

Bangladesh Hindu youth death
ढाका : बांगलादेशात थर्टी फर्स्टच्या रात्री (३१ डिसेंबर) जमावाने जिवंत जाळण्याचा प्रयत्नात गंभीर जखमी झालेला हिंदू तरुण खोकन चंद्र दास याचा आज (दि. ३ जानेवारी) सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला. गेल्या तीन दिवसांपासून तो मृत्यूशी झुंज देत होता. ढाका येथील नॅशनल बर्न इन्स्टिट्यूटमध्ये उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली, असे वृत्त 'एएनआय'ने दिले आहे.
शरियतपूर जिल्ह्यातील दामुद्या उपजिल्ह्यातील कोनेश्वर युनियनमध्ये खोकन दास यांचे क्युरभांगा बाजारात औषधांचे दुकान होते. ३१ डिसेंबर रोजी रात्री ९:३० च्या सुमारास दुकान बंद करून रिक्षाने घरी परतत असताना, हल्खोरांनी त्यांना रस्त्यात अडवले. त्यांच्यावर धारदार शस्त्रांनी वार करून, अंगावर पेट्रोल ओतले आणि त्यांना जिवंत पेटवून दिले. स्वतःचा जीव वाचवण्यासाठी दास यांनी शेजारील तलावात उडी घेतली. त्यांचा आरडाओरडा ऐकून स्थानिक नागरिक धावून आल्याने हल्लेखोर पसार झाले.
उपचारादरम्यान मृत्यू नॅशनल बर्न इन्स्टिट्यूटचे प्राध्यापक डॉ. शाओन बिन रहमान यांनी सांगितले की, "आज सकाळी ७:२० वाजता खोकन दास यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांच्या शरीराचा ३० टक्के भाग भाजला होता, तसेच चेहरा आणि श्वसननलिकेला गंभीर इजा झाली होती." दास यांच्या पोटावर शस्त्राने केलेले गंभीर वार होते. दरम्यान, या प्रकरणी स्थानिक पोलिसांनी सांगितले की. या प्रकरणी रब्बी आणि सोहाग नावाच्या दोन स्थानिक संशयितांची ओळख पटली आहे. त्यांना अटक करण्यासाठी पोलिसांचे पथक प्रयत्नशील असून इतर आरोपींचाही शोध घेतला जात आहे.
कुटुंबीयांचा आक्रोश आणि न्यायाची मागणी खोकन दास यांची पत्नी सीमा दास यांनी सांगितले की, "माझे पती शांत स्वभावाचे होते, त्यांचे कोणाशीही वैर नव्हते. त्यांच्यावर असा हल्ला का झाला, हे आम्हाला समजत नाहीये." तर त्यांचे पुतणे शांतो दास यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींना तात्काळ कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे.
हिंदूंवरील हल्ल्यांच्या घटनांमध्ये वाढ बांगलादेशात अल्पसंख्याक हिंदू समुदायावर होणाऱ्या हल्ल्यांच्या घटनांमुळे चिंता व्यक्त केली जात आहे. गेल्या महिन्यातच मयमनसिंह येथे दिपू चंद्र दास या कामगाराची ईशनिंदेच्या आरोपावरून जमावाने हत्या केली होती, तर राजबारी येथे अमृत मंडल या तरुणाची हत्या करण्यात आली होती. या घटनांमुळे भारतातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.