

RSS Chief Mohan Bhagwat on Pahalgam Attack
हल्लेखोरांनी लोकांचा धर्म विचारून त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. हिंदू कधीही असे कृत्य करणार नाहीत, अशा शब्दांत सरसंघचालक मोहन भागवत यांनी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला.
ही लढाई धर्म विरूद्ध अधर्म यातील आहे. त्यामुळे आम्हाला आशा आहे की, कठोर प्रत्युत्तर दिले जाईल, असेही ते म्हणाले. पंडित दिनानाथ मंगेशकर यांच्या 83 व्या स्मृतिदिनानिमित्त विलेपार्ले येथे झालेल्या एका सार्वजनिक कार्यक्रमात ते बोलत होते.
भागवत म्हणाले की, “सध्या जी लढाई सुरू आहे ती लढाई धर्म आणि अधर्म यांच्यातील आहे, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. लोकांना त्यांचा धर्म विचारून ठार मारण्यात आले. हिंदू असा प्रकार कधीच करणार नाहीत.
हे आपल्या संस्कृतीत नाही. द्वेष आणि वैरभाव आपल्या परंपरेचा भाग नाही. पण अन्याय सहन करणेही आमच्या वृत्तीला मान्य नाही. हल्ला झाल्यानंतर संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली. तेव्हा कुणाचाही धर्म जात-पात आडवी आली नाही.”
भागवत म्हणाले, “ही घटना आठवण करून देते की ही लढाई धर्म आणि अधर्म यांच्यातील आहे. आपल्या हृदयात वेदना आहे, राग आहे. पण अधर्माचा नाश करण्यासाठी सामर्थ्य दाखवावे लागेल.
त्यांनी रामायणाचा संदर्भ देत सांगितले की, “रावणाने आपले विचार बदलण्यास नकार दिला. त्यामुळे दुसरा पर्याय उरला नाही. प्रभू रामाने त्याला ठार केले. पण ते देखील सुधारण्यासाठी संधी दिल्यानंतरच.”
ते म्हणाले, “आपण शक्तिशाली आणि दृढ प्रतिसाद अपेक्षित करतो. खरा अहिंसावादी व्यक्ती देखील बलवान असावा लागतो. जर सामर्थ्यच नसेल, तर पर्याय उरत नाही. पण जेव्हा सामर्थ्य असते, तेव्हा ते गरजेच्या वेळी दिसायला हवे.”
भागवत यांनी समाजातील एकतेचे महत्त्वही अधोरेखित केले. “जर आपण एकसंघ राहिलो, तर वाकड्या नजरेने आपल्याकडे पाहण्याची कोणाचीही हिंमत होणार नाही. आणि कोणी पाहिलंच, तर त्याचे डोळे फोडू,” असे ते ठामपणे म्हणाले.
1962 मध्ये आपल्याला धडा मिळाला. तेव्हापासून आपण लष्कराची ताकद वाढवली. आता अपेक्षाही वाढल्या आहेत. देशात संताप आहे. आशा आहे की अपेक्षा पूर्ण होतील.
हा हल्ला कधीही माफ करता येण्यासारखा नाही. आमच्या भारतीयत्वाच्या भावनेत कुणीही फूट पाडू शकत नाही.
22 एप्रिल रोजी पहलगाम येथील लोकप्रिय पर्यटक स्थळ बैसरण व्हॅलीमध्ये झालेल्या हल्ल्यात 26 लोकांचा बळी गेला.
येथील बचावलेल्या पर्यटकांनी सांगितले की, त्यांचा धर्म विचारल्यानंतरच त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता.