

Rising Northeast Investors Summit
नवी दिल्ली येथील भारत मंडपम येथे सुरु असलेल्या रायझिंग नॉर्थ-ईस्ट इन्व्हेस्टर्स समिट २०२५ मध्ये शुक्रवारी रिलायन्स इंडस्ट्रीज आणि अदानी समुहाने ईशान्य भारतात गुंतवणुकीबाबत मोठी घोषणा केली. रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी, ईशान्य भारतात पुढील ५ वर्षांत ७५ हजार कोटींची गुंतवणूक करणार असल्याचे सांगितले. तर अदानी समुहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी, अदानी समूह पुढील १० वर्षांत ईशान्य भारतात ५० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याची घोषणा केली.
या समिटवेळी, मुकेश अंबानी यांनी अरुणाचल प्रदेश आणि नागालँडसह ईशान्येकडील राज्यांसाठी त्यांचे धोरणात्मक व्हिजन सादर केले. ''भविष्यात, मी हे प्रदेश सिंगापूरसारख्या शेजारील देशांच्या यशाची प्रतिकृती बनलेला पाहू शकतो," असे अंबानी यांनी म्हटले.
दरम्यान, मुकेश अंबानी यांनी ईशान्येला एक नवीन नाव दिले आहे. त्यांनी बोलताना ईशान्येकडील आठ राज्यांचा 'अष्टलक्ष्मी' असा उल्लेख केला. यावेळी मुकेश अंबानी यांनी 'ऑपरेशन सिंदूर'साठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले.
रिलायन्स इंडस्ट्रीज ईशान्येकडील राज्यांत गुंतवणूक दुपटीने वाढवेल. सर्व शाळा, रुग्णालये आणि घरांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता आणेल. तसेच या प्रदेशात सौरऊर्जेची निर्मिती वाढवणार आहे, असेही मुकेश अंबानी यांनी सांगितले.
ईशान्य भारतातील रिलायन्सची सध्याची गुंतवणूक ३० हजार कोटी रुपये आहे. आता ही गुंतवणूक ७५ हजार कोटी रुपयांपर्यंत वाढवण्याची त्यांची योजना आहे.
अदानी समूह पुढील १० वर्षांत ईशान्य भारतात ५० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे, अशी घोषणा अदानी समुहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी शुक्रवारी दिल्लीतील रायझिंग नॉर्थ-ईस्ट इन्व्हेस्टर्स समिटमध्ये केली. "आम्ही तीन महिन्यांपूर्वी आसाममध्ये ५० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याचे सांगितले होते. मी पुन्हा घोषणा करतो की अदानी समूह पुढील १० वर्षांत संपूर्ण ईशान्य भारतात ५० हजार कोटी रुपयांची अतिरिक्त गुंतवणूक करेल." असे अदानी म्हणाले.
अदानी पुढे म्हणाले, "गेल्या दशकात, ईशान्येकडील प्रदेशात भारताच्या विकासाच्या गाथेचा एक नवीन अध्याय उलगडत आहे. विविधता, लवचिकता आणि वापर न झालेल्या क्षमतेची ही एक गोष्ट आहे. या उदयामागे एका नेत्याची दूरदृष्टी आहे जो सीमेच्या मर्यादा मानत नाही. केवळ सुरुवात करतो. पंतप्रधान, तुम्ही जेव्हा पूर्वेकडे जलद आणि प्रथम लक्ष द्या, असे म्हटले, तेव्हा तुम्ही ईशान्येचे लक्ष वेधले."
अदानी समुहाने केवळ आसाममध्ये ५० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर काही महिन्यांतच त्यांनी अतिरिक्त गुंतवणूक करण्याची घोषणा केली. ही गुंतवणूक विमानतळ, शहर गॅस वितरण, ट्रान्समिशन, सिमेंट आणि रस्ते पायाभूत सुविधा यासारख्या क्षेत्रांमध्ये असेल.