

Rahul Gandhi Congress training camp punishment Pachmarhi Sangathan Srijan Abhiyan
मध्य प्रदेशातील पंचमढी येथे सुरू असलेल्या काँग्रेसच्या प्रशिक्षण शिबिरात पक्षनेते राहुल गांधी दोन मिनिट उशिरा पोहोचले. पण याची त्यांना एक वेगळीच शिक्षा मिळाली. ती म्हणजे दहा पुश-अप्स मारण्याची. राहुल गांधींनीही ही शिक्षा कोणतीही हरकत न घेता स्वीकारली आणि सर्वांसमोर ती पूर्ण केली.
काँग्रेसच्या या प्रशिक्षण शिबिरात संघटन सृजन अभियान (SSA) अंतर्गत सर्व सहभागींसाठी एक नियम ठरवण्यात आला होता. जो वेळेत येणार नाही, त्याला शिक्षा म्हणून 10 पुश-अप्स मारावे लागतील.
राहुल गांधी उशिरा आल्यावर त्यांनी स्वतः पुढाकार घेत हा नियम पाळला आणि 10 पुश-अप्स पूर्ण केले. या प्रसंगाची माहिती काँग्रेसच्या एका कार्यकर्त्याने दिली असून, पक्षातील अनेक नेत्यांनी राहुल गांधींच्या या वागण्याचं कौतुक केलं आहे.
पक्षाच्या प्रशिक्षण विभागाचे प्रमुख सचिन राव यांनी या शिबिरात शिस्त पाळण्याचा आग्रह धरला होता. या मोहिमेचा उद्देश काँग्रेसचे कार्यकर्ते व नेते यांच्यात संगठन, वेळेची शिस्त आणि जबाबदारीची भावना निर्माण करणे हा होता.
काँग्रेसचे मीडिया समन्वयक अभिनव बरोलिया यांनी सांगितलं, “काँग्रेसच्या शिबिरांमध्ये शिस्त आणि समानता यांना सर्वाधिक प्राधान्य दिलं जातं. आमच्या पक्षात सर्व सदस्यांसाठी नियम समान आहेत, नेता असो किंवा कार्यकर्ता.” बरोलिया यांनी पुढे म्हटलं की, “काँग्रेसमध्ये लोकशाही आहे, हुकूमशाही नाही. आमच्या शिबिरात वेळ, नियम आणि शिस्त या गोष्टींना महत्त्व दिलं जातं.”
शिबिर पूर्ण झाल्यानंतर राहुल गांधी थेट बिहारच्या प्रचार मोहिमेसाठी रवाना झाले. काँग्रेसच्या प्रशिक्षण शिबिराचं आयोजन संघटन सृजन अभियान (SSA) अंतर्गत करण्यात आलं होतं.
या उपक्रमाचा उद्देश, पक्षाचं संघटन अधिक मजबूत करणे आणि कार्यकर्त्यांना सक्रिय बनवणे हा आहे.
काँग्रेस नेते सचिन राव यांनी सांगितलं की, “शिबिरात अनेक विषयांवर चर्चा झाली, पण त्यातील सविस्तर माहिती उघड करण्याची आम्हाला परवानगी नाही.” गेल्या पाच महिन्यांत राहुल गांधींचा मध्य प्रदेशातील हा दुसरा दौरा आहे. मागील वर्षी डिसेंबरमध्ये बेलगावी येथे झालेल्या काँग्रेस कार्यसमितीच्या बैठकीत या मोहिमेची घोषणा करण्यात आली होती. या उपक्रमाची औपचारिक सुरुवात 3 जून रोजी भोपालमधून करण्यात आली होती.
एका वरिष्ठ काँग्रेस नेत्याने सांगितलं की, “आम्ही मध्य प्रदेशात बऱ्याच काळापासून सत्तेबाहेर आहोत. पण मिशन 2028 अंतर्गत पुन्हा राज्यात काँग्रेसची सत्ता आणण्यासाठी आम्ही तयारी सुरू केली आहे.” या प्रशिक्षण शिबिराचा उद्देश केवळ नियम आणि शिस्त नाही, तर प्रत्येक कार्यकर्त्याला संघटनात्मक जबाबदारीची जाणीव करून देणे हा होता.