Lok Sabha Election 2024 : नागपूरसाठी तीन तर रामटेकसाठी एक उमेदवारी अर्ज दाखल | पुढारी

Lok Sabha Election 2024 : नागपूरसाठी तीन तर रामटेकसाठी एक उमेदवारी अर्ज दाखल

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : नागपूर सार्वत्रिक लोकसभा मतदारसंघ निवडणुकीसाठी आज (दि.२२) तीन उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. आतापर्यंत एकंदर पाच अर्ज दाखल करण्यात आल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिली आहे. रामटेक लोकसभा मतदारसंघासाठी आज (शुक्रवारी) एक अर्ज दाखल करण्यात आला. शेवटच्या दोन दिवसात प्रमुख पक्ष उमेदवारांचे नामांकन होणार आहे. नागपुरात भाजपच्या हायटेक प्रचार कार्यालयाचे शनिवारी (दि.२३) गणेशपेठेत उद्घाटन होणार असून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी २७ मार्च तर काँग्रेसचे संभाव्य उमेदवार आमदार विकास ठाकरे २६ मार्चला नामांकन अर्ज दाखल करणार आहेत.

नागपूर लोकसभा मतदारसंघासाठी आज नारायण चौधरी (सोशलिस्ट युनिटी सेंटर ऑफ इंडिया, कम्युनिस्ट) , साहिल तुरकर (अपक्ष) आणि दीपक मस्के (बहुजन महापार्टी) यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. तर रामटेकसाठी प्रमोद खोब्रागडे (आंबेडकराईट पार्टी ऑफ इंडिया) यांनी अर्ज दाखल केला. रामटेकसाठी आज रांग लावून १०४ अर्जांची तर नागपूरसाठी १३१ अर्जांची विक्री करण्यात आल्याने प्रत्यक्षात नामांकन अर्ज वाढणार का, अशी चिन्हे आहेत. ईव्हीएमविरोधातील संतापातून ४०० उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा इशारा आधीच देण्यात आला आहे. नामनिर्देशनपत्रे सार्वजनिक सुट्टी व्यतिरिक्त २७ मार्चपर्यंत सकाळी ११ ते ३ वाजेपर्यंत सादर करता येतील.
२८ मार्चला नामनिर्देशनपत्रांची छाननी करण्यात येणार आहे. ३० मार्च ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे. १९ एप्रिल रोजी पहिल्या टप्प्यात नागपूर, रामटेकसह पूर्व विदर्भातील पाच लोकसभा मतदारसंघात मतदान होणार आहे.

हेही वाचा : 

Back to top button