

पुढारी ऑनलाईन डेस्क : UPSC CSE Result 2024 | केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) नागरी सेवा परीक्षा (CSE) २०२४ चा अंतिम निकाल मंगळवारी (दि.२२) जाहीर केला. प्रयागराज येथील शक्ती दुबे हिने यूपीएससी सीएसई २०२४ मध्ये देशात अव्वल स्थान पटकावले आहे. हरियाणाच्या हर्षिता गोयल हिने दुसरा क्रमांक मिळवला आहे. तर पुण्याचा अर्चित पराग डोंगरे याने तिसरा क्रमांक मिळवला.
ही परीक्षा दिलेले आणि प्रिलिम्स, मेन्स, मुलाखत हे सर्व टप्पे उत्तीर्ण झालेले उमेदवार https://upsc.gov.in/ या अधिकृत वेबसाइटवर त्यांचा निकाल पाहू शकतात.
भारतीय प्रशासकीय सेवा (IAS), भारतीय परराष्ट्र सेवा (IFS), भारतीय पोलिस सेवा (IPS) आणि विविध गट 'A' आणि गट 'B' केंद्रीय सेवांमधील नियुक्त्यांसाठी एकूण १,००९ उमेदवारांची निवड करण्यात आली आहे.
प्रयागराजमध्ये जन्मलेली शक्ती दुबे ही एका मध्यमवर्गीय कुटुंबातील आहेत. तिने प्रयागराज येथूनच शालेय आणि पदवी शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर तिने बनारस हिंदू विद्यापीठातून (BHU) बायोकेमिस्ट्रीमधून पदव्युत्तर शिक्षण घेतले. तिने २०१८ पासून नागरी सेवा परीक्षेची तयारी सुरू केली.
यूपीएससीच्या माहितीनुसार, अर्चित डोंगरने व्हीआयटी, वेल्लोर येथून इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकीमध्ये बीटेक शिक्षण घेतले आहे. अर्चित मुळचा पुण्याचा असून त्याचे शालेय शिक्षण मुंबईत झाले. अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याने एका आयटी फर्ममध्ये एक वर्ष काम केले. त्यानंतर त्याने नोकरी सोडून नागरी सेवा परीक्षेच्या तयारीवर लक्ष केंद्रित केले.
विशेष म्हणजे, यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होण्याची अर्चितची ही पहिलीच वेळ नाही. त्याने याआधी २०२३ मध्ये १५३ व्या क्रमांकासह यूपीएससी परीक्षा क्रॅक केली होती. पण त्याच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे २०२४ मधील परीक्षेत त्याने देशात तिसरा येण्याचा मान मिळवला आहे.