

Security has been tightened across the country
नवी दिल्ली: पुढारी वृत्तसेवा
ऑपरेशन सिंदूर' नंतर राजधानी दिल्लीसह देशभरातील सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. भारतीय सैन्याच्या 'ऑपरेशन सिंदूर' नंतर देशभरातील प्रमुख शहरांमध्ये, विमानतळांवर, रेल्वे स्थानकांसह सार्वजनिक ठिकाणी सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे.
या सर्व ठिकाणी अतिरिक्त पोलिस कर्मचारी आणि निमलष्करी दल तैनात करण्यात आले आहेत. देशाच्या राजधानी दिल्लीमध्ये देखील ठिकठिकाणी सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे, असे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.
आम्ही प्रमुख ठिकाणी अधिक सुरक्षा कर्मचारी तैनात केले आहेत. दिल्ली पोलिस पूर्णपणे सतर्क आहेत. कोणालाही कायदा आणि सुव्यवस्था भंग करण्याची परवानगी दिली जाणार नाही. सुरक्षा पथके महत्त्वाच्या ठिकाणी कडक नजर ठेवून आहेत आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लक्ष ठेवत आहेत, असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.
पहलगाम हल्ल्याचा बदला म्हणून भारताने पाकिस्तानच्या अनेक ठिकाणावर बुधवारी (दि.७) एअर स्ट्राईक केला. भारताने बुधवारी 'ऑपरेशन सिंदूर'च्या द्वारे अनेक दहशतवादी ठिकाणांना लक्ष्य करून हवाई हल्ले केले. या हल्ल्यात ९ दहशतवादी ठिकाणे उद्ध्वस्त झाली. या कारवाईत ३ जणांचा मृत्यू तर १२ जण जखमी असल्याचे वृत आहे. स्वतः पंतप्रधान मोदी या ऑपेरेशनवर जवळून लक्ष ठेवून होते.
पहलगाम हल्ल्याच्या १५ दिवसांनंतर, भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर (पीओके) मधील ९ दहशतवादी तळांवर हवाई हल्ले केले. बुधवारी (दि.७) रात्री १.३० वाजता बहावलपूर, मुरीदके, बाग, कोटली, मुझफ्फराबाद यासह नऊ ठिकाणी 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत हल्ले करण्यात आले. ही तीच ठिकाणे आहेत जिथून भारतावर दहशतवादी हल्ल्यांचे नियोजन आणि अंमलबजावणी केली जात होती. एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, लष्कर आणि जैशचे मुख्यालय उद्ध्वस्त करण्यात आले आहे.