

चंद्रपूर : संपूर्ण राज्यात महापालिका निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टीने घवघवीत यश मिळवले असताना चंद्रपुरात मात्र अपेक्षित यश मिळवू शकले नाही. जनतेने काँग्रेसच्या गळ्यात विजयाची माळ घातली आणि मित्रपक्षांसह काँग्रेसला तब्बल ३० जागा मिळाल्या. मात्र, बहुमतापासून काही पावले दूर असलेल्या काँग्रेसला आवश्यक असलेले चार नगरसेवक मिळवता आले नाहीत. या उलट केवळ २४ जागांवर समाधान मानावे लागलेल्या भाजपाने शिवसेना (उबाठा) सोबत हातमिळवणी करत सत्ता काबीज केली. उबाठाला गृहीत धरणे काँग्रेसला महागात पडले आणि चंद्रपूर महापालिकेत काँग्रेसचे ‘पानिपत’ झाले.
बहुमताचे गणित फिस्कटले
काँग्रेसचे ३० नगरसेवक, मविआतील शिवसेना (उबाठा) चे ८, वंचित बहुजन आघाडीचे २ आणि काँग्रेसप्रेमी २ बंडखोर नगरसेवक असे एकूण संख्याबळ काँग्रेसच्या बाजूने असतानाही सत्तेचे गणित प्रत्यक्षात मात्र फिस्कटले. निकाल जाहीर होताच काँग्रेसची सत्ता येणार, हे स्पष्ट दिसत असतानाच अंतर्गत वाद आणि चुकीच्या राजकीय अंदाजामुळे सत्ता हातातून निसटली.
धानोरकर–वडेट्टीवार वादाने वाढला गुंता
महानगरपालिका निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर सत्ता स्थापनेवरून खासदार प्रतिभा धानोरकर आणि आमदार विजय वडेट्टीवार यांच्यात वाद सुरू झाला. कुणाचा महापौर, कुणाचा गटनेता आणि कुणाचा उपमहापौर यावरून पक्षांतर्गत संघर्ष उफाळून आला. नगरसेवकांची पळवापळवी, अपहरणाचे आरोप आणि प्रकरण न्यायालयापर्यंत गेले. अखेर दिल्ली पातळीवर हस्तक्षेप झाल्यानंतर सुरुवातीची अडीच वर्षे धानोरकर गटाचा महापौर आणि त्यानंतर अडीच वर्षे वडेट्टीवार गटाचा महापौर असा तोडगा काढण्यात आला.
‘जादुई आकडा’ कुणीही गाठला नाही
तोडगा निघाला असला तरी बहुमतासाठी आवश्यक असलेला जादुई आकडा काँग्रेसकडे नव्हता. तो गाठण्याची जबाबदारी खासदार धानोरकर यांची असल्याचे सांगत आमदार वडेट्टीवार यांनी काढता पाय घेतल्याची चर्चा आहे. दुसरीकडे मविआमध्ये शिवसेना (उबाठा) असल्याने “हे आपलेच आहेत, कुठे जाणार?” या समजुतीत धानोरकरांनी उबाठाशी सातत्याने संवाद टाळला. हीच रणनीती पुढे काँग्रेससाठी घातक ठरली.
उबाठाची मागणी, काँग्रेसची कोंडी
दरम्यान, आमदार वडेट्टीवारांनी सत्ता स्थापनेसाठी हालचाली केल्या, मात्र उबाठाची महापौरपदाची मागणी पूर्ण करणे त्यांना शक्य झाले नाही. कारण सुरुवातीच्या अडीच वर्षांच्या महापौरपदाची आणि बहुमताची जबाबदारी पक्षश्रेष्ठींनी खासदार धानोरकर यांच्यावर सोपवली होती. महापौरपद मिळणार नाही, हे स्पष्ट होताच शिवसेना (उबाठा)ने आपला मोर्चा भाजपाकडे वळवला आणि काँग्रेसचा डाव कोलमडला.
भाजप–उबाठा युतीचा लेखी करार
अखेर भाजप आणि शिवसेना (उबाठा) यांच्यात सव्वा–सव्वा वर्षांचा महापौर फॉर्म्युला ठरला. त्यानुसार सुरुवातीचे सव्वा वर्ष भाजपचा महापौर आणि नंतरचे सव्वा वर्ष उबाठाचा महापौर राहणार आहे. याबाबत दोन्ही पक्षांमध्ये लेखी करारही करण्यात आला असून चंद्रपूर महापालिकेवर भाजप–महायुतीची सत्ता प्रस्थापित झाली आहे.
मुनगंटीवारांच्या चाणक्यनीतीने काँग्रेस चित
सुरुवातीपासूनच आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी “महापौर भाजपचाच असेल” असा ठाम दावा केला होता. हीच भाषा आमदार विजय वडेट्टीवार यांचीही होती. मात्र, प्रत्यक्षात मुनगंटीवार यांची रणनीती यशस्वी ठरली. उबाठाला काँग्रेसकडून योग्य सन्मान मिळत नसल्याचे लक्षात येताच मुनगंटीवार यांनी शिवसेना (उबाठा) जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे यांच्याशी थेट संवाद साधला. उबाठाची महापौरपदाची मागणी मान्य करण्यात आली. नव्याने उबाठात प्रवेश केलेले प्रशांत दानव यांना उपमहापौरपदाचा होकार देण्यात आला आणि स्थायी समिती सभापतीपद देण्याचेही आश्वासन देण्यात आले. सोमवारी रात्री उशिरापर्यंत या घडामोडी सुरू राहिल्या आणि मंगळवारी (दि. १०) भाजप–महायुतीचा महापौर संगीता खांडेकर यांच्या रूपाने विराजमान झाला. मुनगंटीवारांच्या चाणक्यनीतीने काँग्रेस चित झाली.
नशिबानेही सोडली काँग्रेसची साथ
जनविकास सेनेचे प्रदीप उर्फ पप्पू देशमुख यांनी महापौरपदासाठी काँग्रेसला शेवट पर्यंत साथ दिली. मात्र, त्याचा फारसा उपयोग झाला नाही. काँग्रेसने देशमुख यांना उपमहापौरपदाचा उमेदवार करत उबाठाचे प्रशांत दानव यांच्या विरोधात मैदानात उतरवले. दोघांनाही प्रत्येकी ३२ मते मिळाल्याने ईश्वरचिठ्ठी काढण्यात आली. यात प्रशांत दानव विजयी ठरले. अखेर नशिबानेही