Saudi Arabia King Fahd Airport attack Indian killed : सौदी अरेबियातील दम्माम येथील किंग फहद आंतरराष्ट्रीय विमानतळावर झालेल्या हल्ल्यात दोन जण ठार झाले आणि दोघे जखमी झाले आहेत. मृतांमध्ये एका भारतीय नागरिकाचा समावेश आहे, अशी माहिती सौदी अधिकाऱ्यांच्या हवाल्याने रियाधमधील भारतीय दूतावासाने आज (दि. २२ ऑक्टोबर) दिली.
रियाधमधील भारतीय दूतावासाने सांगितले की, ते या घटनेबद्दल अधिक माहिती गोळा करत असून बाधित कुटुंबांशी संपर्क साधत आहेत. 'एक्स' (X) वर जारी केलेल्या निवेदनात दूतावासाने म्हटले आहे, "आमच्या संवेदना आणि प्रार्थना मृतांच्या कुटुंबीयांसोबत आहेत आणि आम्ही जखमींच्या लवकर बरे होण्याची कामना करतो."
परराष्ट्र मंत्रालयाच्या एका निवेदनात म्हटले आहे, "आम्ही सौदी अरेबियातील नागरी आणि ऊर्जा पायाभूत सुविधांवर होत असलेल्या सततच्या हल्ल्यांचा तीव्र निषेध करतो. यामध्ये २१ ऑक्टोबर रोजी दम्मम येथील किंग फहद आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि पूर्व प्रांतातील सौदी अरामकोच्या शायबाह तेल क्षेत्रावर झालेल्या हल्ल्यांचाही समावेश आहे. दुर्दैवाने, या हल्ल्यांमुळे नागरिकांचा मृत्यू झाला असून काही जण जखमी झाले आहेत."
सौदीच्या नागरी विमान वाहतूक प्राधिकरणाने सांगितले की, हल्ल्यामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली जात आहे. विमानतळाचे कामकाज पुन्हा सुरू झाले असून हवाई वाहतूक पूर्ववत झाली आहे. या महिन्यात सौदी अरेबियावर इराण-समर्थित हुथी बंडखोरांकडून जवळपास दररोज हल्ले होत आहेत. मात्र रियाधच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर झालेला हल्ला गेल्या काही वर्षांतील सर्वात घातक हल्ला ठरला होता. सौदीच्या ऊर्जा मंत्रालयाने म्हटलं आहे की, एका तेल सुविधेला लक्ष्य करणाऱ्या ड्रोनला पाडल्यानंतर त्याचे अवशेष पडल्यामुळे दोन जण ठार, तर दोन जण जखमी झाले आहेत.
रविवारी, भारतीय दूतावासाने सौदी अरेबियात राहणाऱ्या भारतीय नागरिकांना, आपत्कालीन सूचना मिळाल्यास सौदी प्रशासनाने दिलेल्या ताज्या सुरक्षा सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले होते. सोशल मीडियावर शेअर केलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये लोकांना शांत राहण्याचा, अधिकृत सूचनांचे पालन करण्याचा आणि त्वरित इमारतीमधील सर्वात जवळच्या सुरक्षित ठिकाणी जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तसेच, बाहेर पडणे सुरक्षित होईपर्यंत लोकांना आपापल्या घरांत किंवा इमारतींमध्येच राहण्यास सांगण्यात आले आहे.
सौदी अरेबियातील तेल सुविधा आणि नागरी पायाभूत सुविधांवर हुथी बंडखोरांचे हल्ले गेल्या काही आठवड्यांत तीव्र झाले होते. त्यामुळे रियाधला आपला मुख्य विमानतळ बंद करावा लागला. 'एएफपी'च्या (AFP) माहितीनुसार, या महिन्यात सौदी विमानतळांवर झालेल्या हल्ल्यांमध्ये २२ जणांचा मृत्यू झाला. हे हल्ले अशा वेळी होत आहेत जेव्हा येमेनमधील गृहयुद्धादरम्यान अनेक वर्षांपासून पाळला जाणारा संघर्षविराम जुलै महिन्यात मोडीत निघाला. इराणचे समर्थन असलेले हुथी बंडखोर येमेन सरकारविरोधात लढत आहेत. येथील सरकारने सौदीच्या नेतृत्वाखालील आघाडीचा पाठिंबा आहे.
हुथी बंडखोरांनी सौदी अरेबियाला लक्ष्य करून सागरी नाकेबंदी जाहीर केली आणि त्यांच्या जहाजांवर, प्रदेशावर व तेल सुविधांवर हल्ले करण्यास सुरुवात केली. सप्टेंबर महिन्यात त्यांनी एक मोठी मोहीम राबवून लाल समुद्राच्या किनारपट्टीवरील असे काही भाग आपल्या ताब्यात घेतले, जे यापूर्वी सरकारी नियंत्रणाखाली होते. याला प्रत्युत्तर म्हणून, सौदी हवाई दलाने हुथी बंडखोरांच्या नियंत्रणाखालील भागांवर वारंवार हवाई हल्ले केले आहेत; सध्या येमेनचा मोठा भूभाग हुथी बंडखोरांच्या ताब्यात आहे.