

महान फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी यांच्या बहुचर्चित कोलकाता भेटीला आज गालबोट लागले
संतप्त चाहत्यांनी घोषणाबाजी करत मैदानावर बाटल्या फेकत खुर्च्यांची मोडतोड केली
ममता बॅनर्जींनी दिले घटनेच्या सखोल चौकशीचे आदेश
Messi in india
कोलकाता : महान फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी यांच्या बहुचर्चित कोलकाता भेटीला आज (दि. १३) गालबोट लागले. मेस्सी स्टेडियममध्ये १० मिनिटांपेक्षा कमी वेळ उपस्थित होता. यामुळे त्याची एक झलक पाहण्यासाठी तासन्तास वाट पाहणाऱ्या अनेक चाहत्यांची निराशा झाली. यावेळी त्यांनी अधिकारी आणि राजकारण्यांना लक्ष्य करून घोषणाबाजी करत मैदानावर बाटल्या फेकल्या. खुर्च्यांची मोडतोड केली. अचानक घडलेल्या या प्रकाराने मैदानावर प्रचंड तणाव निर्माण झाला. आता या संपूर्ण प्रकारानंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीसह फुटबॉल चाहत्यांची मनःपूर्वक माफी मागितली आहे.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सॉल्ट लेक स्टेडियममध्ये आज झालेल्या गोंधळामुळे आणि गैरव्यवस्थापन हे अत्यंत वेदनादायी आणि निःशब्द करणारे आहे, असे ममता बॅनर्जी यांनी एक्सवर पोस्ट करत स्पष्ट केले आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, मेस्सीची एक झलक पाहण्यासाठी जमलेल्या हजारो क्रीडाप्रेमी आणि चाहत्यांसोबत मी स्वतः कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी स्टेडियमकडे जात असताना झालेला प्रकार वेदनादायी होता. या घटनेची गंभीर दखल घेण्यात आली आहे. या संपूर्ण प्रकरणाची निवृत्त न्यायमूर्ती असीम कुमार रे यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमण्यात येईल. या समितीमध्ये मुख्य सचिव आणि गृह व पर्वतीय व्यवहार विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव यांचा सदस्य म्हणून समावेश असेल.
ममता बॅनर्जी यांनी आपल्या म्हटले आहे की, निवृत्त न्यायमूर्ती असीम कुमार रे यांच्या अध्यक्षतेखालील समिती या घटनेची सखोल चौकशी करेल. जबाबदारी निश्चित करेल आणि भविष्यात असे प्रकार टाळण्यासाठी उपाययोजना सुचवेल."
स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी कोलकात्याच्या आयकॉनिक सॉल्ट लेक स्टेडियममध्ये दाखल झाला. अर्जेंटिनाचा दिग्गज खेळाडूची एक झलक पाहण्यासाठी तासन्तास वाट पाहणाऱ्या चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह होता. फुटबॉलप्रेमींनी अभूतपूर्व उत्साहात मेस्सीचे स्वागत केले. लिओनेल मेस्सीने खचाखच भरलेल्या सॉल्ट लेक स्टेडियममध्ये प्रवेश करता चाहत्यांनी एकच जल्लोष केला. त्याच्या जयघोषाने स्टेडियम दणाणून गेले. उभे राहून चाहत्यांनी झेंडे फडकावले आणि एकसुरात त्याचे नाव घेत घोषणा दिल्या. स्टेडियमवरील वातावरणात एक चैतन्य निर्माण झाले.
मेस्सीला इतर VVIP सोबत मैदानाबाहेर काढण्यापूर्वी तो स्टेडियममध्ये १० मिनिटांपेक्षा कमी वेळ उपस्थित होता. अर्जेंटिनाचा आयकॉन पाहण्याच्या आशेने तासन्तास वाट पाहणाऱ्या अनेक चाहत्यांना त्याची व्यवस्थित झलक न मिळाल्याने निराशा झाली. काही चाहत्यांनी पोस्टरचे फलक फाडले, बाटल्या फेकल्या. खुर्च्यांची मोडतोड केली. यामुळे स्टेडियमवर काही काळ प्रचंड तणाव निर्माण झाला. सुरक्षा व्यवस्था वाढ करण्यात आली. स्टेडियमवरील परिस्थिती सोशल मीडियावर व्हायरल झाली, ज्यात झालेल्या गोंधळाचे चित्र स्पष्ट झाले. भारतीय फुटबॉल चाहत्यांसाठी ऐतिहासिक आणि आनंदी असा हा क्षण गालबोट लागून संपुष्टात आला.