

Fiancial Planning
नवी दिल्ली : एकीकडे महागाई आणि घरांच्या वाढत्या किमतींमुळे तरुण पिढी त्रस्त असताना, एका ३५ वर्षीय तरुणाची गोष्ट सोशल मीडियावर लाखो लोकांसाठी प्रेरणा ठरत आहे. आयआयटी, आयआयएम किंवा कोणत्याही मोठ्या ब्रँडची नोकरी नाही. तरीही एका सामान्य कष्टकरी व्यक्तीने अलिशान घर आणि कारचे लाखो लोक स्वप्न पाहतात ते साध्य केले आहे. महिन्याला अवघ्या ७ हजार रुपयांपासून करिअरची सुरुवात करून, या तरुणाने नोएडा आणि बंगळूरु यांसारख्या मोठ्या शहरांमध्ये स्वतःचे घर घेतले आहे. वयाच्या ३५ व्या वर्षी त्याने १ कोटी रुपयांपेक्षा जास्त कर्ज फेडून तो जवळपास कर्जमुक्त झाला आहे. जाणून घ्या या तरुणाच्या यशाची अविश्वसनीय गोष्ट...
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म रेडिट (Reddit) वर एका युझरने त्याचा संघर्षमय प्रवास शेअर केला आहे. २०१३ साली या तरुणाने नोएडा येथे आपल्या करिअरची सुरुवात केली, तेव्हा त्याला महिन्याला फक्त ७ हजार रुपये पगार होता. काही काळानंतर बंगळूरुला जाऊन त्याने CDAC मधून एक तांत्रिक कोर्स पूर्ण केला, पण त्यानंतरही त्याला तब्बल ४५ कंपन्यांनी नोकरी दिली नाही. मात्र, त्याने शिकण्याची जिद्द सोडली नाही. याच काळात एका वरिष्ठ एचआरने दिलेला सल्ला त्याच्यासाठी 'टर्निंग पॉईंट' ठरला. त्यांनी दिलेले दोन कानमंत्र आजही महत्त्वाचे आहेत, असे तो सांगतो. "बचतीला घराच्या भाड्याप्रमाणे समजा, ती प्रत्येक महिन्याला अनिवार्य आहे. क्रेडिट कार्डपासून लांब राहा, ते कर्ज नाही, तर एक सापळा आहे," हे दोन कानमंत्र त्याने आजपर्यंत अवलंबले आहेत. त्यानंतर त्याने प्रत्येक खर्चाचा हिशोब ठेवायला सुरुवात केली आणि अनावश्यक खर्च टाळला.
त्याची बचतीची सुरुवात कर-बचत करणाऱ्या एफडी (FDs) पासून झाली, जिथे त्याला ८.७५ टक्के व्याज मिळत होते. हळूहळू त्याने म्युच्युअल फंडातील एसआयपी (SIPs) आणि शेअर बाजारातही गुंतवणूक करण्यास सुरुवात केली. पाच वर्षांच्या काळात त्याच्या काही गुंतवणुकींनी ५० ते ३०० टक्क्यांपर्यंतचा जबरदस्त परतावा दिला. या प्रवासात त्याच्याकडून अनेक चुका झाल्या, पण प्रत्येक चुकीतून शिकण्याच्या सवयीमुळे तो कधीच थांबला नाही.
२०१८ पर्यंत त्याने ५ लाख रुपयांची बचत केली होती. त्याचवेळी नवीन नोकरीत मिळालेला १ लाखाचा बोनस, १ लाखाचा पुनर्वसन भत्ता आणि वडिलांकडून मिळालेली ७ लाखांची मदत, याच्या जोरावर त्याने नोएडा येथे फ्लॅट खरेदी करण्याचा धाडसी निर्णय घेतला. यासाठी त्याने सुमारे ५५ ते ६० लाख रुपयांचे गृहकर्ज घेतले, ज्याचा कालावधी २५ वर्षांचा होता. पण कर्ज घेताना त्याने स्वतःसाठी एक कठोर नियम बनवला. "जर EMI भरण्यात कधी चूक झाली, तर भावनिक विचार न करता फ्लॅट विकून टाकायचा." त्याने दरवर्षी १२ ऐवजी १४ EMI भरण्याचा नियम ठेवला आणि बोनसची रक्कम थेट कर्ज फेडण्यासाठी वापरली. यामुळे त्याचे कर्ज वेळेच्या आधीच कमी होऊ लागले.
२०२१ मध्ये त्याचे लग्न झाले. २०२३ मध्ये, जेव्हा त्याची पत्नी गर्भवती होती, तेव्हा आपल्या बाळाचा जन्म स्वतःच्या घरात व्हावा, अशी इच्छा तिने व्यक्त केली. हा भावनिक निर्णय असला तरी, त्यामागे त्याने आर्थिक नियोजन पक्के ठेवले होते. त्याने बंगळूरुमध्ये दुसरे घर घेतले आणि त्यासाठी ४० लाखांचे नवीन गृहकर्ज घेतले. याच काळात त्याने १० लाखांचे कार लोनही घेतले.
दोन गृहकर्ज आणि एक कार लोन मिळून त्याच्यावर एकूण १ कोटी रुपयांपेक्षा जास्त कर्ज होते. पण आज वयाच्या ३५ व्या वर्षी त्याने यातील ७५ ते ८० टक्के कर्जाची परतफेड केली आहे. कर सवलतीचा फायदा घेण्यासाठी त्याने थोडे कर्ज शिल्लक ठेवले आहे, अन्यथा तो आज पूर्णपणे कर्जमुक्त होऊ शकला असता. त्याची ही कहाणी केवळ प्रेरणाच देत नाही, तर कमी पैशातही शिस्त आणि योग्य नियोजनाच्या जोरावर सर्व स्वप्न कशी पूर्ण करता येतात, याचं एक उत्तम उदाहरण आहे.