नवी दिल्ली : प्रशांत वाघाये
हरियाणामध्ये सध्या विधानसभा निवडणुकीचे वातावरण आहे. या निवडणुकीत कर्नाल, कुरुक्षेत्र, कैथल, पानिपत या भागांमध्ये कोण जिंकणार, कोण हरणार हे ठरवण्यासाठी मराठा समाजाची संख्या निर्णायक आहे. या मराठा समाजाचा संबंध थेट महाराष्ट्राशी आहे. तसेच हरियाणा आणि मराठी माणसाचा जेव्हा विषय येतो तेव्हा हरियाणामधील रोड मराठा समाजाविषयी आवर्जून बोलले जाते. रोड मराठा म्हणजे नक्की कोण, या प्रश्नाचे उत्तर शोधताना थोडा इतिहासाचा मागोवा घ्यावा लागतो.
१७६१ साली पानिपतच्या युद्धामध्ये मराठ्यांचा पराभव झाला होता. या गोष्टीला आता २६३ वर्ष झाली. यावेळी मोठ्या प्रमाणात म्हणजे ५० ते ६० हजार मराठा सैन्य मारले गेले होते. हा पराभव झाल्यानंतर काही मराठी सैन्य त्या ठिकाणाहून अवतीभोवती जात लपून बसले. आपली ओळख सिद्ध झाली तर आपल्याला मारले जाईल म्हणून त्यांनी तिथल्या एका राजाच्या नावाने रोड मराठा ही एक नवी ओळख तयार केली. त्यानंतर तिथे राहिलेले हा मराठा समाज ‘रोड मराठा’ म्हणून ओळखला जाऊ लागला, असे सांगितले जाते. तर युद्धानंतर उरलेला मराठा समाज रस्त्यावर राहिला म्हणूनही रोड मराठा म्हटले जाते, असाही एक मतप्रवाह आहे.
पानिपतच्या युद्धानंतर जवळपास १० वर्षांनी महादजी शिंदे, तुकडोजी होळकर यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी दिल्लीवर ताबा मिळवला होता. त्याचवेळी हरियाणा मधील पानिपत, सोनीपत, बागपत या भागावरही ताबा मिळवला होता. त्यामुळे त्यानंतरही काही मराठी सैनिकांनी तिथे राहण्याचा निर्णय घेतला. या सैनिकांचे वंशजही रोड मराठा म्हणून ओळखले जातात. हरियाणामध्ये रोड मराठा समाजाची लोकसंख्या जवळपास सात लाख एवढी आहे. कर्नाल, कुरुक्षेत्र, कैथल, पानिपत, सोनीपत आणि जिंद या जिल्हयात जास्त तर भिवानी, हिसार, रोहतक या ठिकाणी कमी प्रमाणात आहे. यातला काही समाज स्वताला धनुष्यधारी म्हणवतात. रोड मराठा समाज हा राज्यभर पसरलेला नसून एका विशिष्ट भागात मोठ्या संख्येने आहे. त्यामुळे राजकारणी लोकांसह सगळ्यांना त्यांची दखल घेणे भाग आहे. त्यामुळे सर्वपक्षीय राजकारणी त्यांच्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होत असतात. ज्याप्रमाणे महाराष्ट्रात अठरापगड जाती आहेत असे अपण म्हणतो त्याचप्रमाणे हरियाणामध्ये ३६ बिरादरी आहेत असे म्हटले जाते. मात्र रोड मराठा समाजाचा यात समावेश नाही.
एवढ्या वर्षांमध्ये स्थानिक वातावरणाचा प्रभाव म्हणून रोड मराठ्यांची भाषा हिंदी झाली. त्यांच्या राहण्या खाण्यात आणि संस्कृतीतही आता हरियाणवीपणा बऱ्यापैकी आला आहे. असे असले तरी त्यांच्या बोलण्यातील काही शब्द हे मराठी आहेत किंवा त्याला मराठीची झालर आहे, असे म्हणता येईल. पवार, चव्हाण, भोसले, सावंत, शेलार, राणे, दुधाणे, सुर्वे, महाले, चोपडे अशी मराठी आडनावे रोड मराठा समाजात आहेत. मात्र पवार आडनावाचे पंवार आणि चोपडे आडनावाचे चोपडा असा अपभ्रंश होऊन आता हीच आडनावे रुढ झाली आहेत.
दरम्यान, २००६ पासून १४ जानेवारीला पानिपतमध्ये शौर्य दिन साजरा केला जातो. मराठे १७६१ च्या युद्धात हरले असले तरी ते शौर्याने लढले म्हणून दरवर्षी शौर्य स्मारक समितीतर्फे शौर्य दिन साजरा करण्यात येतो. यामध्ये पानीपत युद्धात आपल्या प्राणांचे बलिदान देणाऱ्या योद्ध्यांना आदरांजली अर्पण करण्यात येत असल्याचे शौर्य दिन समितीचे अध्यक्ष प्रदीप पाटील म्हणतात. निवृत्त प्रशासकीय अधिकारी वीरेंद्र मराठा यांनी याची सुरुवात केली होती. मागील वर्षी या कार्यक्रमामध्ये केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया हे सहभागी झाले होते. त्यापूर्वी माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, विद्यमान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, माजी केंद्रीय मंत्री सुशिलकुमार शिंदे, खासदार उदयनराजे भोसले, कल्पनाराजे भोसले, माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्यासह महाराष्ट्रातील अनेक नेते या ठिकाणी येऊन गेले.
पानिपत मध्ये झालेल्या युद्धभूमीच्या परिसरात एक युद्ध स्मारक बांधण्यात आले आहे. त्या भागाला काला आम परिसर (काळा आंबा) म्हणून ओळख आहे. युद्धात ही भूमी रक्ताने माखल्याने तिथले आंब्याचे झाड काळे पडले आणि त्याला फळही काळे आले, असे सांगितले जाते. यानुसारच या भागाला काला आम हे नाव पडले. इंडियन ऑइलने या ठिकाणी साकारल्या जात असलेल्या शौर्य स्मारकाला २० कोटी निधी दिला. शौर्य स्मारक समितीतर्फे बनवण्यात येत असलेल्या स्मारकाला आणि त्याच्या सुशोभीकरणासाठी निधीसह जागेची आवश्यकता असल्याचे प्रदीप पाटील म्हणाले. पानीपतच्या स्मारकावर लक्ष देणे, ही महाराष्ट्र शासनाचीही जबाबदारी असल्याचे ते म्हणाले.