

नवी दिल्ली: लाल किल्ल्याजवळील स्फोटप्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) १३ आरोपींविरोधात न्यायालयात चार्जशीट दाखल केली असून, यातून अनेक धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. या प्रकरणातील सर्व आरोपींचे फोटोही आता समोर आले आहेत.
डॉ. उमर उन नबी मास्टरमाइंड आणि आत्मघाती बॉम्बर
NIA च्या चार्जशीटनुसार, डॉ. उमर उन नबी हा या हल्ल्याचा मुख्य मास्टरमाइंड आणि आत्मघाती बॉम्बर होता. डीएनए (DNA) तपासातून कारमध्ये उपस्थित असलेली व्यक्ती उमर उन नबी हीच असल्याचे निष्पन्न झाले आहे. तपास यंत्रणेच्या दाव्यानुसार, कारजवळ सापडलेल्या कमांड मेकॅनिझमद्वारे आयईडी (IED) सक्रिय करण्यात आला होता.
कार बॉम्बचा वापर आणि फॉरेन्सिक तपास
या स्फोटासाठी Hyundai i20 कारचा व्हीबीआयईडी (VBIED) म्हणजेच कार बॉम्ब म्हणून वापर करण्यात आल्याचा दावा NIA ने केला आहे. फॉरेन्सिक तपासात कारच्या अवशेषांमध्ये TATP, अमोनियम नायट्रेट आणि पोटॅशियम नायट्रेटचे अंश आढळून आले आहेत.
रॉकेट बनवण्यासाठी YouTube आणि ChatGPT चा वापर
चार्जशीटमध्ये नमूद केलेल्या माहितीनुसार, जासीर बिलाल वानी याने रॉकेट बनवण्याची माहिती मिळवण्यासाठी YouTube आणि ChatGPT चा वापर केला होता. तसेच उमर उन नबीने जासीरला दोन ड्रोन दिले असल्याचा उल्लेखही या आरोपपत्रात करण्यात आला आहे.
पेनड्राइव्हमधून शस्त्रांसह फोटो जप्त
आरोपी शाहीन सईदच्या पेनड्राइव्हमधून तब्बल ८७ फोटो सापडले आहेत. या फोटोंमध्ये आरोपी शकील आणि शाहीन हे दोघे शस्त्रांसह दिसत असल्याचा दावा तपास यंत्रणेने केला आहे.
दहशतवादी संघटनांशी थेट संबंध
या प्रकरणातील सर्व आरोपी 'अंसार गजवत-उल-हिंद' (AGuH) आणि 'AQIS' या दहशतवादी संघटनांशी संबंधित असल्याचे NIA ने चार्जशीटमध्ये स्पष्ट केले आहे.
Signal अॅप आणि कोडनेमचा वापर
तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, आरोपी परस्पर संपर्कासाठी 'Signal' अॅपचा वापर करत होते. यामध्ये एकमेकांशी संवाद साधण्यासाठी कोडनेम ठेवण्यात आले होते. 'A-7' या आरोपीची Signal अॅपवर ‘Rauldatta’ या नावाने ओळख असल्याची बाब तपासादरम्यान उघडकीस आली आहे.
कट्टरपंथी आणि हिंसक साहित्य जप्त
NIA ने आरोपींकडून हिंसक कारवायांना प्रोत्साहन देणारे साहित्य जप्त केले आहे. यामध्ये ‘Definition of Jihad’ आणि ‘Requirements of Jihad’ यांसारख्या कट्टरपंथी साहित्याचा समावेश आहे. याव्यतिरिक्त, AQAP शी संबंधित 'Lone Mujahid Pocket Book/How to Become an Assassin' या मॅन्युअलचाही आरोपपत्रात स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे.
उमर उन नबीवरील कायदेशीर कारवाई संपुष्टात
स्फोटात उमर उन नबीचा मृत्यू झाला असल्याने, त्याच्यावरील UAPA, Arms Act आणि Explosive Substances Act अंतर्गत असलेले आरोप कायदेशीर प्रक्रियेनुसार संपुष्टात आणण्यात आल्याचे NIA कडून स्पष्ट करण्यात आले आहे.