

आदित्य ठाकरे म्हणाले....
कोस्टल रोड प्रकल्पाचा मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी काडीमात्र संबंध नाही
वोट चोर, नोट चोर आणि क्रेडिट चोर सरकारमध्ये बसलेत
हिंदी भाषा महाराष्ट्रावर लादता येणार नाही
Aaditya Thackeray Exclusive Interview
मुंबई : आम्ही मुंबईत रखडलेल्या पुनर्विकासाचा प्रश्न मार्गी लावला. १६० स्क्वेअर फुटांच्या घरात राहणाऱ्यांना ५०० स्क्वेअर फुटांची हक्काची घरे दिली. "हे काम आम्ही अभिमानाने सांगू शकतो," असे स्पष्ट करत, "मागील दहा ते पंधरा वर्षांमध्ये भाजपची सत्ता असलेले एक तरी शहर सुंदर असल्याचे मला दाखवावे. नुकतेच इंदूरमध्ये काय झाले ते पाहा. तिथे पाण्याची लाईन आणि सांडपाण्याची लाईन एकमेकांत मिसळल्यामुळे पाणी दूषित झाले. हे दूषित पाणी प्यायल्यामुळे १८ लोकांचा मृत्यू झाला. दिल्लीपासून गल्लीपर्यंत एकच पक्ष पाहिजे असे आवाहन करणाऱ्या पक्षाने दिल्ली शहराचे काय हाल केले आहेत," अशा शब्दांत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी 'पुढारी न्यूज'शी बोलताना भाजपवर हल्लाबोल केला.
यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले की, "मुंबईत आम्ही गेल्या २५ वर्षांत महानगरपालिकेच्या माध्यमातून अनेक विकासकामे करून दाखवली आहेत. आम्ही मुंबईत रखडलेल्या पुनर्विकासाचा प्रश्न मार्गी लावला. १६० स्क्वेअर फुटांच्या घरात राहणाऱ्यांना ५०० स्क्वेअर फुटांची हक्काची घरे दिली. हे काम आम्ही अभिमानाने सांगू शकतो," असे स्पष्ट करत, "भाजपने चालवलेले एक तरी सुंदर शहर मला दाखवावे. इंदूरमध्ये पाण्याचे दूषितीकरण झाल्याने १८ जणांचा बळी गेला. हीच तुमची प्रगती का? भाजप सांगू शकते का?" असा सवाल त्यांनी केला.
"भाजप केवळ हिंदू-मुस्लिम आणि घुसखोरांच्या मुद्द्यांवर बोलते. त्यांना विकासाशी देणेघेणे नाही," असा आरोप करत आदित्य ठाकरे म्हणाले की, "सध्याच्या सरकारमध्ये केवळ ‘वोट चोर’ आणि ‘नोट चोर’च नाहीत, तर ‘क्रेडिट चोर’ही बसले आहेत." अशा शब्दांत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आदित्य ठाकरे यांनी पुढारी न्यूजशी बोलताना महायुती सरकारवर हल्लाबोल केला. हिंदी भाषा महाराष्ट्रावर लादता येणार नाही, असा पुन्नरुच्चारही त्यांनी केला.
कोस्टल रोड प्रकल्पाचा मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी काडीमात्र संबंध नाही. २०१२ च्या वचननाम्यात आणि २०१३ मध्ये उद्धव साहेबांनी पत्रकार परिषद घेऊन कोस्टल रोडची संकल्पना मांडली होती. २०१४ मध्ये आमचे सरकार आल्यावर आम्हीच याचे भूमिपूजन केले. आम्ही केलेला कोस्टल रोड ‘टोल फ्री’ आहे. मात्र, सध्याचे सरकार केवळ क्रेडिट घेण्याचे काम करत आहे, असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला.
यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले की, "राजकारण एका बाजूला असले तरी कुटुंब म्हणून आम्ही एकमेकांसाठी आहोत, ही भावना खूप सुखद आहे. दोन्ही कुटुंबांत कधीही कटुता नव्हती. माझे वडील उद्धव ठाकरे आणि काका (राज ठाकरे) दोघेही मनमोकळे आणि कलाकार आहेत. दोघेही मनात येईल ते बोलतात. शहर कसं असायला पाहिजे याची त्यांना अचूक जाणीव आहे. दोघांनाही मिमिक्री खूप चांगली जमते. दोघेही गोष्टी कार्टूनिस्टच्या भूमिकेतून पाहतात. दोघांमध्ये भाषणाची एक वेगळी शैली आहे. आता लवकरच महापालिका निवडणूक प्रचारानिमित्त ‘तोफखाना’ सुरू होणार आहे, याची सर्वांनाच उत्सुकता आहे," अशा शब्दांत पुढारी न्यूजशी बोलताना आदित्य ठाकरे यांनी ठाकरे कुटुंबीयांच्या मनोमीलनावर भाष्य केले. यावेळी त्यांनी महायुती सरकारच्या धोरणांवर जोरदार हल्लाबोलही केला.
आदित्य ठाकरे यांनी आगामी महापालिका निवडणुकांसाठी शिवसेना सज्ज असल्याचे जाहीर केले. "२०१७ च्या वचननाम्यातील ९० टक्के कामे आम्ही पूर्ण केली आहेत. आता लवकरच मुंबईकरांसाठी नवा वचननामा जाहीर करणार आहोत. आम्ही केवळ आश्वासने देत नाही, तर ती पूर्ण करून दाखवतो," असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.