

नवी दिल्ली: देशाच्या ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त लाल किल्ल्यावर 'नया भारत'ची संकल्पना केवळ भाषणांपुरती मर्यादित राहिली नाही, तर पाहुण्यांना दिलेल्या खास भेटवस्तूंमधूनही ती प्रकर्षाने दिसून आली. या सोहळ्यासाठी आलेल्या प्रत्येक पाहुण्याचे स्वागत एका विशेष भेट पिशवीने करण्यात आले, जी आजच्या कार्यक्रमाची आणि देशाच्या भविष्याच्या दिशेने असलेल्या वाटचालीची साक्ष देत होती.
शुक्रवारी (दि.१५) सकाळी लाल किल्ल्यावर दाखल झालेल्या पाहुण्यांना त्यांच्या आसनावर एक पांढऱ्या रंगाची ज्यूटची बॅग मिळाली. या बॅगवर ठळक अक्षरात 'नया भारत' असे लिहिलेले होते. ही भेट केवळ एक औपचारिक वस्तू नव्हती, तर त्यात विचारपूर्वक निवडलेल्या वस्तू ठेवण्यात आल्या होत्या. या पिशवीत तिरंग्याचे चिन्ह असलेली टोपी, मान्सूनच्या संभाव्य सरींपासून बचावासाठी एक रेन पोंचो (रेनकोट), एक पाण्याची बाटली आणि मानचिन्ह असलेला टॉवेल होता. या सर्व वस्तू आजच्या कार्यक्रमाच्या संकल्पनेशी सुसंगत होत्या. एक आत्मविश्वासू, आधुनिक आणि प्रत्येक परिस्थितीसाठी सज्ज असलेला भारत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करून देशाला संबोधित केले. त्यापूर्वी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी त्यांचे स्वागत केले. पंतप्रधानांनी लष्कर, नौदल, हवाई दल आणि दिल्ली पोलिसांच्या ९६ जवानांच्या तुकडीने दिलेल्या 'गार्ड ऑफ ऑनर'ची पाहणी केली. या तुकडीचे नेतृत्व विंग कमांडर ए. एस. सेखोन यांनी केले.
पंतप्रधानांनी लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून ध्वजारोहण केले, ज्यामध्ये त्यांना फ्लाइंग ऑफिसर रशिका शर्मा यांनी मदत केली. ध्वजारोहण होताच २१ तोफांची सलामी देण्यात आली आणि हवाई दलाच्या दोन Mi-17 हेलिकॉप्टर्समधून पुष्पवृष्टी करण्यात आली. यातील एका हेलिकॉप्टरवर तिरंगा ध्वज होता, तर दुसऱ्या हेलिकॉप्टरवर 'ऑपरेशन सिंदूर' या नुकत्याच यशस्वी झालेल्या लष्करी मोहिमेचा ध्वज होता. या मोहिमेचे यश आजच्या सोहळ्याचे एक प्रमुख वैशिष्ट्य ठरले.
'नया भारत' लिहिलेली ज्यूट बॅग: पर्यावरणास अनुकूल आणि आत्मनिर्भरतेचे प्रतीक.
तिरंगी टोपी: देशप्रेमाची भावना जागृत करणाऱ्या तिरंगी टोपीवर देखील ‘नया भारत’ लिहले आहे.
रेन पोंचो (रेनकोट) : पावसाची शक्यता लक्षात घेऊन केलेली तयारी.
पाण्याची बाटली आणि टॉवेल: सोहळ्यादरम्यान पाहुण्यांच्या सोयीसाठी.
'ऑपरेशन सिंदूर'चा लोगो ज्ञानपथावरील प्रेक्षक स्टँड, फुलांची सजावट आणि निमंत्रण पत्रिकांवरही ठळकपणे दिसत होता. निमंत्रण पत्रिकांवर 'नया भारत'चे प्रतीक म्हणून चिनाब पुलाचे वॉटरमार्कही होते.
या सोहळ्यासाठी सुमारे 5 हजार विशेष पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आले होते, ज्यात भारताच्या विशेष ऑलिम्पिक संघाचे सदस्य, आंतरराष्ट्रीय क्रीडा विजेते आणि खेलो इंडिया पॅरा गेम्समधील सुवर्णपदक विजेत्यांचा समावेश होता. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली, जे एनसीसीच्या 2 हजार 500 कॅडेट्स आणि 'माय भारत' स्वयंसेवकांनी मिळून गायले. या स्वयंसेवकांनी 'नया भारत' या अक्षरांची मानवी रचना साकारली होती.
तत्पूर्वी, पंतप्रधानांनी एक्सवरून 'X' (पूर्वीचे ट्विटर) देशवासियांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या आणि स्वातंत्र्यसैनिकांची स्वप्ने साकार करण्यासाठी व विकसित भारत घडवण्यासाठी अधिक परिश्रम करण्याचे आवाहन केले. एक्स पोस्टमध्ये त्यांनी लिहिले आहे की, "सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या खूप खूप शुभेच्छा. हा दिवस आपल्याला आपल्या स्वातंत्र्यसैनिकांची स्वप्ने साकार करण्यासाठी आणि एक विकसित भारत घडवण्यासाठी आणखी कठोर परिश्रम करण्याची प्रेरणा देवो. जय हिंद!