Independence Day 2025 PM Narendra Modi on Pakistan
नवी दिल्ली : भारताच्या 79 व्या स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरील भाषणातून पाकिस्तानला सज्जड दम भरला आहे. अण्वस्त्र हल्ल्यांचं ब्लॅकमेलिंग बऱ्याच काळापासून सुरू आहे, पण आता ते सहन केले जाणार नाही. अशा धमक्यांना आता आम्ही भीक घालत नाही, अशा शब्दात मोदींनी पाकिस्तानला खडेबोल सुनावलेत.
शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावर ध्वजारोहण केले. मोदींनी सलग 12 वेळा ध्वजारोहण केले. यानंतरच्या भाषणात मोदींनी अपेक्षेप्रमाणे ऑपरेशन सिंदूर, पाकिस्तानच्या कुरापती यावर भाष्य केले.
ऑपरेशन सिंदूरमधील शूरवीरांच्या शौर्याला सलाम
ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून आपल्या सैनिकांनी शत्रूच्या कल्पनेपलीकडे असलेल्या शक्तीने प्रत्युत्तर दिले, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. "आमच्या शूरवीरांच्या शौर्याला मी सलाम करतो. ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून आपल्या सैनिकांनी शत्रूचं कल्पनेपलीकडे नुकसान केलंय. २२ एप्रिल रोजी सीमेपलीकडून आलेल्या दहशतवाद्यांनी त्यांचा धर्म विचारून निष्पाप नागरिकांना लक्ष्य करून त्यांची हत्या केली. संपूर्ण देश संतप्त झाला होता," असे पंतप्रधान म्हणाले.
या हल्ल्यानंतर आम्ही सैन्याला मोकळीक दिली. जागा, तारीख आणि वेळ हे संरक्षण दलांनी ठरवलं आणि ती मोहीम यशस्वी पारही पाडली, असंही मोदींनी सांगितले.
भारत आता अणुहल्ल्यांच्या धमक्या सहन करणार नाही
"अणुहल्ल्याचे ब्लॅकमेलिंग बऱ्याच काळापासून सुरू आहे, पण आता ते सहन केले जाणार नाही. जर आपले शत्रू असे प्रयत्न करत राहिले तर आपले सशस्त्र दल त्यांच्या स्वतःच्या अटींवर, त्यांच्या निवडीच्या वेळी आणि त्यांनी ठरवलेले उद्दिष्ट साध्य करून प्रत्युत्तर देतील. आम्ही योग्य उत्तर देण्यास तयार आहोत," असे पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला ठणकावले. "आपल्या सशस्त्र दलांनी पाकिस्तानमध्ये केलेला विनाश इतका व्यापक होता की दररोज नवीन खुलासे होत आहेत. भारताने ठरवले आहे की ते आता अणुहल्ल्याचे धोके सहन करणार नाही, आम्ही कोणतीही धमकी सहन करणार नाही," असे ते म्हणाले.
सिंधू करार एकतर्फी
पंतप्रधान मोदी म्हणाले की, सिंधू करार किती एकतर्फी आहे हे देशवासीयांना कळले आहे. भारताचे पाणी शत्रूंच्या जमिनीला सिंचन करत आहे. माझ्या देशाची जमीन तहानलेली आहे. या करारामुळे गेल्या अनेक दशकांपासून देशातील शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. आता रक्त आणि पाणी हे एकत्र वाहणार नाही देशानं ठरवलंय.