

Shashi Tharoor on Mustafizur Rahman
नवी दिल्ली: बांगलादेशातील अल्पसंख्याकांवर होणाऱ्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) सूचनेनंतर कोलकाता नाईट रायडर्सने (KKR) बांगलादेशी वेगवान गोलंदाज मुस्तफिझुर रहमानला संघातून मुक्त केले आहे. या निर्णयावर काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली असून, "खेळात विनाकारण राजकारण आणू नका," असा सल्ला दिला आहे.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर आपली भूमिका मांडताना थरूर यांनी म्हटलं आहेक की, "आपण येथे नक्की कोणाला शिक्षा देत आहोत देशाला, व्यक्तीला की त्याच्या धर्माला? खेळाच्या या अशा विचारशून्य राजकीयकरणामुळे आपण कुठे जाणार आहोत?जर संबंधित खेळाडू लिटन दास किंवा सौम्य सरकार (दोघेही हिंदू) असते, तर आपली प्रतिक्रिया अशीच असती का?", असा सवालही शशी थरुर यांनी केला आहे.
डिसेंबर २०२५ मध्ये झालेल्या आयपीएल २०२६ च्या मिनी लिलावात केकेआरने मुस्तफिझुरला ९.२० कोटी रुपयांना खरेदी केले होते. मात्र, बांगलादेशात हिंदूंवर होणाऱ्या हल्ल्यांनंतर भाजपने त्याला संघातून काढण्याची मागणी लावून धरली होती. यावर थरूर यांनी स्पष्ट केले की, भारत सरकारने अल्पसंख्याकांच्या संरक्षणासाठी ढाकावर दबाव कायम ठेवला पाहिजे, परंतु मुस्तफिझुरचा या हिंसाचाराशी कोणताही संबंध नाही. "त्याने कोणतेही प्रक्षोभक भाषण केलेले नाही किंवा हिंसाचाराचे समर्थनही केलेले नाही. तो एक खेळाडू आहे आणि खेळाला राजकारणाशी जोडणे पूर्णपणे अयोग्य आहे," असेही ते म्हणाले. भारत आपल्या सर्व शेजाऱ्यांना वाळीत टाकू लागला आणि कोणाशीही खेळायचे नाही असे ठरवू लागला, तर ते हिताचे ठरणार नाही. या विषयात आपल्याला मोठ्या मनाची आणि विचारांची गरज आहे," असे त्यांनी नमूद केले.
मुस्तफिझुरच्या निवडीवरून गेल्या काही दिवसांपासून राजकारण तापले. भाजप नेते संगीत सोम यांनी केकेआरचा मालक शाहरुख खान याच्यावर 'देशद्रोही' असल्याची टीका केली होती. बांगलादेशात हिंदूंचा छळ होत असताना तिथल्या खेळाडूंना संधी देणे हा देशाशी द्रोह असल्याचे सोम यांनी म्हटले होते. शिवसेना आणि भाजपच्या इतर नेत्यांनीही मुस्तफिझुरच्या आयपीएलमधील सहभागाला विरोध दर्शवला होता.
बांगलादेशात खोकन चंद्र दास या हिंदू तरुणाचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला. खोकन यांच्यावर तीन दिवसांपूर्वी अमानुष हल्ला करून त्यांना पेटवून देण्यात आले होते. गेल्या काही दिवसांत बजरंग बिस्वास, अमृत मंडल आणि दिपू चंद्र दास यांसारख्या हिंदू व्यक्तींच्या हत्या झाल्यामुळे बांगलादेशातील अल्पसंख्याकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. डिसेंबरमध्ये भारतविरोधी तरुण नेता उस्मान हादी याच्या हत्येनंतर बांगलादेशात भारतविरोधी निदर्शने तीव्र झाली असून हिंदूंना लक्ष्य केले जात आहे.