मानवाधिकार आयोगाकडून सात लघुपटांना पुरस्कार; ‘किरण-ए रे ऑफ होप’ ठरला सर्वोत्कृष्ट लघुपट

मानवाधिकार आयोगाकडून सात लघुपटांना पुरस्कार; ‘किरण-ए रे ऑफ होप’ ठरला सर्वोत्कृष्ट लघुपट

Published on

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : लघुपट हे समाजात बदल घडवून आणण्याचे अत्यंत प्रभावी माध्यम आहे. मर्यादित वेळेत संक्षिप्तपणे प्रभावी संदेश पोहोचवण्यासाठी लघुपट हे अतिशय प्रभावी साधन आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती अरुण मिश्रा यांनी केले.

राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाद्वारे आयोजित मानवी हक्क विषयावर आयोजित लघुपटांच्या सात विजेत्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. दरम्यान, मराठी दिग्दर्शक भूषण अरुण मेहरे यांच्या 'किरण-ए रे ऑफ होप' या लघुपटाला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक देण्यात आले. मेहरे यांच्यासह अन्य ६ विजेत्यांनाही पारितोषिक प्रदान करण्यात आले. याप्रसंगी न्यायमूर्ती मिश्रा यांच्यासह आयोगाचे पदाधिकारी डॉ. ज्ञानेश्वर मुळे, राजीव जैन, श्रीमती विजया भारती सयानी, भरत लाल उपस्थित होते. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांनी विजेत्यांची नावे जाहीर केली.

कोणाला मिळाले पुरस्कार?

राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या या वर्षीच्या स्पर्धेत १३९ प्रवेशिका आल्या होत्या. यापैकी भूषण अरुण मेहरे यांच्या एलजीबीटीक्यु लोकांच्या अधिकारांवर प्रकाश टाकणाऱ्या 'किरण-ए रे ऑफ होप' या लघुपटाला प्रथम क्रमांकाचे पारीतोषिक मिळाले. तर द्वितीय पारितोषिक बिभुज्जल राज कश्यप यांना त्यांच्या आसामी भाषेतील 'मुखाग्नी- द स्मशान' या लघुपटाला देण्यात आला. एका सत्यकथेने प्रेरित असलेला हा चित्रपट अस्पृश्यता, जातिभेद, सामाजिक कट्टरता, जात पंचायतीचे अतिउत्साही हुकूम यासह विविध मुद्दे मांडतो. नितीन सोनकर यांना त्यांच्या हिंदी भाषेतील 'राईट टू फ्रीडम' या चित्रपटासाठी तृतीय पारितोषिक मिळाले. झोपडपट्टीत राहणाऱ्या मुलांसाठी समान संधींचा प्रतिकात्मक पुरस्कार करणारा हा लघुपट आहे.

या स्पर्धेतील प्रथम पारितोषिक दोन लाख रुपये, द्वितीय पारितोषिक दीड लाख रुपये आणि तृतीय पारितोषिक एक लाख रुपये आहे. तिन्ही विजेत्यांना प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्हही प्रदान करण्यात आले. तसेच या ३ लघुपटांसह अब्दुल्ला अल्फाजीना यांच्या 'ग्लास ऑफ ह्युमॅनिटी', सुप्रीती घोष यांचे 'हॅरॅसमेंट ऑफ दीपशिखा', एम. बास्कर यांचे 'नरागम – हेल' आणि रशीद उस्मान निंबाळकर यांचे 'रहस' या चार लघुपटांना प्रत्येकी ५० हजार रुपयांसह 'विशेष लक्षवेधी प्रमाणपत्र' देण्यात आले.

१३९ लघुपटांपैकी विविध स्तर आणि परिक्षा पार करत माझ्या लघुपटाला पहिला क्रमांक मिळाला याचा आनंद आहे. ट्रान्सजेंडर लोकांच्या समस्या, त्यांचे अधिकार यावर एक विचार ठेवून चित्रपट बनवला होता. माझी संकल्पना या चित्रपटाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवू शकलो, त्याला पारितोषिकही मिळाले, याचा मनस्वी आनंद आहे.
– भूषण अरुण मेहरे, दिग्दर्शक, 'किरण-ए रे ऑफ होप'

   हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news