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक पराक्रमाची गाथा नव्या पिढीपर्यंत पोहोचविणार - मंत्री जयकुमार रावल

आग्रा येथे छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारण्याच्या कामाला वेग
Shivaji Maharaj | आग्रा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक पराक्रमाची गाथा नव्या पिढीपर्यंत पोहोचविणार - मंत्री जयकुमार रावल
Published on
Updated on

नवी दिल्ली : छत्रपती शिवाजी महाराजांनी १७ ऑगस्ट १६६६ रोजी आग्रा येथील नजरकैदेतून आपल्या असामान्य चातुर्य, धैर्य आणि संयमाच्या बळावर केलेली सुटका हा भारतीय इतिहासातील प्रेरणादायी पराक्रम आहे. या ऐतिहासिक घटनेचे महत्त्व नव्या पिढीपर्यंत पोहोचवून शिवरायांचे विचार, स्वराज्याची प्रेरणा आणि राष्ट्रप्रेमाची भावना जनमानसात रुजविण्यासाठी ‘शिवचातुर्य दिन’ आणि ‘गरुडझेप मोहीम’ यांसारखे उपक्रम प्रभावी माध्यम ठरत आहेत, असे प्रतिपादन राजशिष्टाचार मंत्री तथा छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय स्मारक, आग्रा समन्वयक जयकुमार रावल यांनी केले.

शिवचातुर्य दिनानिमित्त आग्रा किल्ला परिसरात आयोजित कार्यक्रमात आग्रा ते राजगड १,३१० किलोमीटरच्या ‘गरुडझेप मोहिमेला’ प्रारंभ झाला. यावेळी मंत्री जयकुमार रावल आणि मंत्री भरत गोगावले यांनी दौडीत धावत तसेच सायकल चालवत सहभाग नोंदविला. गरुडझेप संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. मारुती गोळे यांच्या संकल्पनेतून गेल्या सात वर्षांपासून ‘आग्रा ते राजगड गडदुर्ग मोहीम’ आयोजित केली जाते. इतिहास आणि दुर्गसंस्कृतीच्या जागरासोबतच राष्ट्रीय एकात्मता, पर्यावरण संवर्धन आणि व्यसनमुक्तीचा संदेश देणारे हे अभियान आता व्यापक जनचळवळीचे स्वरूप घेत आहे.

आग्रा येथे भव्य स्मारक उभारणीला चालना

 आग्रा येथे छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सहकार्याची भूमिका घेतली आहे. या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशचे उच्च शिक्षण मंत्री योगेंद्र उपाध्याय, महाराष्ट्राचे राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल आणि रोहयो मंत्री भरत गोगावले यांनी आग्रा येथील कोठी मीना बाजार परिसराची पाहणी केली. यावेळी दोन्ही राज्यांच्या अधिकाऱ्यांसोबत स्मारकासाठी प्रस्तावित जागा, विकासकामे आणि आराखड्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

स्थानिक इतिहासतज्ज्ञ, पर्यटन क्षेत्रातील प्रतिनिधी आणि जिल्हा प्रशासनाशी झालेल्या चर्चेनंतर स्मारकाच्या अंतिम स्वरूपासाठी दोन्ही राज्यांमध्ये समन्वयाने पुढील कार्यवाही सुरू आहे. जागतिक कीर्तीच्या वास्तुविशारद आभा लांबा यांची स्मारकाच्या वास्तुरचनेसाठी नियुक्ती करण्यात आली आहे. हे स्मारक केवळ ऐतिहासिक स्मृती जपणारे ठिकाण न राहता राष्ट्रप्रेम, सर्वधर्मसमभाव, शौर्य आणि स्वराज्याच्या विचारांचे प्रेरणाकेंद्र म्हणून विकसित करण्यात येणार असल्याचे मंत्री रावल यांनी सांगितले. 

मंत्री जयकुमार रावल आणि मंत्री भरत गोगावले यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्रा वास्तव्याशी संबंधित ऐतिहासिक स्थळांची यावेळी पाहणी केली. महाराजांना नजरकैदेत ठेवण्यात आलेला मीना बाजार परिसर, आग्रा प्रवासादरम्यान मुक्काम केलेले सेवला सराय तसेच त्यांनी भेट दिलेल्या प्राचीन शिव मंदिराला त्यांनी भेट दिली. यावेळी उत्तर प्रदेशचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री योगेंद्र उपाध्याय,आग्रा जिल्हाधिकारी मनीष बन्सल, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक नीलेश गटणे, महाव्यवस्थापक चंद्रशेखर जयस्वाल, उपसचिव विजय पोवार, उत्तर प्रदेश पर्यटन विभागाचे उपसंचालक शक्ती सिंग, प्रांताधिकारी विनोद चौधरी, आग्रा प्रांताधिकारी कृष्णा चौधरी, अधीक्षक अभियंता संजय पाटील यांच्यासह दोन्ही राज्यांतील अधिकारी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news