

sambhal violence case judicial inquiry committee submits report to cm yogi
उत्तर प्रदेशातील संभल हिंसाचाराचा न्यायालयीन चौकशी अहवाल मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना सादर करण्यात आला आहे. या अहवालात संभल हिंसाचार तसेच तेथील हिंदूंच्या लोकसंख्येचा उल्लेख आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, अहवालात दावा करण्यात आला आहे की, संभलमध्ये फक्त १५ ते २०% हिंदू उरले आहेत. आता या मुद्द्यावरून राजकारण तापले आहे. भाजपने या लोकसंख्या बदलाला देशाच्या अंतर्गत सुरक्षेसाठी मोठा धोका असल्याचे म्हटले आहे. तर सपाच्या पीडीएसमोर भाजपची कोणतीही युक्ती टिकणार नाही, असे विरोधकांनी आव्हान दिले आहे.
युपीचे प्रधान सचिव संजय प्रसाद सांगितले की, संभल हिंसाचाराची चौकशी करणा-या समितीने गुरुवारी त्यांचा अहवाल मुख्यमंत्री योगी यांना सादर केला आहे. त्या अहवालाच्या आधारे पुढील कारवाई केली जाईल. त्या अहवालाचा अभ्यास केल्यानंतरच यावर बोलता येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
तीन सदस्यीय चौकशी आयोगाने मुख्यमंत्र्यांना सुमारे ४५० पानांचा सविस्तर आणि गोपनीय अहवाल सादर केला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अहवालात संभलमध्ये हिंदूंची लोकसंख्या देखील नमूद करण्यात आली आहे. संभलमध्ये हिंदू लोकसंख्या १५-२०% आणि मुस्लिम लोकसंख्या ८०-८५% असल्याचा दावा करण्यात आला.
चौकशी अहवालात एक मोठा खुलासा करण्यात आला आहे. सुत्रांच्या माहितीनुसार यात म्हटलंय की, २२ नोव्हेंबर २०२४ रोजी खासदार जिया-उर-रहमान बर्क यांच्या वादग्रस्त भाषणामुळे हिंसेचा पाया रचला गेला. त्यांनी केलेली विधाने प्रक्षोभक होती. यानंतरच संघर्ष पेटला. या संपूर्ण कटात जिया-उर-रहमान बर्क, सोहेल इक्बाल आणि इंतेजामिया समितीचे पदाधिकारी प्रमुख भूमिकेत होते, अशी चर्चा आहे.
भाजप प्रवक्ते राकेश त्रिपाठी म्हणाले की, सुरक्षा हा मानवी जीवनासाठी सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. जिथे जिथे सुरक्षेचा अभाव जाणवतो, तिथून लोक स्थलांतर करतात. ज्या प्रकारे संभलमध्ये वारंवार दंगली झाल्या आणि या दंगलींमध्ये मोठ्या संख्येने हिंदूंची कत्तल झाली, त्यामुळेच मोठ्या संख्येने हिंदू स्थलांतरित झाले आहेत, असा आरोप त्यांनी केला.
भाजप प्रवक्त्यांनी सांगितले की, जेव्हा दंगलींमध्ये एखाद्या धर्माचा किंवा जातीचा छळ होतो तेव्हा त्यांची संख्या कमी होणे हे अगदी स्वाभाविक आहे. परंतु हे देशासाठी एक मोठे संकट आहे. देशाची लोकसंख्या जाणूनबुजून बदलण्याचे षड्यंत्र रचले जात आहे. हा लोकसंख्याशास्त्रीय बदल देशाच्या अंतर्गत सुरक्षेसाठी मोठा धोका आहे.
सपा प्रवक्ते फखरुल हसन चंद म्हणाले की, भाजप देशाला भेडसवणा-या मुख्य मुद्द्यांपासून आणि जनतेची दिशाभोल करण्यासाठी असे गोपनीय अहवाल आणते. यासारख्या गोपनीय अहवालांची जनतेला पूर्ण जाणीव आहे. आता भाजपची कोणतीही युक्ती समाजवादी पक्षाविरुद्ध काम करणार नाही.