

social media reel accident
लखनौ : सोशल मीडियावरील 'रील' बनवण्याचे वेड आणि त्याचे व्यसन किती जीवघेणे ठरू शकते, हे वारंवार स्पष्ट झाले आहे. तरीही रीलसाठी जीवघेणे प्रकार करण्याच्या घटनेमुळे वाढच होत आहे. आता अशीच एक धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील बांदा जिल्ह्यातून समोर आली आहे. व्हिडिओ चित्रित करत असताना एका २७ वर्षीय महिलेचा अपघाती मृत्यू झाला असून, रीलसाठी केलेले 'नाटक' खऱ्या आयुष्यातील शोकांतिका ठरल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, २७ वर्षीय मोहिनी आपल्या घरात रील बनवत होती. गळफास घेण्याच्या एका दृश्याचे चित्रीकरण करण्याचा तिचा प्रयत्न होता. यासाठी तिने गळ्याला फास लावला आणि एका स्टूलवर उभी राहून मोबाईलवर व्हिडिओ रेकॉर्ड करण्यास सुरुवात केली. मात्र, चित्रीकरण सुरू असतानाच अचानक तिचा पाय घसरला किंवा स्टूलचा तोल गेला, ज्यामुळे गळ्याभोवतीचा फास आवळला गेला. अवघ्या काही सेकंदातच या अपघातात मोहिनीचा जागीच मृत्यू झाला.
मोहिनीची चार वर्षांची मुलगी खोलीत आली. तिने आपल्या आईला लटकलेल्या अवस्थेत पाहून ती ओरडली. तिच्या रडण्याचा आवाज ऐकून शेजाऱ्यांनी धाव घेतली, तेव्हा त्यांना हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला आणि उत्तरीय तपासणीसाठी पाठवला. प्राथमिक तपासानुसार रील बनवताना झालेला हा एक अपघात असल्याचे दिसत आहे. तरीही, पोलीस सर्व बाजूंनी या प्रकरणाचा तपास करत आहेत," असे पोलिस अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.