नवी दिल्ली : हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी ४ ऑक्टोबरला मतदान होत आहे. सत्ताधारी भाजपसह प्रमुख विरोधी पक्ष असलेला काँग्रेस, आम आदमी पक्ष आणि अन्य पक्षही पूर्ण ताकदीने निवडणूक लढवत आहेत. सर्वच पक्षांचे प्रमुख नेते या निवडणुकीत उतरले आहेत. याच निवडणुकीत काँग्रेसने प्रफुल्ल गुडधे- पाटील (Prafull Gudhe-Patil) नावाचा एक मराठी चेहरा देखील रणनितीसाठी उतरवला आहे.
महाराष्ट्रासह हरियाणा, झारखंड आणि जम्मू काश्मीर विधानसभेच्या निवडणुका एकत्र होणे अपेक्षित होत्या. मात्र, हरियाणा आणि जम्मू-काश्मीर या दोन राज्यांच्या निवडणुका निवडणूक आयोगाने जाहीर केल्या. या निवडणुका जाहीर होण्यापूर्वी काँग्रेसने विविध राज्यांमध्ये अखिल भारतीय काँग्रेस कमिटीमध्ये काही सचिव नेमले आणि त्यांच्याकडे सहप्रभारी म्हणून विविध राज्यांची जबाबदारी दिली. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सचिवांमध्ये नागपूरचे प्रफुल्ल गुडधे- पाटील यांचाही समावेश होता. त्यांना हरियाणामध्ये सहप्रभारी म्हणून जबाबदारी देण्यात आली.
मुळचे नागपूरचे असलेले प्रफुल्ल गुडधे- पाटील महाराष्ट्रातील ज्येष्ठ काँग्रेस नेते आहेत. हरियाणामध्ये काँग्रेसचे सहप्रभारी म्हणून त्यांच्याकडे राज्यभरात नेत्यांच्या सभा, बैठका यांचे नियोजन करणे, सभा झाल्यानंतरचा आढावा पक्षाला सादर करणे, स्थानिक पातळीवर पक्षीय घडामोडींकडे लक्ष ठेवणे, विविध मतदारसंघात सभांना संबोधित करणे, निवडणूक काळात पक्षात चांगले वातावरण कायम ठेवणे, अशा अनेक गोष्टींवर ते हरियाणा काँग्रेसचे प्रभारी दीपक बाबरीया यांच्यासोबत काम करत आहेत.
प्रफुल्ल गुडधे- पाटील (Prafull Gudhe-Patil) काँग्रेसचे महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते आहेत. यापूर्वी ते नागपूर महानगरपालिकेत दीर्घकाळ नगरसेवक होते, विरोधी पक्ष नेतेही होते. विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये त्यांनी प्रभारी म्हणूनही त्यांनी पक्षाचे काम पाहिले आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसमध्ये सरचिटणीस म्हणून त्यांच्याकडे जबाबदारी होती. पक्षाचे विविध अभियान, उपक्रमांमध्ये ते सक्रीय सहभागी असतात. पक्षात सोनिया गांधी, राहुल गांधींच्या जवळच्या लोकांमध्ये त्यांचा समावेश होतो.