

संगमनेर : शहरातील पुणे-नाशिक महामार्गावर संगमनेर महाविद्यालय जवळील 132 के व्ही समोरील फुटपाथवर धोकादायक पध्दतीने दुचाकी चालवून रिल्स बनवणार्या दोन तरुणांविरूद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. त्या तरुणांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडून माफीनामा घेण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक रवींद्र देशमुख यांनी दिली. हा गुन्हा मोबाईलवर रील्स व्हायरल झाल्यानंतर तरुणांचा शोध घेवून नोंदविण्यात आला आहे.(Latest Ahilyanagar News)
या बाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शहरात काही दिवसांपासून एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यात दोन तरुण फुटपाथवर अतिशय धोकादायक व बेदरकारपणे दुचाकी चालवून स्वतःच खाली पडून जखमी झाल्याचे दिसत होते. या बाबत नागरिकांनी पोलिसांवर नाराजी व्यक्त करत कारवाई करण्याची मागणी केली होती.
दरम्यान, या व्हिडिओची पोलिसांनी स्वतःहून शहानिशा केली असता ही घटना ही संगमनेर शहरातील पुणे-नाशिक महामार्गावर 132 के व्ही समोरील जवळील फुटपाथवर घडल्याचे उघड झाले. पोलिसांनी यातील तरुणांची ओळख पटवली. त्यांच्यावर संगमनेर शहर पोलिस स्टेशनमध्ये मोटर वाहन कायदा अन्वये गुन्हा नोंद केला.
दोघाही तरुणांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या पालकांनाही या घटनेची माहिती देण्यात आली.तरुणांकडून त्यांनी केलेल्या कृतीबाबत माफीनामाही दिला आहे.
गुन्ह्याच्या तपासात निष्पन्न झाले की सदरची घटना ही 26 ऑगस्ट रोजी मध्य रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास घडली. केवळ रिल्स बनवण्यासाठी, रात्रीच्या वेळी अतिशय धोकादायक अशी स्टंटबाजी त्यांनी केली आहे.
या रिल्स बनवण्याच्या नादात मोटरसायकलवर स्टंटबाजी करताना अपघात होऊन तरुण स्वतः गंभीर जखमी झाले आहे. त्यांनी परस्पर शहरातील एका हॉस्पिटलमध्ये उपचार घेतले. त्यांच्या एका मित्राने या घटनेची रिल्स बनवून ती सोशल मीडियावर शेअर केली.
सदर रील्स बघून नागरिकांनी यावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करून अशा तरूणांवर कारवाई करण्याची मागणी केली होती. सुदैवाने या घटनेत अन्य कोणी जखमी झाले नाही.पोलिसांनी अप्पर पोलिस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या सूचनेनुसार कारवाई करुन ‘त्या’ तरुणांना धडा शिकवला.
रवींद्र देशमुख, पोलिस निरीक्षक