

Gram Panchayat Election Promise Viral Video: राजस्थानमध्ये पंचायत निवडणुकीचा ज्वर शिगेला पोहचला आहे. त्यामुळं राजकारणी लोकं मतदारांना आपल्याकडे आकृष्ट करण्यासाठी तोंडाला येईल ती आश्वासने देत सुटली आहे. अशाच एका भन्नाट आश्वासनाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
या व्हिडिओत गावात रस्ते, वीज, पाणी देण्याचे आश्वासन आता चालत नाही. तरूणांच्या लग्नाचा प्रश्न त्यापेक्षा गंभीर झाला आहे. त्यामुळं सरपंच पदासाठी इच्छुक असलेल्या महिला उमेदवारानं हाच खरा ज्वलंत प्रश्न ओळखून गावातील अविवाहित मुलांचे लग्नच करून देतो असे आश्वासन दिलं. त्यासाठी ती सुंदर मुली देखील शोधून देणार असा मोठा दावा केला आहे.
अनिता सैनी या सरपंच पदाच्या उमेदवार असलेल्या महिलेने व्हिडिओत सांगितलं की, 'जर मी सरपंचकीची निवडणूक जिंकली तर गावातील ज्या अविवाहित तरूणांना लग्नासाठी मुली मिळत नाहीयेत त्यांचे लग्न करून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे. गरज पडली तर दुसऱ्या गावात जाऊन मुलींचा शोध घेतला जाईल. एवढंच काय अनिता सैनी यांनी बारात घेऊन जाण्यासाठी रेल्वेची देखील सोय केली जाईल असे मोठे आश्वासन दिलं.
आता अनिता सैनी यांच्या पंचायत निवडणूक प्रचारात लग्नाचे आश्वासन देऊन एक वेगळाच मुद्दा समोर ठेवला आहे. आता प्रतिस्पर्धी उमेदवार विकास कामांचे मुद्दे घेऊन लोकांमध्ये जात असताना अनिता सैनी यांनी तरूणांच्या लग्नाच्या प्रश्नाला हात घालत हा मुद्दा निवडणुकीचा अजेंडाच सेट केला आहे.
राजस्थान आणि हरियाणामध्ये काही भागात तरूण मुलांच्या लग्नाचा प्रश्न अतिशय गंभीर आहे. अनेकवेळा हा प्रश्न समोर येत राहतो. काही प्रकरणात तर या ठिकाणची मुले लग्नासाठी बाहेर राज्यातील मुली घेऊन येतात. काही ठिकाणी तर महिलांची खरेदी विक्री देखील होत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. त्यामुळं तरूण मुलांच्या लग्नाचा प्रश्न गंभीर झाला आहे.
अनिता सैनी यांनी अनोखे आश्वासन देऊन सोशल मीडियावर चांगलीच प्रसिद्धी मिळवली आहे. काही लोक पंचायत निवडणुकीचा हा अनोखा अंदाज असल्याचं सांगत आहेत. निवडणूक जिंकल्यानंतर अनिता या आपल्या आश्वासनावर कायम राहतात का आणि ते पूर्ण करण्यासाठी काय पावले उचलतात हे अजून स्पष्ट झालेले नाही. मात्र झुंझुनूच्या झाझड गावातील राजकारण तरूणांच्या लग्नावरून चांगलेच तापले आहे.